तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून येत्या आठवडय़ातील निर्देशांकांच्या संभाव्य वाटचालीचा वेध..
जानेवारीमध्ये तेजीच्या नभांगणात निफ्टीवर १२,००० ते १५,००० चे तेजीचे पतंग उडत होते. तेव्हाच या स्तंभातील लेखात, पुढे सुरू झालेल्या मंदीची स्पष्ट कल्पना वाचकांना चतुरस्र कवयित्री शांताताई शेळके यांच्या वाक्याचा आधार घेत दिली होती. ते वाक्य… ‘‘डोक्यात असतं ते काव्य आणि कागदावर असते ती कलाकुसर. त्याप्रमाणे माझ्या डोक्यातील निफ्टीवरील १०,८००-११,००० चे टप्पे हळूहळू प्रत्यक्षात आले आहेत, तर कागदावरील कलाकुसर म्हणजे गुंतवणूकदारांचा कागदोपत्री नफा (पेपर ऑन प्रॉफिट) प्रत्यक्षात येण्यासाठी सध्या चालू असलेल्या तेजीत गुंतवणूकदारांनी आपले नफ्यातील समभाग विकून फायदा पदरात पाडून घ्यावा, कारण त्यानंतर निफ्टी निर्देशांकावर ४०० ते ८०० गुणांचा घातक उतार संभवतो.’’ हे ऐन तेजीचा बहर असतानाच १५ जानेवारीच्या लेखातील वाक्य अवघ्या दोन महिन्यांत आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत. त्याच अनुषंगाने सुचविलेले ‘लक्षणीय समभाग’ एकदम खरेदी न करता गुंतवणूकयोग्य रक्कम २५ टक्क्यांच्या चार तुकडय़ांत विभागून प्रत्येक घसरणीत खरेदी करण्याचाही सल्ला दिला गेला. ही घसरण सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकावर प्रथम ३३,४८०/१०,२५० आणि नंतर ३२,५००/१०,०५० पर्यंत असू शकेल तेव्हाच हे समभाग खरेदी करावेत. निर्देशांकाचा तळ आता दृष्टिपथात येत असताना हे स्तर लवकरच दिसतील. या आठवडय़ाची वाटचाल कशी असेल त्याचा आढावा घेऊ या.
शुक्रवारचा बंद भाव –
* सेन्सेक्स : ३३,३०७.१४
* निफ्टी : १०,२२६.९०
आताच्या घडीला निर्देशांकावर ३४,५००/१०,६०० ही महत्त्वाची ‘कल निर्धारण पातळी’ आहे. गेल्या आठवडय़ातील गुरुवार, शुक्रवारच्या सुधारणेत निर्देशांक प्रथम ३३,५००/१०,३०० चा स्तर पार करणे नितांत गरजेचे आहे, तरच ३४,५००/१०,६०० चा स्तर दृष्टिपथात येईल. अन्यथा या आठवडय़ात निर्देशांक ३३,५००/१०,३०० चा स्तर ओलांडण्यास वारंवार अपयशी ठरल्यास निर्देशांक पुन्हा ३२,७००/१०,१३५ पर्यंत खाली घसरू शकतो.
सोन्याचा किंमत-वेध
गेल्या लेखातील वाक्य होते सोन्याच्या बाबतीत आपण ‘तेजीच्या वातावरणातील मंदीची झुळूक अनुभवत आहोत आणि त्या दृष्टीने रु. ३०,५०० ही महत्त्वाची ‘कल निर्धारण पातळी’ आहे. या स्तरावर सोन्याचे भाव टिकल्यास सोन्याचे भाव रु. ३०,७०० ते ३१,००० ही वरची उद्दिष्टे असतील. अन्यथा रु. ३०,५०० स्तराखाली सोने रु. ३०,३०० ते ३०,००० पर्यंत खाली घसरू शकते. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित).
लक्षणीय समभाग
अमरराजा बॅटरी लिमिटेड
(बीएसई कोड – ५००००८)
शुक्रवारचा बंद भाव : रु. ७९३.७०
ल्ल समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा हा रु. ७२० ते ८६० असा आहे. रु. ८२० च्या वर शाश्वत तेजी सुरू होऊन रु. ८६० आणि ९०० ही वरची उद्दिष्टे असतील. दीर्घ मुदतीची उद्दिष्टे ही रु. १,००० ते १,१०० अशी असतील. पुन्हा गुंतवणूकयोग्य रक्कम २५ टक्क्य़ांच्या चार तुकडय़ांत विभागून प्रत्येक घसरणीत हा समभाग खरेदी करावा. या गुंतवणुकीला रु. ६५०चा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.
आशीष अरविंद ठाकूर ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.