राजेंद्र गुप्ता यांनी १९९० मध्ये स्थापन केलेली ही कंपनी ट्रायडेंट समूहाची मुख्य कंपनी म्हणून ओळखली जाते. सुमारे ६,८०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या ट्रायडेंट समूहाचे १२,००० हून अधिक कर्मचारी असून पेपर, केमिकल्स, यार्न्स आणि ऊर्जा अशा अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. भारतातील पहिल्या १० यार्न उत्पादकांपैकी असलेला हा समूह जगातील सर्वात मोठी टेरी टॉवेल आणि स्ट्रॉ पेपर उत्पादन करणारी कंपनी आहे. केवळ १७,२८० स्पिंडल यार्नने सुरुवात केलेली ट्रायडेंट आज जगभरातील १०० हून अधिक देशांत आपली उत्पादने निर्यात करते. गेली पाच वर्ष सरासरी वार्षिक ३० टक्के वाढ करून दाखवणारी ही भारतातील एक वेगवान प्रगतीपथावरील कंपनी म्हणता येईल. होम टेक्सटाइलला जगभरात मागणी असून आशिया खंडात ही मागणी प्रगत देशांच्या तुलनेत जास्त आहे. भारतातही कंपंनीच्या उत्पादनांना उत्तम मागणी असून येत्या तीन वर्षांत कंपनीची उलाढाल ५,००० कोटी रुपयांच्या वर जाईल असा अंदाज आहे. गेल्या पांच वर्षांत भारताची टेरी टॉवेलची निर्यात लक्षणीय वाढली असून आगामी काळातही ती वाढत राहील असा अंदाज आहे. गुणवत्ता, कच्च्या मालाचा नियमित पुरवठा आणि इतर राष्ट्रांच्या तुलनेत कमी असलेला उत्पादन खर्च याचा एकत्रित फायदा कंपनीला होईल. वेलस्पन कंपनीचे नुकतेच झालेले प्रकरण ट्रायडेंटच्या पथ्यावर पडेल. सप्टेंबर २०१६ अखेर संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने १,१४७.७७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ८०.०७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो ८० टक्के जास्त आहे. सध्या ५५ रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर तुम्हाला दोन वर्षांत ५० टक्के फायदा मिळवून देऊ शकेल.
अजय वाळिंबे stocksandwealth@gmail.com