सेबीकडून आलेल्या नवीन नियमावलीनुसार १ ऑक्टोबरपासून आपण केलेल्या गुंतवणुकीवर गुंतवणूक सल्लागाराला किती सेवाशुल्क मिळाले हे आपल्याला येणाऱ्या खाते पुस्तिकेत (Common Accounts Statement – CAS) मध्येच लिहिलेले असेल. ते बघितल्यावर साहजिकच आपल्या मनात विचार येईल की, मला खरंच गुंतवणुकीसाठी सल्ला घेण्याची आवश्यकता आहे का?
सेबीच्या नवीन नियमावलीनुसार गुंतवणूक सल्लागार हे दोन प्रकारे काम करू शकतील.
विक्रेता (डिस्ट्रिब्युटर) – जे फक्त म्युच्युअल फंडाची माहिती देतील आणि ज्यांना मोबदला दलालीच्या स्वरूपात मिळेल आणि दुसरे गुंतवणूक सल्लागार जे फी घेऊन सल्ला देतील.
सेबीने जरी असे नियम केले असले तरी आपण तपासून बघितले पाहिजे की, मला खरंच गुंतवणूक सल्ला घेण्याची आवशकता आहे का? आणि माझी असा सल्ला घेण्यासाठी फी देण्याची मग ती म्युच्युअल फंड दलाली या स्वरूपात असो किंवा सेवा शुल्क (फी) म्हणून असो ती देण्याची तयारी आहे का?
आतापर्यंत आपण भारतीय लोकांची मानसिकता अशी आहे की, माझ्याकडे एवढे पैसे कुठे आहेत की मला फी घेऊन गुंतवणूक सल्ला घेण्याची आवशकता भासेल? किंवा हल्ली सर्व माहिती माध्यमांवर (वर्तमानपत्र, टीव्ही वाहिन्या) किंवा गुगलवर उपलब्ध आहे. मग मला त्यासाठी सल्ला घेण्याची काय आवश्यकता आहे? असा विचार करतो आणि मग नातेवाईक, मित्रमैत्रिणी किंवा जिथून कुठून फुकट सल्ला मिळेल ते ऐकून आपले पैसे गुंतवतो; पण मग हे योग्य आहे का? गुंतवणूक सल्ला कोणी घ्यावा? का घ्यावा? आणि कोणाकडून घ्यावा तेच आपण आज बघणार आहोत-
१. गुंतवणूक सल्ला कोणी घ्यावा?
नुकतीच उपव्यवस्थापक म्हणून श्रुती एका खासगी बँकेत नोकरीला लागली आहे. ही तिची पहिलीच नोकरी आहे व तिने व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी (एमबीए) प्राप्त केली आहे. जानेवारी महिन्यात बँकेने तिला तिने करबचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीचा तपशील देण्यास सांगितले आहे; पण तिला कळतच नाहीये की काय माहिती द्यावी, कारण त्याबद्दल तिने आजवर कधी विचारच केला नाही.
दुसरे उदाहरण, राकेश आणि रोहिणी यांचे. या दाम्पत्याने नुकताच बाळाला जन्म दिला आहे. सर्वच आई-बाबांना जसे वाटते तसे त्यांनाही जे जे सर्वात उत्तम आहे ते सगळे त्यांच्या बाळाला मिळावे असे वाटते; पण बाळाला उत्तम देण्यासाठी कशात गुंतवणूक करावी? बँकेच्या मुदत ठेवींमध्ये, मुलांसाठी असलेल्या म्युच्युअल फंडाच्या प्लान्समध्ये की सोन्यामध्ये?
रश्मी आणि राम यांनी नुकतीच गाडी घेतली आहे. त्यांना मोठे घर घ्यायचे आहे; पण गाडीचा हप्ता देऊनदेखील त्यांनी कशात आणि किती गुंतवणूक केली पाहिजे हे त्यांना कळत नाहीये की, ज्यायोगे त्यांचे मोठे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल.
