यामधील प्रलोभन म्हणजे या पॉलिसीमध्ये विमा इच्छुकाच्या मर्जीप्रमाणे विम्याच्या रकमेच्या दुप्पट किंवा तिप्पट विमाछत्र घेण्याची सुविधा आहे.
ठळक वैशिष्टय़े : १) ही पॉलिसी एण्डाऊमेन्ट इन्शुरन्स प्लान असल्याने त्यामध्ये रिव्हर्जनरी बोनसची आवक आहे. २) विम्याच्या रकमेच्या दुप्पट किंवा तिप्पट विमाछत्र घेण्याची सोय आहे. ३) पॉलिसीच्या परिपक्वतेनंतर (मॅच्युरिटी) विमाधारकाला मूळ पॉलिसीची रक्कम आणि त्याच्या खात्यामध्ये जमा असलेला बोनस प्राप्त होतो.
उदाहरण : * विमाधारकाचे वय : ३० वर्षे * पॉलिसीची टर्म : २५ वर्षे * प्रीमियम भरणा करायची टर्म (पीपीटी) : २५ वर्षे * विम्याची रक्कम : २५ लाख रु. * तिप्पट विमाछत्रासाठी वार्षिक प्रीमियम : १,१९,४०२ रु. * दुप्पट विमाछत्रासाठी वार्षिक प्रीमियम : १,०७,२७७ रु.
पॉलिसीचे लाभ : १) तिप्पट विमाछत्राची पॉलिसी घेतली तर विमाधारकाच्या ५५व्या वर्षांपर्यंत त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या नामनिर्देशकाला ७५ लाख रु.ची प्राप्ती होणार. त्याचबरोबर त्याच्या खात्यामधील जमा बोनसही मिळणार. २) पॉलिसीच्या २५ वर्षांच्या टर्ममध्ये विमाधारकाचा मृत्यू झाला नाही तर पॉलिसीच्या परिपक्वतेनंतर त्याला २५ लाख रु.ची प्राप्ती होते. त्याचबरोबर त्याच्या खात्यामध्ये जमा असलेला बोनसही दिला जातो. बोनसच्या बाबतीत कंपनी कोणत्याही प्रकारची गॅरंटी देत नाही; परंतु कंपनीने या पॉलिसीसंदर्भात २००६-०७ सालापासून नियमितपणे ४ ते ५ टक्क्य़ांपर्यंत बोनस दिला आहे.
विश्लेषण : पॉलिसीच्या २५ वर्षांच्या टर्ममध्ये विमाधारकाचा मृत्यू झाला नाही तर केवळ गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून त्याने तिप्पट विमाछत्रासाठी भरलेल्या एकूण हप्त्यांची रक्कम होते २९,८५,०५० रु. (१,१९,४२०x२५) आणि कंपनी त्याला मूळ विमाछत्राची २५ लाख रु.ची रक्कम परत देते. कंपनीने बोनसच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची हमी दिलेली नाही. तरी कंपनीने २००६-०७ पासून सातत्याने दिलेल्या बोनसच्या सरासरीचा (४.५ टक्के) विचार केला तर २५ वर्षांमधील बोनसची एकूण रक्कम होते २८,१२,५०० रु. अशा प्रकारे विमाधारकाला एकूण ५३,१२,५०० रु.ची प्राप्ती होण्याची शक्यता आहे (खात्री नाही). परताव्याचा दर होतो द. सा. द. शे. ४.१८ टक्के. या पॉलिसीमध्ये विमाधारकाच्या मृत्यूच्या संभावनेमध्ये मात्र जास्त लाभाची शक्यता आहे. पॉलिसीच्या पाचव्या वर्षी मृत्यू झाला तर विमाधारकाने जमा केलेल्या एकूण हप्त्यांच्या (५,९७,०१० रु.) रकमेच्या समोर नामनिर्देशकाला ७५ लाख रु. आणि जमा बोनस इतकी म्हणजे सुमारे १ पट रक्कम प्राप्त होते. पॉलिसीच्या २० व्या वर्षी मृत्यू झाला तर जमा केलेल्या हप्त्यांसमोर जवळजवळ ४.५ पट रक्कम प्राप्त होते. विमाछत्र घेण्यामागचे मूळ उद्दिष्ट असे ‘विमाधारकाच्या आकस्मिक मृत्यूच्या संभावनेमध्ये त्याच्या कुटुंबाला आर्थिक विवंचनेतून मुक्त करणे.’ या पॉलिसीद्वारे हे उद्दिष्ट बऱ्याच प्रमाणात साधले जाते. विमाधारकाचा मृत्यू जितक्या लवकर तितकी जास्त प्रमाणातील रक्कम नामनिर्देशकाला मिळते. त्यापेक्षाही जास्त मिळू शकते काय, त्याचा आढावा घेऊ या. सर्वप्रथम विमाछत्राचा विचार करू या. जीवनमित्र पॉलिसीच्या उदाहरणामधील व्यक्तीचे वय आहे ३० वर्षे आणि पॉलिसीची टर्म आहे २५ वर्षे. म्हणजे त्याच्या वयाच्या ५५ व्या वर्षी त्याचे विमाछत्र संपुष्टात येणार. अर्थार्जनाचे वय ६० वर्षांपर्यंत धरून चालले तर ५५ ते ६० वयाच्या कालावधीमध्ये जेव्हा सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीवर जास्त जबाबदाऱ्या असतात तेव्हा विमाछत्राची सर्वात जास्त गरज असते आणि ५५ व्या वर्षी नवीन विमा पॉलिसी घ्यायची असेल तर वाढीव वयामुळे प्रीमियमची रक्कमही जास्त असते. त्यामुळे तरुण वयामध्ये जास्तीतजास्त कालावधीची पॉलिसी घेणे नेहमीच फायद्याचे असते. त्यामुळे इतर पर्यायांचा विचार करताना ३० वर्षांची टर्म गृहीत धरून गणित मांडून पाहू या. याच कंपनीची एक कोटी रुपयांची प्युअर टर्म (बिननफ्याची) पॉलिसी सदर व्यक्तीने ३० वर्षांसाठी घेतली तर वार्षिक हप्ता होतो ३७,७३२ रु. ३० वर्षांच्या हप्त्यांची एकूण रक्कम होते ११,३१,९६० रु. जीवनमित्र (तिप्पट विमाछत्र) पॉलिसीच्या २५ वर्षांच्या एकूण हप्त्यांच्या तुलनेत (२९,८५,०५० रु.) बचत १८,५३,०९० रु. ही रक्कम २५ वर्षांमध्ये विभागली तर वार्षिक रक्कम होते ७४,१२३ रु. समजा ७४,१०० रु. ही ७४,१०० रु.ची रक्कम, ज्या गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये आयकरामध्ये सूट आहे आणि परतावा आयकरमुक्त आहे अशा सेफ पर्यायामध्ये दरवर्षी गुंतविली तर २५ वर्षांनी म्हणजे विमाधारकाच्या ५५ व्या वर्षी त्याच्या जवळ ६६,२९,३३३ रु.ची गंगाजळी तयार होते. ही रक्कम पुढील पाच वर्षे आयकर वजा जाता निव्वळ ६ टक्के ठोस परतावा मिळणाऱ्या पर्यायामध्ये गुंतविली तर विमाधारकाच्या ६० व्या वर्षी त्याच्या जवळ ८८,७१,५४२ रु.ची गंगाजळी तयार होते. याच व्यक्तीने भारतीय विमाक्षेत्रामधील क्लेम सेटलमेन्ट रेशिओच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कंपनीची एक कोटी रुपयांची ३० वर्षांची पॉलिसी घेतली तर वार्षिक प्रीमियमची रक्कम होते १२,३२० रु. ३० वर्षांच्या एकूण हप्त्यांची रक्कम होते; ३,६९,६०० रु. जीवनमित्र पॉलिसीच्या एकूण हप्त्यांच्या तुलनेत बचत २६,१५,४५० रु. ही रक्कम २५ वर्षांमध्ये विभागली तर वार्षिक रक्कम होते १,०४,६१८ रु. समजा एक लाख रु. ही १ लाख रु.ची रक्कम वरील सेफ पर्यायामध्ये गुंतविली तर २५ वर्षांनी ८९,४६,४६९ रु.ची गंगाजळी तयार होते आणि ही रक्कम पुढील पाच वर्षे आयकर वजा जाता निव्वळ ६ टक्के ठोस परतावा मिळणाऱ्या पर्यायामध्ये गुंतविली, तर विमाधारकाच्या ६० व्या वर्षी त्याच्याकडे १,१९,७२,३९३ रु.ची गंगाजळी (आयकरमुक्त) तयार होते आणि त्यावर कायमस्वरूपी वार्षिक ७,१८,३४३ रु.चा स्रोत चालू होऊ शकतो. वरील दोन्ही पर्यायांमध्ये पॉलिसीच्या ३० वर्षांच्या टर्ममध्ये विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या नामनिर्देशकाला एक कोटी रुपये प्राप्त होतात आणि त्याचबरोबर गुंतवणुकीच्या इतर माध्यमामध्ये जमा झालेली रक्कमही प्राप्त होते. (लेखाचा उद्देश पूर्णत: समीक्षात्मक असून, कंपन्यांचे वेबस्थळ हा माहितीचा स्रोत आहे)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा