वर्ष १९८९ मध्ये सुवेन फार्मास्युटिकल्स प्रा. लिमिटेडची स्थापना झाली. १९९५ मध्ये प्रारंभिक भागविक्रीद्वारे शेअर बाजारात प्रवेश केलेल्या या कंपनीने गेल्या २१ वर्षांत उत्तम कामगिरीने मोठा पल्ला गाठला आहे. सुरुवातीला केवळ क्राम्स (contract Research and Manufacturing Services) मध्ये कार्यरत असणाऱ्या सुवेन फार्माने नंतर फाइन केमिकल्स, बल्क ड्रग्स, फॉम्र्युलेशन आणि बायो केमिकल्समध्ये प्रवेश करतानाच देशांतर्गत तसेच परदेशांत काही कंपन्या ताब्यात घेतल्या, तसेच हैदराबाद येथे संशोधन केंद्र स्थापन करून अनेक पेटंटदेखील मिळविली. परदेशातील मागणीला अनुसरून कंपनीने स्वतंत्र निर्यात केंद्रही उभारले. गेली पाच वर्षे कंपनीला सातत्याने पेटंट संबंधात परितोषिक मिळत आहेत. गेल्या पाच वर्षांत सुवेन लाइफ सायन्सेसने विक्रीत सरासरी २७.१३ टक्के वाढ साध्य केली असून नक्त नफ्यात सरासरी ५१.९८ टक्के वाढ करून दाखविली आहे. गेल्याच महिन्यात कंपनीला युरोप तसेच इस्रायलकडून न्युरो डिजनरेटिव्हच्या उपचारासंबंधित पेटंट मिळाली आहेत. ही दोन्ही पेटंट अनुक्रमे २०३० आणि २०२९ पर्यंत वैध राहतील. या पेटंट्समुळे कंपनीकडे युरोपमधील २३, तर इस्रायलमधील एक पेटंट झाली आहेत. कंपनीचे सप्टेंबर २०१६ अखेर समाप्त तिमाहीचे/ सहमाहीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. गेल्या सहामाहीच्या तुलनेत उलाढालीत १३.४३ टक्के वाढ होऊन ती २२९.३ कोटींवरून २६० कोटींवर गेली आहे, तर नक्त नफ्यात २९.१५ टक्के वाढ होऊन तो ४५.६ कोटींवरून ५८.९ कोटींवर गेला आहे.

arth03

सध्या १७० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य वाटतो.

अजय वाळिंबे stocksandwealth@gmail.com

Story img Loader