* प्रश्न: मी सरकारी नोकरीत आहे. मला माझ्या पगाराव्यतिरिक्त दुसरे कोणतेही उत्पन्न नसून मला आयकर भरावा लागत नाही. तसेच मला फॉर्म १६ मिळत नाही. असे असताना मला प्राप्तिकर विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे का? – मनीषा जाधव, पुणे
उत्तर : एकूण उत्पन्न कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा कमी असेल तर प्राप्तिकर विवरणपत्र भरणे बंधनकारक नाही. हे उत्पन्न ‘कलम ८०’च्या वजावटीच्या पूर्वीचे आहे. ही मर्यादा अति ज्येष्ठ नागरिकांसाठी ५ लाख रुपये, ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ लाख रुपये आणि इतर नागरिकांसाठी २,५०,००० रुपये आहे. उदा. आपले पगाराचे उत्पन्न ३,५०,००० रुपये आहे, ‘कलम ८० सी’ प्रमाणे कर वजावटीसाठी जर १,००,००० रुपये गुंतवणूक केलेली आहे आणि करपात्र उत्पन्न २,५०,००० रुपये आहे. तर या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही. परंतु आपले उत्पन्न ‘कलम ८० सी’च्या वजावटीपूर्वी २,५०,००० रुपयांच्या पेक्षा जास्त असल्यामुळे प्राप्तिकर विवरणपत्र भरावे लागेल.
* प्रश्न: माझे वडील वयोवृद्ध झाले आहेत. त्यांच्या राष्ट्रीयीकृत बँकेतील ठेवी व बचत खात्यात माझ्या २२ वर्षीय मुलाचे (म्हणजे त्यांच्या नातवाच्या) संयुक्त खातेधारक म्हणून नाव समावेश करण्याचा त्यांचा मानस आहे. माझा मुलगा शिक्षण घेत आहे व त्याचे कोणतेही उत्पन्न नाही. संयुक्त खाते असल्याने त्यावर मिळणारे व्याज हे माझ्या मुलाच्या उत्पन्नात गणले जाईल काय? त्याला प्राप्तिकर विवरणपत्र भरावे लागेल काय?  – विलास पाटील, जळगाव
arth10उत्तर : आपल्या वडिलांच्या खात्यात आपल्या मुलाचे नाव संयुक्त खातेधारक म्हणून जोडले तर त्या खात्यावर मिळालेले उत्पन्न हे मुलाला करपात्र होणार नाही. या खात्यांवर प्रथम नाव हे आपल्या वडिलांचे आहे आणि हे त्यांनी आपल्या नातवाला भेट म्हणून दिलेले नाही, त्यामुळे अशा ठेवींवर मिळणारे व्याज हे आपल्या वडिलांनाच करपात्र आहे. आपल्या मुलाला यावर कर भरावा लागणार नाही. आपल्या मुलाचे करपात्र उत्पन्न नसेल तर प्राप्तिकर विवरणपत्र भरणे बंधनकारक नाही.
* प्रश्न: मी एका कंपनीत नोकरी करतो. मी शेअर्समध्ये गुंतवणूक करतो. ही शेअर्समध्ये गुंतविलेली रक्कम प्राप्तिकर विवरणपत्रात कशी दाखवावी? शिवाय दोन-तीन वर्षांपूर्वी विकत घेतलेले शेअर्स मी विकले यात मला काही शेअर्समध्ये नफा झाला तर काहींमध्ये तोटा झाला. हे व्यवहार विवरणपत्रात कसे दाखवावे ? – भूषण धनकर, मुंबई
उत्तर : शेअर बाजारामार्फत झालेल्या शेअर्सच्या विक्रीत झालेला नफा हा दीर्घ मुदतीचा असेल तर त्यावर कर भरावा लागत नाही. परंतु हे उत्पन्न ‘करमुक्त उत्पन्न’ या सदराखाली दाखवावे लागते आणि नफा लघू मुदतीचा असेल तर तो ‘भांडवली नफा’ या सदराखाली दाखवावा लागतो. प्राप्तिकर विवरणपत्र अर्ज नमुना १ (आयटीआर १) मध्ये भांडवली नफ्याची तरतूद नसल्यामुळे आपल्याला अर्ज नमुना २ (आयटीआर २) मध्ये विवरणपत्र भरावे लागेल.
