लग्नाचा अहेर यासह जवळच्या नातलगांकडून आलेल्या भेटी काही मर्यादेपर्यंत करमुक्त असल्याचा  अनेकांना समज आहे, पण ठरावीक नातेवाईकांकडून मिळणाऱ्या भेटीच करमुक्त असतात हेही लक्षात घ्यावयास हवे..

* प्रश्न : मी एका बिल्डरकडे नोव्हेंबर, २०१५ मध्ये सदनिकेसाठी बुकिंग रक्कम ४,६०,००० रुपये भरले होते. सदर व्यवहार मी आता रद्द केला आहे. ही रक्कम मला जानेवारी, २०१७ मध्ये परत मिळणार आहे. या रकमेवर मला कर भरावा लागेल का?

– का. जा. धलपे, मुंबई</strong>

उत्तर : सदनिका बुकिंगचा व्यवहार रद्द केल्यानंतर बिल्डरकडे बुक करताना भरलेले पैसे परत मिळाले तर त्या रकमेवर कर भरावा लागणार नाही. परंतु जर बिल्डरला आपण कलम ५४ किंवा ५४ एफ नुसार होणाऱ्या गुंतवणुकीसाठी पैसे भरले असतील तर त्याची करपात्रता, या कलमाच्या अटींनुसार तपासून पाहावी.

* प्रश्न : मी आणि माझ्या पत्नीने संयुक्त नावाने पुण्यात एक सदनिका बुक केली आहे. सदर सदनिका २०१८ मध्ये पूर्ण होणार आहे. यासाठी आम्ही संयुक्त नावाने गृहकर्ज घेतले आहे. या कर्जाच्या मुद्दल आणि व्याजाची परतफेड चालू झाली आहे. मला या परतफेडीची वजावट मिळू शकेल का?

– अविनाश देशपांडे, सातारा

उत्तर : कलम २४ नुसार मिळणारी व्याजाची वजावट आणि कलम ८० सी नुसार मिळणारी मुद्दल परतफेडीची वजावट ही सदनिकेचा ताबा घेतल्याशिवाय मिळत नाही. त्यामुळे यावर्षी या दोन्ही वजावटी घेता येणार नाहीत. परंतु सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी भरलेल्या व्याजाची वजावट ही ज्या वर्षी सदनिका ताब्यात घेतली त्या वर्षांपासून पुढील पाच वर्षांत सम प्रमाणात विभागून घेता येईल.

*  प्रश्न : मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. याशिवाय माझे डी मॅट खाते आहे आणि मी शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. त्याच्या विक्रीवर होणाऱ्या नफा आणि तोटय़ासाठी मला वेगळे विवरणपत्र भरावे लागेल का? यावर कर कसा भरावा लागेल?

– नीतेश कांबळे, ईमेलद्वारे

उत्तर : आपले पगाराव्यतिरिक्त उत्पन्न म्हणजेच भांडवली नफा असल्यामुळे आपल्याला आयटीआर-२ हे विवरणपत्र भरावे लागेल. यामध्ये आपण केलेल्या शेअर्ससंबंधी व्यवहाराची माहिती देता येते. शेअर्सवर आपल्याला लघू किंवा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा किंवा तोटा होऊ  शकतो. लघू किंवा दीर्घ मुदत ही शेअर्स खरेदी केल्याच्या तारखेपासून विक्री केल्याच्या तारखेपर्यंतच्या मुदतीवर अवलंबून असते. शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्यांच्या शेअर्ससाठी ही मुदत १२ महिने आहे. म्हणजेच शेअर्स खरेदी केल्याच्या तारखेपासून एक वर्षांच्या आत विकले तर होणारा भांडवली नफा लघू मुदतीचा असेल. लघू मुदतीच्या भांडवली नफ्यावर १५ टक्के (या विक्रीवर शेअर उलाढाल कर – एसटीटी भरला असल्यामुळे) इतका कर भरावा लागेल. लघू मुदतीचा भांडवली तोटा असेल तर तो इतर कोणत्याही भांडवली नफ्यातून वजा करता येतो आणि तरी शिल्लक राहिला तर पुढील ८ वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो. दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कलम १० (३८) नुसार कर भरावा लागणार नाही (या विक्रीवर शेअर उलाढाल कर – एसटीटी भरला असल्यामुळे). अशा शेअर्सच्या विक्रीवर झालेला दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा हा कोणत्याच उत्पन्नातून वजा करता येत नाही आणि अर्थातच पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्डही करता येत नाही.

* प्रश्न : माझे वय ६९ वर्षे आहे. मला केंद्र सरकारकडून निवृत्तिवेतन मिळते. मी २००९ मध्ये २,७०,००० रुपयांना घेतलेली गाडी नोव्हेंबर २०१६ मध्ये ७०,००० रुपयांना विकली हे जुन्या गाडीचे मिळालेले पैसे मला करपात्र आहेत का? हे मला विवरणपत्रात दाखवावे लागेल का?

अरुण इंगळे, नागपूर</strong>

उत्तर : वैयक्तिक कारणासाठी वापरात असलेली गाडी ही भांडवली मालमत्ता होत नाही. त्यामुळे त्याच्या विक्रीवर होणारा नफा हा भांडवली नफा म्हणून विचारात घेतला जात नाही आणि यावर कर भरावा लागणार नाही. हा व्यवहार आपल्याला विवरणपत्रात दाखवावा लागणार नाही.

* प्रश्न : मी एका बिल्डरकडे निर्माणाधीन इमारतीत एक सदनिका २०१२ मध्ये ४० लाख रुपये भरून बुक केली होती. डिसेंबर २०१२ मध्ये करार करण्यात आला, बाकीचे १५ लाख रुपये बिल्डरने घेतले आणि सदनिकेच्या विक्री कराराची नोंदणी केली. अजून सदनिकेचा ताबा मिळाला नाही. मला काही पैशांची गरज असल्यामुळे ताबा मिळण्यापूर्वी मला सदनिकेची विक्री करावी लागत आहे. आता मला या विक्रीवर कर भरावा लागेल का? कर वाचवायचा असेल तर काय करावे लागेल?

 – एक वाचक,  ईमेलद्वारे 

उत्तर : आपण सदनिकेचा ताबा घेतला नसल्यामुळे ही सदनिका ‘घर’ म्हणून विचारात घेतली जात नाही. जेव्हा सदनिका बुक केली तेव्हा त्या सदनिकेवर ‘अधिकार’ स्थापन झाला. हा ‘अधिकार’सुद्धा एक भांडवली मालमत्ता आहे. त्यामुळे या अधिकाराच्या विक्रीवर होणारा नफा हा भांडवली नफा आहे. हा नफासुद्धा लघू किंवा दीर्घ मुदतीचा असू शकतो. हा अधिकार स्थापन झाल्यापासून तीन वर्षांच्या आत विकला तर त्यावर होणारा भांडवली नफा हा लघू मुदतीचा असेल आणि तीन वर्षांनंतर विकला तर होणारा भांडवली नफा दीर्घ मुदतीचा असेल. याबाबतीत न्यायालयाने वेगवेगळे निर्णय दिले आहेत. आपला असा ‘अधिकार’ २०१२ मध्ये स्थापन झाला तो २०१५ नंतर विकला तर त्यावर होणारा नफा हा दीर्घ मुदतीचा असेल. आणि त्यावर २०.६० टक्के  (शैक्षणिक करासहित) इतका कर भरावा लागेल. कर वाचवायचा असेल तर कलम ५४ एफ नुसार दुसऱ्या घरात विक्री किमतीएवढी (विक्रीखर्च वजा जाता) रक्कम गुंतविल्यास कर भरावा लागणार नाही. यासाठी इतर काही अटींची पूर्तता करावी लागते किंवा ५० लाख रुपयांपर्यंत कलम ५४ ईसी नुसार रोख्यांमध्ये गुंतवणूक करून कर वाचविता येईल.

* प्रश्न : माझ्या ५०व्या वाढदिवसानिमित्त केलेल्या समारंभात मला भेटी मिळाल्या. या भेटी करपात्र आहेत का?

 – संदेश, ईमेलद्वारे

उत्तर : फक्त लग्नात मिळालेल्या भेटी करमुक्त आहेत. लग्नाव्यातिरिक्त इतर समारंभात (वाढदिवस, वर्धापन दिन वगैरे) मिळालेल्या भेटी या करपात्र असतात. या भेटी जर ठरावीक नातेवाईकांकडून मिळाल्या असतील त्या करपात्र नाहीत. इतरांकडून मिळालेल्या भेटी करपात्र आहेत. अशा एकूण भेटी ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असतील तर संपूर्ण रक्कम करपात्र आहे.

 

* प्रश्न :  मी एक शासकीय नोकर आहे. मला माझ्या दर महिन्याच्या पगारात २,०००  रुपये इतका घरभाडे भत्ता (एचआरए) मिळतो. मला शासकीय निवासस्थान मिळाले नसल्याने मी माझ्या कुटुंबासह भाडय़ाच्या घरात राहात असून त्याचे दरमहा मी ७,००० रुपयेप्रमाणे वर्षांला ८४,००० रुपये घरभाडे भरतो. तर सदर भाडय़ाची रक्कमबाबत मला करसवलत मिळू शकेल का? तसेच सदर करसवलत प्राप्त करण्याकरिता मला कोणती कागदपत्रे सादर करावी लागतील?

 – सुनील पांढरे, नांदेड</strong>

उत्तर : जर कर्मचारी स्वत:च्या घरात राहात असेल तर त्याला मिळणारा हा भत्ता पूर्णपणे करपात्र असतो आणि तो जर भाडय़ाच्या घरात राहात असेल आणि घरभाडे देत असेल तर त्याला प्राप्तिकरातून सूट मिळते. ही सूट खालील तीन रकमेपैकी जी कमी रक्कम असेल तेवढी मिळते :

कर्मचाऱ्याला मिळालेला घरभाडे भत्ता :

वेतनाच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले घरभाडे.

वेतनाच्या ५० टक्के रक्कम (जर महानगरात राहात असेल तर) किंवा वेतनाच्या ४० टक्के रक्कम (जर महानगरात राहात नसेल तर)

यासाठी वेतन म्हणजे मूळ वेतन आणि महागाई भत्ता (जर वेतन कराराचा भाग असेल तर) आणि कमिशन जे उलाढालीवर निर्धारित टक्केवारीवर आधारित आहे. ही सूट घेण्यासाठी कार्यालयात घरमालकाने सही केलेल्या भाडेपावत्या द्याव्या.

 

* प्रश्न : माझे वय ६७ वर्षे आहे. माझे एक घर डोंबिवली येथे आहे ते मी ३७ लाख रुपयांना विक्री करण्याचा विचार करीत आहे. हे घर मी जानेवारी, १९९९ मध्ये ४,४२,००० रुपयांना खरेदी केले होते. या घराच्या विक्रीवर होणाऱ्या नफ्यावर मला कर भरावयाचा आहे आणि बाकीची रक्कम मी बँकेत मुदत ठेवींमध्ये गुंतवू इच्छितो. मला किती कर भरावा लागेल? मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर उद्गम कर (टीडीएस) कापला जाईल का? मला दरमहा १,६७४ रुपये निवृत्तिवेतन मिळते. मला फॉर्म १५ एच देता येईल का?

– प्रमोद वैद्य, डोंबिवली

उत्तर : आपल्याला झालेला भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा असेल. त्यामुळे महागाई निर्देशांकाचा लाभ मिळेल. दीर्घ मुदतीचा नफा खालीलप्रमाणे :

घराची विक्री किंमत :           ३७,००,००० रुपये

घराची खरेदी किंमत :           ४,४२,००० रुपये

महागाई निर्देशांकानुसार खरेदी मूल्य :

१९९८-९९ सालचा महागाई निर्देशांक – ३५१

२०१६-१७ सालचा महागाई निर्देशांक – ११२५

महागाई निर्देशकानुसार खरेदी मूल्य :

४,४२,००० x ११२५ / ३५१        :      १४,१६,६६७ रुपये

दीर्घ मुदतीचा भांडवली नफा       :      २२,८३,३३३ रुपये

या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर २०.६ टक्के (शैक्षणिक कर धरून) इतका कर भरावा लागेल. परंतु आपल्याला मुद्रांक शुल्कासाठी बाजारभाव मूल्य किती आहे हे सुद्धा विचारात घ्यावे लागेल. निवृत्तिवेतनाव्यतिरिक्त आपले इतर उत्पन्न नसेल तर भरावा लागणार कर खालीलप्रमाणे :

निवृत्तिवेतन (१,६७४ x १२)      :      २०,०८८ रुपये

दीर्घ मुदतीचा भांडवली नफा       :      २२,८३,३३३ रुपये

एकूण उत्पन्न   :                   २३,०३,४२१ रुपये

८० सी नुसार निवृत्तिवेतनाची गुंतवणूक केल्यास वजावट :   २०,०८८ रुपये

करपात्र उत्पन्न                           :      २२,८३,३३३ रुपये

भरावा लागणारा कर :

प्रथम ३,००,००० रु. (ज्येष्ठ नागरिक असल्याने)     शून्य रुपये

बाकी १९,८३,३३३ रुपयांवर                              ३,९६,६६७ रुपये

(भांडवली नफ्यावरील २० टक्के दराने कर)

एकूण कर             :      ३,९६,६६७ रुपये

शैक्षणिक कर          :      १९,९०० रुपये  (३ टक्के दराने)

एकूण कर             :      ४,०८,५६७ रुपये

भांडवली नफ्याव्यतिरिक्त उत्पन्नावर कलम ८० सी नुसार वजावट मिळू शकते. ही वजावट दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून मिळत नाही. म्हणून इतर उत्पन्नाएवढी गुंतवणूक बँकेतील कलम ८० सी नुसार मुदत ठेवीत केल्यास कर वाचू शकतो. ज्येष्ठ  नागरिकांसाठी एकूण उपन्न करपात्र उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी असेल. कर देय नसेल तर फॉर्म १५ एच देऊ  शकताह्ण.

Story img Loader