* पूर्वी धनादेश बँकेत दिल्यावर तो वठला जाऊन पैसे आपल्या खात्यात जमा व्हायला दोन दिवस लागायचे. आपण ज्या बँकेत जमा केला की तो रिझव्र्ह बँकेकडे जाई आणि मग रिझव्र्ह बँक तो धनादेश ज्या बँकेचा आहे त्या बँकेच्या शाखेकडे तो पाठवीत असे. ती शाखा मग ज्या खातेदाराचा हा धनादेश आहे त्या खात्यातून तेवढी रक्कम वजा करून ती संबंधित बँकेच्या खात्यात रिझव्र्ह बँक या मध्यस्थामार्फत ती वळती करीत असे. धनादेश त्याच शहरातील असेल तरी या प्रक्रियेला ४८ तासांचा कालावधी लागे.
पण या जुन्या प्रणालीला पर्याय म्हणून रिझव्र्ह बँकेने नवीन चेक ट्रंकेशन सिस्टीम अर्थात सीटीएस नावाची नवीन प्रणाली आणली. सकाळी बँकेत टाकलेला धनादेश वठला जाऊन खात्यात लागलीच दुसऱ्या दिवशी सकाळी रक्कम जमा व्हावी, असा संपूर्ण प्रक्रियेचा वेळ निम्म्याने कमी होईल, अशा जाहिराती आपण गेल्या सहा महिन्यांपासून वाचत आहोत.
या नवीन प्रणालीमध्ये बँकांनी धनादेश प्रत्यक्ष रिझव्र्ह बँकेकडे न पाठविता फक्त रिझव्र्ह बँकेने ठरवून दिलेल्या निर्देशांनुसार धनादेशाची प्रतिमा पाठवावी लागते. हे काम संगणकाद्वारे होत असल्याने प्रत्यक्षात प्रक्रिया गतिमान झाली आहे. बँकांनाही या नवीन प्रणालीला अनुरूप नवीन साधने व संगणकीय प्रणालीची तजवीज करावी लागले आणि आता ही प्रणाली पूर्णपणे कार्यान्वितही झाली आहे. पण या नवीन प्रणालीचा ग्राहकांना उपयोग होत आहे का? याचे दुर्दैवाने उत्तर नाही असे आहे.
याचे कारण नव्या सीटीएस प्रणालीचे अयोग्य व्यवस्थापन. बँकांच्या शाखांमध्ये त्या त्या दिवसांच्या धनादेशांच्या क्लियरिंगची वेळ ही आता सकाळी ९ किंवा ९.३० वाजेपर्यंत कमी केली गेली आहे. त्यामुळे कुणा ग्राहकाने सकाळी १० वाजता जरी धनादेश बँकेत जमा केला तरी त्यावर कार्यवाही ही दुसऱ्या दिवशीच होणार आणि खात्यात पूर्वीच्या प्रथेप्रमाणेच तिसऱ्या दिवशी पैसे जमा होणार. म्हणजे ‘कमी वेळेत पैसे खात्यात मिळणे’ हा नवीन प्रणालीचा उद्देशच फसला आहे. ‘आरटीजीएस’ सुविधेत मोठय़ा रकमेचेच व्यवहार होत असल्याने सर्वसामान्य खातेदार आणि छोटे उद्योग-व्यावसायिक यांना मात्र नवीन प्रणाली येऊनही तिची उपयुक्तता लाभू शकलेली नाही.
मुकुंद ओक, मुलुंड (पूर्व)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा