- प्रश्न: मी एक सरकारी नोकर आहे. मी जुलै २०१३ मध्ये २१ लाख रुपयांना एक घर विकत घेतले होते. या घरावर मी गृहकर्ज घेतले आहे. आणि या गृहकर्जाच्या परतफेडीवर मिळणाऱ्या वजावटी मी मागील दोन वर्षे घेत आलो आहे. मी हे घर विकले तर मी घेतलेल्या वजावटीवर परिणाम होईल का? आणि घर विक्रीवर नफा झाला तर कर भरावा लागेल का?
– प्रवीण अहिरे, पालघर
उत्तर : आपण घरासाठी गृहकर्ज घेतले आहे. म्हणजेच ‘कलम २४’नुसार कर्जावरील व्याजाची आणि ‘कलम ८० सी’नुसार मुद्दल परतफेडीची वजावट घेतली असेल. हे घर आपण आता, म्हणजेच विकत घेतल्याच्या तारखेपासून पाच वर्षांच्या आत विकले तर आतापर्यंत ‘कलम ८० सी’नुसार घेतलेली वजावट, ज्या वर्षी घर विकले त्या वर्षीच्या उत्पन्नात गणली जाईल आणि त्यावर आपल्याला कर भरावा लागेल. ‘कलम २४’ मध्ये अशी काही तरतूद नाही. त्यामुळे व्याजाची वजावट ही उत्पन्नात गणली जाणार नाही. हे घर आपण विकत घेतल्याच्या तारखेपासून तीन वर्षांच्या आत विकले तर होणारा नफा हा लघुमुदतीचा असेल आणि त्यावर आपल्या स्लॅबप्रमाणे (उत्पन्न स्तरानुरूप कर दराच्या टप्प्याप्रमाणे) कर भरावा लागेल. अशा नफ्यावरील कर वाचविण्यासाठी गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध नाहीत. हे घर आपण विकत घेतल्याच्या तारखेपासून तीन वर्षांच्या नंतर विकले तर होणारा नफा हा दीर्घ मुदतीचा असेल आणि त्यावर आपल्याला २०.६० टक्के (शैक्षणिक कर धरून) कर भरावा लागेल. अशा नफ्यावरील कर वाचविण्यासाठी ‘कलम ५४’ आणि ‘५४ ईसी’नुसार गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत.
- प्रश्न: मी एका कंपनीत नोकरीला आहे. दोन वर्षांपूर्वी मी गृहकर्ज घेऊन एक घर विकत घेतले होते. या वर्षी माझ्या आईने या गृहकर्ज खात्यात एकरकमी चार लाख रुपये जमा केले. माझा प्रश्न असा आहे की पुढील वर्षी मला हे माझ्या विवरणपत्रात दाखवावे लागेल का?
- अमित राव, बदलापूर
उत्तर : नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटी या करमुक्त असतात. त्यानुसार चार लाख रुपये हे करपात्र उत्पन्नात गणले जाणार नाही. आपण नोकरी करीत असल्यामुळे ‘विवरणपत्र फॉर्म १’ भरावा लागेल त्यामध्ये हे दाखविण्याची तरतूद नाही.
- प्रश्न: माझी पत्नी नोकरी करत होती. तिचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले. तिचे पैसे माझ्या मुलाच्या नावाने मुदत ठेवीत आहेत आणि तिच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचे खाते नॉमिनी म्हणून माझ्या मुलाच्या नावे आहे. माझा मुलगा आता २३ वर्षांचा आहे आणि तो शिक्षण घेत आहे. माझा प्रश्न असा आहे की या मुदत ठेवींवरील व्याज हे कोणाला करपात्र आहे? आणि माझ्या मुलाला विवरणपत्र भरणे गरजेचे आहे का?
– विलास घर, ई–मेलद्वारे
उत्तर : आपला मुलगा सज्ञान (वय १८ वर्षांपेक्षा जास्त) आहे, त्यामुळे त्याला मिळणारे उत्पन्न हे त्यालाच करपात्र आहे. हे उत्पन्न आपल्या उत्पन्नात गणले जाणार नाही. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या खात्यावरील व्याज हे करमुक्त आहे. मुदत ठेवींवरील व्याज हे २,५०,००० रुपयांच्या पेक्षा जास्त असेल तर किंवा या व्याजावर बँकेने उद्गम कर (टीडीएस) कापला असेल तर त्याला विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे.
- प्रश्न: मी माझे कर निर्धारण वर्ष २०१६–१७ (आर्थिक वर्ष २०१५–१६) सालचे विवरणपत्र २७ जुलै रोजी दाखल केले. या विवरणपत्रानुसार माझा कर परतावा (रिफंड) ३७० रुपये इतका होता आणि तो मला नुकताच मिळालादेखील. आता मला या विवरणपत्रात एक चूक आढळून आली की, मी यामध्ये ‘कलम ८९‘नुसार सवलत घेण्यास विसरलो. ही सवलत घेतल्यानंतर माझा परतावा (रिफंड) ४,१०० रुपये इतका येतो. आता हा रिफंडचा दावा मी करू शकतो का? असल्यास कसा?