सुनीताला परदेशी शिकायला जायचे आहे तिला खात्री आहे की, तिला प्रवेश जरूर मिळेल; पण तिच्या आईला हे ठरवता येत नाहीय की तिने शैक्षणिक कर्ज घेणे योग्य होईल की स्वत:च्या गुंतवणुका मोडून तिने पैसे द्यावे?
अमित आता दोनतीन वर्षांत रिटायर होतोय. त्याला हे ठरवायचे आहे की, साठलेले पैसे आणि मिळणारी भविष्य निर्वाह निधी रक्कम, ग्रॅच्युईटी कशात गुंतवावेत. उर्वरित आयुष्यासाठी पुरेसे ठरतील असा गुंतवणुकीचा मार्ग कोणता?
वर दिलेल्या उदाहरणांप्रमाणे अनेकांपुढे काही ना काही प्रश्न असेलच. मुदत ठेवींवरील व्याज कमी होत आहे; पण त्याऐवजी अन्य कोणत्या पर्यायात पैसे गुंतविले तर ते सुरक्षित राहतील आणि तरी चांगला परतावा मिळेल? हा एक सर्वापुढील सामाईक प्रश्न आहे.
हे किंवा असे कोणतेही प्रश्न तुम्हाला पडत असतील तर योग्य पर्याय निवडण्यासाठी तुम्ही गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
२. सल्ला का घ्यावा?
आपण वाचतो किंवा जाहिरातींमध्ये पाहतो की, अमुक एका म्युच्युअल फंडाने इतका परतावा दिला किंवा तमुक शेअर इतकी र्वष ठेवला असता तर तुम्हाला इतका फायदा झाला असता इत्यादी; पण प्रत्यक्षात आपल्याला तसा फायदा होताना दिसत नाही. तर मग असे का होते? कारण आपण वाचून/कोणाचे तरी ऐकून नंतर गुंतवणूक करतो; पण शेअर कधी विकायचे याकडे लक्ष देत नाही आणि ते कोणी आपल्याला सांगतही नाही. म्हणूनच आपण गुंतवणूक सल्लागाराची मदत घेतली पाहिजे जो आपल्याला कशात, कधी, किती गुंतवणूक करावी हे सांगेल, आपल्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवेल आणि जेव्हा गरज वाटेल तेव्हा नफा काढून घेण्याचा आणि परत कशात गुंतवणूक करावी याचा सल्लादेखील देईल. म्हणजेच आपला पोर्टफोलिओ समतोल राखण्याचे काम करेल.
३. सल्ला कोणाकडून घ्यावा?
असा सल्लागार ज्याला म्युच्युअल फंड, विमा, शेअर बाजार आणि इतर गुंतवणुकीचे पर्याय याची माहिती आहे आणि एकाच वेळी जो सर्वाचा विचार करून तुम्हाला सल्ला देईल. ज्याने त्यासाठी शिक्षण घेतले आहे त्याच्याकडूनच सल्ला घ्यावा.
थोडक्यात :
स्वत:ला हे प्रश्न विचारा :
मला सर्व गुंतवणूक पर्यायांबद्दल माहिती आहे का? त्याविषयी वाचण्याची, रीसर्च करण्याची माझी तयारी आहे का? गुंतवणूक पर्यायांची माहिती मिळविण्याची मला आवड आहे का? तेवढा वेळ माझ्याकडे आहे काय?माझ्या पोर्टफोलिओचे निरीक्षण करणे, मूल्यमापन करणे आणि त्यात वेळोवेळी बदल करणे मला शक्य आहे का?
जर या प्रश्नांची उत्तरे नाही अशी असतील तर तुम्हाला गुंतवणूक सल्लागाराची मदत घेणे गरजेचे आहे आणि जर आपण गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणार असू तर जसे आपण डॉक्टरांचा, वकिलांचा, वास्तुविशारदाचा सल्ला घेण्यासाठी फी द्यायला तयार असतो तसेच आपल्या आपल्या आर्थिक आरोग्यासाठीदेखील समर्पक फी देऊन सल्ला घ्यायची तयारी ठेवली पाहिजे.
स्वाती शेवडे cashevade.swati@gmail.com
(लेखिका सनदी लेखपाल असून त्या पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणूनही कार्यरत होत्या.)