* प्रश्न: मी जून २००४ला पुणे येथे एक घर विकत घेतले होते. या घरासाठी घेतलेले गृह कर्ज मी आता पूर्णपणे फेडले आहे. हे घर मी विकण्याचा विचार करत आहे. हे घर विकून मी एक निर्माणाधीन घर घेणार आहे. या घराचा ताबा मला मार्च, २०१८मध्ये मिळणार आहे. या नवीन घरात होणारी गुंतवणूक टप्प्याटप्प्याने दोन वर्षांत होणार आहे. माझा प्रश्न असा आहे की, अशा बाबतीत मला नवीन घरातील गुंतवणुकीचा करविषयक फायदा मिळेल का? – प्रणीत केळुस्कर, ई-मेलद्वारे

उत्तर :
आपण जुने घर विकले तर त्यावर होणारा भांडवली नफा हा दीर्घमुदतीचा असेल. हा नफा नवीन घरात गुंतविला तर या दीर्घमुदतीच्या नफ्यावर कर भरावा लागणार नाही. घर विक्रीनंतर नवीन घरातील गुंतवणूक दोन वर्षांत (बांधले तर तीन वर्षांत) करावी लागते. आपली नवीन घरातील गुंतवणूक दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने होणार आहे. त्यामुळे आपल्याला भांडवली नफ्याएवढे पैसे ‘कॅपिटल गेन स्कीम’च्या अंतर्गत बचत किंवा मुदत ठेव खात्यात ठेवावे लागतील. हे खाते ज्या वर्षांत घर विक्री झाली आहे त्या वर्षांचे विवरणपत्र भरण्याच्या मुदतीपूर्वी उघडावे लागते. उदाहरणार्थ, हे घर आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये विकले तर हे खाते जुलै २०१७ पूर्वी उघडावे लागेल. या खात्यातून नवीन घरासाठी पैसे बिल्डरला देता येतात. या नवीन घराचा ताबा आपल्याला वरील मुदतीत मिळणार असल्यामुळे आपल्याला होणाऱ्या भांडवली नफ्यावर ‘कलम ५४’नुसार कर भरावा लागणार नाही.
* प्रश्न: मी माझ्या आणि पत्नीच्या नावाने एक घर विकत घेतले होते. आम्ही दोघांनी आमच्या हिश्शाचे पैसे या घरात गुंतविले होते. हे घर आता आम्ही भाडय़ाने दिले आहे. हे उत्पन्न आम्हाला कसे करपात्र असेल? – एक वाचक, ई-मेलद्वारे
उत्तर : आपल्याला मिळणारे घरभाडे उत्पन्न हे आपल्या घरातील हिश्शाच्या प्रमाणात करपात्र असेल. जर आपला हिस्सा ५० टक्के आणि पत्नीचा हिस्सा ५० टक्के असेल तर घरभाडेसुद्धा ५० टक्के आपल्याला करपात्र आणि ५० टक्के भाडे पत्नीला करपात्र असेल.
* प्रश्न: माझे नुकतेच लग्न झाले आहे. मला लग्नात अनेक भेटी मिळाल्या यात नातेवाईकांकडून अहेर मिळाला तर काही मित्रपरिवारांकडून भेटी मिळाल्या. या भेटींवर मला कर भरावा लागेल का? याशिवाय काही भेटी माझ्या आई आणि वडिलांनासुद्धा मिळाल्या त्या भेटींवर त्यांना कर भरावा लागेल का?  – एक वाचक, ई-मेलद्वारे
उत्तर : स्वत:च्या लग्नात मिळालेल्या भेटी-अहेर करमुक्त आहेत. जरी त्या नातेवाईकांकडून किंवा इतरांकडून मिळालेल्या असल्या तरी. त्यामुळे आपल्याला मिळालेल्या भेटींवर कर भरावा लागणार नाही. परंतु आपल्या आई आणि वडिलांना मिळालेल्या भेटी करपात्र आहेत.
आई-वडिलांना त्यांच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटी करमुक्त आहेत आणि इतरांकडून मिळालेल्या भेटी करपात्र आहेत. इतरांकडून मिळालेल्या भेटी जर ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असतील तर ती पूर्ण रक्कम करपात्र म्हणून गणली जाते. उदाहरणार्थ, जर इतरांकडून मिळालेल्या भेटी ५२,००० रुपये असतील तर संपूर्ण ५२,००० रुपये करपात्र आहेत.
* लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार असून, वाचक त्यांना pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर आपले प्रश्न पाठवू शकतील.

Story img Loader