– सागर, ठाणे
उत्तर : आपल्याला सुधारित विवरणपत्र दाखल करून सुधारित कर परताव्याचा (रिफंड) दावा करता येतो. सुधारित विवरणपत्र हे (१) कर निर्धारण वर्ष संपल्यानंतर एक वर्षांच्या आत किंवा (२) कर निर्धारण पूर्ण होण्याच्या पूर्वी (या दोन्हीपैकी जे आधी होईल ते) दाखल करता येते. आपल्याला रिफंड मिळाला म्हणजे आपले कर निर्धारण झाले असे नाही. त्यामुळे आपण परतावा मिळाल्यानंतर देखील सुधारित विवरणपत्र दाखल करू शकता.
- प्रश्न: माझ्या आणि माझ्या पत्नीच्या संयुक्तिक नावाने एक घर आहे. आता हे घर आम्ही विकण्याचा विचार करत आहोत. यासाठी अंदाजे ३५ लाख रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. माझ्या पत्नीचे उत्पन्न २,५०,००० रुपयांपेक्षा कमी आहे. या घराच्या विक्रीवर आमचे करदायित्व कसे असेल?
– प्रसाद कारखानीस, भोपाळ
उत्तर : संयुक्त नावाने घर घेताना घरातील प्रत्येकाचा हिस्सा ठरविणे गरजेचे असते. या हिश्शानुसार प्राप्तिकर कायद्यातील वजावटी किंवा उत्पन्न प्रत्येक हिस्सेदाराला उत्पन्नात दाखवाव्या लागतात. पती आणि पत्नी हे दोघे वेगवेगळ्या व्यक्ती आहेत आणि वेगवेगळे करदाते आहेत. जेव्हा आपण घराची विक्री कराल तेव्हा यावर होणारा दीर्घ किंवा अल्प मुदतीचा भांडवली नफा हा तुमच्या हिश्शाप्रमाणे प्रत्येकाला करपात्र असेल.
- प्रश्न: माझा एक व्यवसाय आहे. काही कारणाने आर्थिक वर्ष २०१५–१६ मध्ये मला ७२,५०० रुपयांचा तोटा झाला. व्यवसायाची वार्षिक उलाढाल २० लाख रुपये इतकी आहे. या शिवाय मी गृहकर्जाची परतफेड केली आहे. यामध्ये ४२,००० रुपयांचे व्याज आणि १६,००० रुपयांची मुद्दल परतफेड आहे. माझे या शिवाय कोणतेही उत्पन्न नाही. मी अजून माझे विवरणपत्र दाखल केले नाही. मला व्यवसायाच्या तोटय़ाची आणि गृहकर्जाच्या परतफेडीची वजावट पुढील वर्षांच्या उत्पन्नातून घेता येईल का?
– हितेश मोरे, ई–मेलद्वारे
उत्तर : धंदा-व्यवसायातून झालेला तोटा हा पुढील आठ वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो आणि पुढील वर्षांमध्ये झालेल्या धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नातून हा तोटा वजा करता येतो. परंतु यासाठी विवरणपत्र मुदतीपूर्वी दाखल करणे गरजेचे आहे. आपले विवरणपत्र दाखल करण्याची मुदत ३१ जुलै २०१६ (वाढीव तारीख ५ ऑगस्ट २०१६) रोजी संपली. या मुदतीनंतर विवरणपत्र दाखल करणार असल्यामुळे धंदा-व्यवसायातील तोटा पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येणार नाही. परंतु प्राप्तिकर खात्याच्या परिपत्रक क्र. ८, दिनांक १६ मे २००१ नुसार प्राप्तिकर अधिकाऱ्याला अशा विलंबाला माफी देण्याची तरतूद आहे. गृहकर्जाचे व्याज हे घराच्या उत्पन्नातून वजा होते. आणि करदात्याकडे एकच घर असेल तर उत्पन्न हे शून्य असते आणि व्याजाची वजावट विचारात घेऊन हे व्याज ‘घराच्या उत्पन्नातील’ तोटा म्हणून गणला जातो. या तोटय़ाची वजावट त्या वर्षीच्या कोणत्याही उत्पन्नातून घेता येते. आपले या वर्षी कोणतेही उपन्न नसल्यामुळे हा तोटा पुढील आठ वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येतो. परंतु पुढील वर्षांमध्ये या तोटय़ाची वजावट फक्त ‘घराच्या उत्पन्नातूनच’ घेता येते. हा तोटा पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी विवरणपत्र मुदतीपूर्वी दाखल केलेच पाहिजे ही अट नाही. त्यामुळे हा तोटा आपण पुढील वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करू शकता. गृहकर्जाच्या मुद्दल परतफेडीची वजावट ‘कलम ८० सी’नुसार मिळते. ‘कलम ८०’नुसार मिळणाऱ्या वजावटी या फक्त उत्पन्नातूनच घेता येतात. या वजावटी उत्पन्नापेक्षा जास्त असू शकत नाहीत. या वर्षी उत्पन्न नसेल तर त्या वजावटी पुढील वर्षांत कॅरी फॉरवर्ड करता येत नाहीत.
लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार असून, वाचक आपले प्रश्न त्यांना pravin3966@rediffmail.com
या ई–मेलवर पाठवू शकतील.