उत्तम प्रवर्तक, उच्च दर्जाची उत्पादन श्रेणी, कामगिरीतील सातत्य आणि वाहन उद्योगाला आलेले चांगले दिवस यामुळे या कंपनीचे भवितव्य उज्ज्वलच आहे..
काही कंपन्या गेल्या पाच वर्षांत स्मॉल कॅपवरून मिड कॅप झाल्या. त्यातील एक कंपनी म्हणजे सुंदरम फास्टनर्स होय. टीव्हीएस समूहाच्या या कंपनीने गेल्या काही वर्षांत आपल्या गुणवत्तेच्या जोरावर उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. गेल्या ४० वर्षांत कंपनीने काळानुसार आपल्या उत्पादनात आवश्यक बदल करून तसेच गुणवत्ता जोपासून आगेकूच सुरू ठेवली आहे. फास्टनर्स, रेडिएटर कॅप्स, गीयर शिफ्टर, पम्प्स, गीयर्स आणि कप्लिंग्स इ. विविध उत्पादने करणाऱ्या सुंदरम फास्टनर्सचे जगभरात चार अत्याधुनिक कारखाने असून जगभरातील जवळपास सर्वच आघाडीच्या वाहन तसेच वाहनांचे सुटे भाग बनवणाऱ्या कंपन्या सुंदरम फास्टनर्सचे ग्राहक आहेत. गेल्या आर्थिक वर्षांत २,६०६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २४७.४ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावणाऱ्या या कंपनीचे भागभांडवल केवळ २१.०१ कोटी रुपये आहे. यंदाच्या आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल अपेक्षेप्रमाणेच उत्तम आहेत. कंपनीने पहिल्या तिमाहीत ७१३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ७५.५५ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो तब्बल ७० टक्क्य़ांनी जास्त आहे. तसेच उलाढालीत २४६.५२ कोटी रुपयांची निर्यातही समाविष्ट आहे. उत्तम प्रवर्तक, उच्च दर्जाची उत्पादन श्रेणी, कामगिरीतील सातत्य आणि वाहन उद्योगाला आलेले चांगले दिवस यामुळे सध्या ५२ आठवडय़ांच्या उच्चांकावर असलेला हा शेअर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटतो.
arth11
अजय वाळिंबे stocksandwealth@gmail.com

सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) लेखात सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

Story img Loader