स्टोअर वन म्हणजे इंडिया बुल्स समूहाची पूर्वीची इंडिया बुल्स रिटेल सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी होय. २००५मध्ये पिरॅमिड रिटेल्स ताब्यात घेतल्यानंतर कंपनीने ११० रुपये अधिमूल्याने खुल्या भागविक्री (आयपीओ)द्वारे आपले शेअर्स बाजारात आणले होते. त्यानंतर कंपनीने भारतातील निवडक शहरात मेगा स्टोअर आणि सुपरमार्केट उघडली. पुढे इंडिया बुल्स होलसेल लिमिटेड या कंपनीची ती उपकंपनी झाल्यापासून कंपनीने पुणे, मुंबई, नागपूर, इंदूर, अहमदाबाद, भोपाळ आणि जयपूर आदी शहरात मॉल्स, मेगा स्टोअर्स आणि सुपर मार्केटमधून विविध श्रेणीतील उत्पादने बाजारात आणली आहेत. या खेरीज कंपनी आता पायाभूत सोयीसुविधा विकसन, मॉल मॅनेजमेंट, इक्विपमेंट रेटिंग आणि सल्लागार अशा इतर सेवाही पुरवते. किंबहुना गेल्या वर्षभरात कंपनीचा मुख्य व्यवसाय पायाभूत सुविधा पुरवणारी कंपनी हाच झाला आहे. सध्या कंपनी वाणिज्य आणि रहिवासी अशा दोन्ही मिळून सुमारे १५० लाख स्क्वेअर फूट क्षेत्रफळाचे व्यवस्थापन सांभाळते. नवीन सरकारी धोरणांनुसार रिटेल क्षेत्र परदेशी गुंतवणुकीसाठी खुले केल्याने या क्षेत्रात मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे. रिटेलखेरीज कंपनीच्या पायाभूत सेवा क्षेत्रातील प्रवेशामुळे कंपनीची आर्थिक कामगिरी उठावदार झाली आहे. मार्च २०१६अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता कंपनीने २५९.५२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ५५.२७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. उत्कृष्ट कामगिरीमुळे गेल्या वर्षभरात हा शेअर जवळपास आठ पटीने वाढला असला तरीही कंपनीचे आगामी काळातील चित्र आशादायी वाटते. अनुभवी प्रवर्तक, अनुकूल सरकारी धोरणे आणि उत्तम कामगिरी यामुळे मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी स्टोअर वन रिटेलचा जरूर विचार करावा.
सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) लेखात सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
अजय वाळिंबे – stocksandwealth @gmail.com