* प्रश्न : मी एक निवृत्त सरकारी अधिकारी आहे. माझे वय ६५ वर्षे आहे. मला आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये ३०,००० रुपयांची गुंतवणूक ‘कलम ८० सी’नुसार करावयाची आहे. विम्याचा पर्याय, माझे वय बघता, उचित नाही. मला गुंतवणुकीसाठी इतर कोणते पर्याय उपलब्ध आहेत?

– चिंतामण जाधव, ईमेलद्वारे

उत्तर : आपल्यासाठी ‘कलम ८०सी’नुसार गुंतवणुकीचे खालील काही पर्याय सुचविले आहेत : राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (पाच वर्षे), पाच वर्षांसाठी बँकेतील मुदत ठेव, ज्येष्ठ नागरिक बचत योजना – २००४, पाच वर्षांसाठी पोस्ट ऑफिसमधील मुदत ठेव, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी.

* प्रश्न : कॅपिटल गेन स्कीम, १९८८च्या अंतर्गत उघडलेल्या खात्यातून ‘फॉर्म सी’नुसार घर घेण्यासाठी बिल्डरला पैसे देण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी पैसे काढता येतात आणि ‘फॉर्म जी’नुसार हे खाते बंद करून हे पैसे इतर खात्यांत जमा करता येतात. या फॉर्मसोबत प्राप्तिकर अधिकाऱ्याची परवानगी लागते का?

–  मोहन म्हसकर, डोंबिवली

उत्तर : या स्कीमच्या अंतर्गत या खात्यातून फक्त नवीन घर विकत घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी पैसे काढता येतात. यासाठी ‘फॉर्म सी’ भरून द्यावा लागतो. यासाठी प्राप्तिकर अधिकाऱ्याची परवानगी लागत नाही. परंतु हे खाते बंद करावयाचे असल्यास ‘फॉर्म जी’ भरून त्यावर संबंधित प्राप्तिकर अधिकाऱ्याची सही आणि शिक्का घेणे बंधनकारक आहे. या खात्यातून पैसे इतर कारणासाठी काढण्यासाठी त्यावरील कर भरला गेला आहे की नाही याची खातरजमा केल्यानंतर प्राप्तिकर अधिकाऱ्याकडून ‘फॉर्म जी’ प्रमाणित केला जातो.

* प्रश्न :  मी आणि माझ्या पत्नीने संयुक्त नावाने पुण्यात एक घर सप्टेंबर, १९९२ मध्ये १,७०,३१९ रुपयांना विकत घेतले होते. हे घर मार्च २०१६ मध्ये ४१,००,००० रुपयांना विकले. मुद्रांक शुल्कासाठी याचे मूल्य ३२,८९,४३१ रुपये इतके होते. आम्ही मुंबईत नवीन घर घेणार आहोत. हे घर पुनर्बाधणी प्रकल्पातील आहे. यासाठी आम्ही १,००,००० रुपयांचे टोकन दिले आहे. करारपत्र अजून झाले नाही. आता यापुढे आम्हाला प्राप्तिकर कायद्यांतर्गत काय कृती करावी लागेल?

– उमेश मोंडकर, ईमेलद्वारे

उत्तर : आपण घर मार्च, २०१६ मध्ये म्हणजेच आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये विकले. आपल्याला कलम ५४ नुसार घर विक्रीतून झालेल्या भांडवली  नफ्यावर कर भरावयाचा नसेल तर भांडवली नफ्याएवढी गुंतवणूक नवीन घरात करावी लागते. ही गुंतवणूक घर विक्रीच्या दिवसाच्या एक वर्ष आधी किंवा दोन वर्षांच्या आत (किंवा बांधले तर तीन वर्षांच्या आत) करणे गरजेचे आहे. परंतु नवीन घरातील गुंतवणुकीचे पैसे घर विक्रीच्या वर्षांच्या (म्हणजे आर्थिक वर्ष २०१५-१६) विवरणपत्र भरण्याच्या मुदतीपूर्वी (५ ऑगस्ट, २०१६ ही विस्तारित मुदत, खरी मुदत ३१ जुलै, २०१६ ही होती) भरले पाहिजेत. जर या मुदतीपूर्वी पैसे गुंतवले नसले तर हे पैसे कॅपिटल गेन स्कीम, १९८८च्या अंतर्गत बचत किंवा मुदत ठेव खाते उघडून त्यामध्ये ठेवणे बंधनकारक आहे. म्हणजेच आपल्याला कलम ५४ नुसार गुंतवणुकीची वजावट घ्यावयाची असेल तर ५ ऑगस्ट, २०१६ पूर्वी या कॅपिटल गेन स्कीम, १९८८च्या अंतर्गत खाते उघडून पैसे जमा करणे बंधनकारक होते. हे खाते आपण उघडले नसेल तर आपल्याला या कलमाच्या अंतर्गत वजावट मिळू शकणार नाही. हे घर एप्रिल, २०१६ मध्ये विकले असते तर हे खाते आपल्याला ३१ जुलै, २०१७ पूर्वी उघडता आले असते.

* प्रश्न :  माझे नुकतेच लग्न झाले आहे. बँकेतील मुदत ठेव, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी माझ्या माहेरच्या नावाने आहे. आता मला एक घर माझ्या आणि माझ्या पतीच्या नावाने विकत घ्यावयाचे आहे. या घराचे करारपत्र मला माझ्या लग्नानंतरच्या नावावर करावयाचे आहे, परंतु गृहकर्ज माझ्या माहेरच्या नावाने मंजूर झाले आहे. मला नवीन पॅन घ्यावा लागेल का? माझ्या गुंतवणुकीवरील नाव कसे बदलता येईल.

– एक वाचक, ईमेलद्वारे

उत्तर : आपण नवीन पॅन न घेता, आपले विवाह प्रमाणपत्र जोडून आपले आताच्या पॅनमध्ये नावात बदल करून घ्यावा. यासाठी ‘पॅन करेक्शन’ फॉर्म भरावा. विवाह प्रमाणपत्राच्या आधारे आपल्याला बँकेत आणि इतर गुंतवणुकीवरील नाव बदलून घेता येईल.

* प्रश्न :  आपल्या मागील कर समाधान या सदरात  अनंत कुलकर्णी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना आपण सांगितले की खासगी कंपनीच्या शेअर्स विक्रीतून झालेला भांडवली नफा हा करपात्र दाखविला आहे. हे शेअर्स जर शेअर बाजारात नोंदणीकृत कंपनीचे असते तर कर भरावा लागला असता का?

– अजित कोरडे, मुलुंड

उत्तर : खासगी कंपनीचे शेअर्स विकले तर त्यावर होणारा भांडवली नफा हा करपात्र आहे. शेअर बाजारात नोंदणी केलेल्या कंपन्यांचे शेअर्स, शेअर बाजारामार्फत विकले तर त्यावर शेअर उलाढाल कर (एसटीटी) भरला जातो, अशा शेअरच्या विक्रीवर झालेला दीर्घ मुदतीचा भांडवली नफा हा करपात्र नाही आणि त्यामुळे त्यावर कर भरावा लागत नाही.

जुन्या पाचशे-हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याबाबतीत प्राप्तिकर कायद्यातील तरतुदी काय?

प्रश्न : मी एका खासगी कंपनीत नोकरी करतो. मी वैद्यकीय खर्चासाठी आणि आपत्कालीन खर्चासाठी घरामध्ये २ लाख रुपये रोख रक्कम जमा करून ठेवली आहे. ही रक्कम १,००० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात आहे. या नोटा मी बँकेत जमा केल्या तर प्राप्तिकर खात्याकडून विचारणा होऊ  शकते का?

उत्तर : नुकत्याच ५०० व १,००० रुपयांच्या नोटांच्या बंदीमुळे या नोटा बँकेत जमा करण्यासाठी बँकेत लोकांनी गर्दी केली आहे. बँकेत जमा केले नाहीत तरी नुकसान होईल आणि जमा केले तर प्राप्तिकर खात्याकडून चौकशी होईल अशा द्विधा मन:स्थितीत अनेक जण आहेत. या बाबतीतील प्राप्तिकर कायद्यातील तरतुदी काय आहेत हे समजून घेऊ  या.

प्राप्तिकर कायदा कलम २७०अ नुसार उत्पन्न लपवून ठेवल्यास कराच्या २०० टक्के एवढय़ा रकमेची दंडाची तरतूद आहे. म्हणजेच लपवून ठेवलेल्या उत्पन्नावर ३० टक्के कर आणि करावर २०० टक्के इतका दंड म्हणजेच उत्पन्नाच्या ९० टक्के इतकी कर आणि दंडाची आकारणी होऊ  शकते. आपल्या उत्पन्नाच्या प्रमाणाबाहेर रक्कम बँकेत जमा केल्यास किंवा जमा केलेल्या रकमेचे स्पष्टीकरण देता आले नाही तर त्यावर दंडात्मक कारवाई होऊ  शकते. बचत खात्यात २,५०,००० रुपयांपेक्षा कमी रक्कम जमा केल्यास कोणतीही विचारणा होणार नाही अशी घोषणा करण्यात आली आहे. खात्यात जमा करण्यात आलेल्या रकमांची माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकानुसार बँक, पोस्ट ऑफिस यांना ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर, २०१६ या काळात बचत खात्यात एकूण २,५०,००० रुपयांपेक्षा जास्त आणि चालू खात्यात १२,५०,००० रुपयांपेक्षा जास्त जमा झालेल्या रकमांची माहिती ‘वार्षिक माहिती विवरण’ (एआयआर) मधून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. आतापर्यंत बचत खात्यात एका वर्षांत १० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची माहिती एआयआरद्वारे दिली जाते.

लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार असून, वाचक त्यांना   pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर आपले प्रश्न पाठवू शकतील.

Story img Loader