बाजारापुढे पुन्हा जीवन-मरणाचा प्रश्न उभा राहिल्याचे म्हणत, निफ्टी निर्देशांक आपल्या ५२०० च्या महत्त्वपूर्ण आधार पातळीवर तग धरू शकेल काय, यावर बारीक लक्ष ठेवण्यास ‘अर्थ वृत्तान्त’च्या वाचकांना मागील स्तंभात सूचित करण्यात आले होते. ५२०० ही निफ्टीची २०० डीएमए पातळी म्हणजे तेजी आणि मंदीची सीमारेषाच बनून गेली आहे. या पातळीपाशी पोहचताच, निर्देशांकाला या रेषेच्या अल्याडपल्याड खेचण्यासाठी तेजीवाले आणि मंदीवाल्यांमध्ये चढाओढ सुरू होईल, असेही म्हटले गेले होते.
सोबतच्या आलेखात दिसते त्याप्रमाणे मंदीवाल्यांनी निफ्टीला या महत्त्वाच्या पातळीखाली खेचण्याचे शर्थीचे प्रयत्न आठवडाभर सुरू ठेवले, परंतु निर्देशांक ५२०० समीप पोहोचताच तेजीवाले सक्रिय झाले आणि त्यांनी मंदीवाल्यांवर दमदार आघाडीही मिळविली. तेजीवाल्यांचा जोम इतका मजबूत होता की, शुक्रवारी तब्बल ७० अंशांची हनुमान उडी घेतच निफ्टीने सुरुवात केली आणि सप्ताहाची अखेरही ५३४२ या आठवडय़ाच्या उच्चांकी स्तरावरच निफ्टीने केली. तांत्रिक अंगाने बोलायचे झाल्यास, महत्त्वपूर्ण आधार स्तरावर पर्यंत झालेल्या घसरगुंडीतून उसळून घेतल्या गेलेल्या या भरारीने ‘बुलिश मारुबोझू’ मेणबत्ती रचनेची निर्मिती झाली आहे. हे तेजीवाल्यांच्या शानदार सरशीची पावती जरूर आहे, पण यातून निफ्टी निर्देशांक पुढे आणखी मोठी झेप घेईल असा हा संकेत आहे काय? एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी की, शुक्रवारची बाजारातील तेजी ही प्रामुख्याने अमेरिकी व युरोपीय बाजारपेठेतील उसळीचे प्रतिबिंब म्हणून आदल्या दिवशी युरोपीय मध्यवर्ती बँकेने अडचणीत असलेल्या युरोपीय देशांवरील कर्जभार हलका करण्यासाठी अमर्याद स्वरूपात बाँड खरेदीच्या केलेल्या घोषणेची ही सकारात्मक परिणती होती. या परिणामी उदयोन्मुख देशांच्या बाजारात विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढेल या आशेने आशियाई बाजारांमध्येही शुक्रवारी जोमदार बहर दिसून आला. नेमक्या त्याच दिवशी रोजगारविषयक ताज्या तपशिलाने अमेरिकी अर्थव्यवस्थेसंबंधीही जागविलेल्या आशांनीही बाजारातील तेजीचा आवेग आणखीच बळावला. पुढे काय? सोबतच्या तांत्रिक आलेखातून लक्षात येईल की, अत्यंत महत्त्वाचा ५२००च्या पातळीवरून निर्देशांकाने खात्रीशीर उलटफेर घेतला आहे. याचा अर्थ ५४०० या पुढच्या पायरीपर्यंत मुसंडीला निफ्टी निर्देशांक सज्ज झाला आहे. डेरिव्हेटिव्ह्ज डेटाही या गोष्टीची पुष्टी करतो. तर ५४०० पल्याड निफ्टी निर्देशांकाचे पुढचे लक्ष्य ५६०० हे असेल. त्यामुळे तूर्तास हेच सांगता येईल की, या स्तंभात सुचविल्याप्रमाणे आधीच्या दोन आठवडय़ांत ज्यांनी उच्चांक स्तरावरून विक्री करून नफा कमावला असेल, त्यांनी पुन्हा बाजारात सक्रिय होऊन प्रत्येक घसरणीत थोडी थोडी खरेदी पुन्हा सुरू करावी आणि निफ्टीच्या ५६००च्या लक्ष्याचा वेध घ्यावा.
सप्ताहासाठी शिफारस
* हॅवेल्स : (सद्य दर ५६९ रु.)
खरेदी: रु. ५७५ वर; लक्ष्य: रु. ५९४
* हेक्झावेअर : (सद्य दर १३३ रु.)
खरेदी: रु. १३४ वर; लक्ष्य: रु. १३९-१४२
* टाटा स्टील: (सद्य दर ३७१ रु.)
खरेदी: रु. ३७३ वर; लक्ष्य: रु. ३८४-३८८
* रॅनबॅक्सी: (सद्य दर ५४७ रु.)
विक्री: रु. ५४० खाली; लक्ष्य: रु. ५२७
गेल्या आठवडय़ातील विक्री शिफारशीप्रमाणे, आयडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक नीचांक लक्ष्यांपर्यंत घसरून अनुक्रमे १२२ व ८७६.६५ वर रोडावल्या. रिलायन्स विक्री शिफारस अपयशी ठरली, तर कोल इंडियाने दिलेल्या नीचांकांपर्यंत घसरण दाखविली नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा