रिलायन्स मिड अॅण्ड स्मॉल कॅप फंड
जोखीम स्वीकारून किमान पाच ते सात वर्षांत दमदार परतावा मिळविण्याची इच्छा असलेल्या गुंतवणूकदारांनीच या फंडात गुंतवणूक करणे हिताचे आहे. कमकुवत हृदयाच्या व पहिल्यांदाच मिड कॅप गुंतवणुकीची चव चाखणाऱ्या गुंतवणूकदारांनी या फंडापासून दूर राहणे चांगले. परंतु मुरलेल्या गुंतवणूकदारांना हा फंड निश्चितच निराश करणार नाही..
गुंतवणुकीतसुद्धा विविधता असणे गरजेचे असते. तरी ही विविधता चुकीच्या प्रमाणात असेल तर परताव्याचा दर कमी होतो. योग्य प्रमाणात मालमत्तेचे विभाजन केले तर आर्थिक ध्येये गाठणे मुळीच कठीण नसते. मिड कॅप गुंतवणूक परताव्याचा दर वाढवत असली तरी जोखीमसुद्धा वाढवत असते. म्हणून मिड कॅप फंड एकूण गुंतवणुकीच्या २०-३० टक्क्य़ांपेक्षा असू नये असा प्रघात आहे.
मिड कॅप व स्मॉल कॅप समभागांमध्ये गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड हे तेजीच्या कालखंडात लार्ज कॅप फंडांपेक्षा अधिक परतावा देतात. निर्देशांक सध्याच्या पातळीवरून २०१८-२०१९ या कालावधीत मोठय़ा उंचीवर असतील असे देशाची अर्थपरिमाणे दर्शवत असल्याने निवडक मिड कॅप फंडाची चार भागांची मालिका लिहिण्याचे ठरविले.
मागील ३० महिन्यांच्या कालावधीतील फंडाची कामगिरी पाहिली तर जानेवारी २०१४ ते मे २०१४ या कालावधीत लार्ज कॅप फंडांनी परताव्याच्या दरात आघाडी घेतली; नंतर मिड कॅप फंडांनी लार्ज कॅप फंडांना मागे टाकत जून जुलै २०१४ मध्ये निवडक मिड कॅप फंडांनी १०० टक्के वार्षिक परताव्याची नोंद केली. या काळात काही मिड कॅप कंपन्यांचे बाजार भांडवली मूल्य हे लार्ज कॅप कंपन्यांहून अधिक होते. मार्च २०१५ ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीत लार्ज कॅप व मिड कॅप समभाग कोसळल्याने फंडांचा वार्षिक परतावा (उणे) -२५ टक्के इतका घसरला होता. मार्च २०१६ पासून सुरू झालेल्या तेजीमुळे लार्ज कॅप समभाग वर गेले. यानंतर मिड कॅप शेअर्सचे भाव वर जायला सुरुवात झाली असून, पुढे तेजी जशी वेग धरेल तसे मिड कॅप शेअर्सचे भाव वर जातील. पुढील दोन वर्षांत परताव्याच्या बाबतीत मिड कॅप फंड लार्ज कॅप फंडांना मागे टाकतील. दरम्यानच्या काळात निर्देशांकात एखादी मोठी घसरण संभवत असल्याने मिड कॅप फंडात ‘सिप’द्वारेच गुंतवणूक करणे हिताचे आहे.
रिलायन्स मिड अॅण्ड स्मॉल कॅप फंड हा अधिक जोखीम स्वीकारून लार्ज कॅप फंडांपेक्षा अधिक परतावा पाच ते सात वर्षांत मिळविण्याची इच्छा असणाऱ्या गुंतवणूकदारांनी या फंडाची निवड केली तर हा फंड गुंतवणूकदारांना नक्कीच निराश करणार नाही. मिड व स्मॉल कॅप फंड असल्याने निर्देशांकापेक्षा अधिक चढ-उताराला सामोरे जाण्याची मानसिक तयारी असणे आवश्यक आहे. असा संयतपणा असणाऱ्यांसाठी हा फंड सुचवावासा वाटतो.
२६ डिसेंबर २००६ रोजी फंडाची पहिली एनएव्ही जाहीर झाली. या फंडाची १७ ऑगस्ट २०१६ रोजी रेग्युलर ग्रोथची एनएव्ही ३७.०२८८ अशी होती. म्हणजे ज्या कोणी फंडाच्या सुरुवातीला १ लाख रुपये या फंडात गुंतविले त्याचे १७ ऑगस्ट रोजी ३.७० लाख झाले आहेत. याचाच अर्थ फंडाने या १ लाखाच्या गुंतवणुकीवर वार्षिक १४.५३ टक्के दराने परतावा दिला आहे. सोबतच्या कोष्टकात दिलेल्या फंडाच्या ‘सिप’ कामगिरीचे अवलोकन केले असता एक अपवाद वगळता ‘सिप’ गुंतवणुकीचा परताव्याचा दर अधिक आहे.
फंडाच्या गुंतवणुकीत ८० टक्के समभाग हे मिड कॅप व स्मॉल कॅप गटातील असून फंडाची रोकड सुलभता राखण्याच्या दृष्टीने १८ टक्के लार्ज कॅप समभागांचा समावेश फंडाच्या गुंतवणुकीत केलेला आहे. फंडाच्या गुंतवणुकीत ६० समभाग असून आघाडीच्या पाच समभागांचे प्रमाण १६ टक्के तर आघाडीच्या १० समभागांचे प्रमाण ३०.८५ टक्के आहे. गुंतवणुकीची संधी कधी उपलब्ध होईल याची शाश्वती नसल्याने मिड कॅप फंडात पाच-सात टक्के रोकड सममूल्य रक्कम असते. या फंडात केवळ एक टक्का रोकड येणाऱ्या संधीचा लाभ घेण्यास अगदीच तुटपुंजी वाटते. जोखीम व परतावा यांचा समतोल साधण्यात निधी व्यवस्थापक २०१५ च्या मध्यापासून कमी पडत असल्याचे जाणवते. या फंडाचे एका वर्षांचे प्रमाणित विचलन १९.२१ टक्के मिड कॅप फंड असला तरी अधिक आहे. म्हणूनच जोखीम स्वीकारून अधिक परतावा मिळविण्याची इच्छा असलेल्या गुंतवणूकदारांनीच या फंडात गुंतवणूक करणे हिताचे आहे. कमकुवत हृदयाच्या व पहिल्यांदाच मिड कॅप गुंतवणुकीची चव चाखणाऱ्या गुंतवणूकदरांनी या फंडापासून दूर राहाणे चांगले. परंतु मुरलेल्या गुंतवणूकदारांना हा फंड निराश करणार नाही.
गुंतवणुकीतसुद्धा विविधता असणे गरजेचे असते. ही विविधता परतावा वाढवते व जोखीम कमी करते. अनेकदा विभाजन (asset allocation) व वैविध्य (diversification) हे शद्ध गुंतवणुकीच्या परिभाषेत समानार्थाने वापले जातात. म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओत चुकीच्या प्रमाणात फंडांचे प्रमाण वाढले तर परताव्याचा दर कमी होतो. चार ते सहा फंडातून योग्य प्रमाणात केलेली गुंतवणूक ही परताव्याचा दर अधिक देते. अनेकदा ५० हजाराच्या ‘सिप’साठी दहा फंडाचा गुच्छ अनावश्यक ठरतो. योग्य प्रमाणात मालमत्तेचे विभाजन केले तर आर्थिक ध्येये गाठणे मुळीच कठीण नसते. मिड कॅप गुंतवणूक परताव्याचा दर वाढवत असली तरी जोखीमसुद्धा वाढवत असते. म्हणून मिड कॅप फंड गुंतवणुकीच्या २०-३० टक्क्यांहून अधिक असू नये असा प्रघात आहे. ज्यांची जोखीम स्वीकारण्याची क्षमता अधिक आहे किंवा ज्यांच्या गुंतवणुकीचा पाया मजबूत आहे अशा गुंतवणूकदरांनी मिड कॅप फंडांचा जरूर विचार करावा. हा विचार करताना योग्य आर्थिक सल्लागाराशी मसलत करणे म्हणून गरजेचे असते.
(अस्वीकृती: लेखात वापरलेली माहिती व आकडेवारी ही उपलब्ध माहिती स्रोतांपासून घेतली आहे. या लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)
वसंत माधव कुलकर्णी – shreeyachebaba@gmail.com