सोमवार, १२ मे २०१४च्या ‘अर्थ वृतांन्त’मधील माझा पोर्टफोलियो सदरात आदित्य बिर्ला नुवो लिमिटेड या कंपनीच्या समभाग विश्लेषणात असे म्हटले आहे की, ‘फॉॅच्र्युन ५०० मधील या कंपनीमध्ये २५ देशातील १३०,००० कर्मचारी कार्यरत आहेत.’ परंतु कंपनीच्या व आदित्य बिर्ला समूहाच्या संकेत स्थळावर दिलेल्या माहितीनुसार आदित्य बिर्ला समूहाचा समावेश फॉॅच्र्युन ५०० सूचीत करण्यात आला आहे. आदित्य बिर्ला नुवो लिमिटेड या कंपनीचा स्वंतंत्रपणे या यादीत समावेश नाही. तसेच या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या ६५,००० असून संपूर्ण समूहाच्या कर्मचाऱ्यांची संख्या १३०,००० च्या घरात जाणारी असून सुमारे ४२ देशांचे राष्ट्रीयत्व असणारे कर्मचारी यात आहेत.
सदर कंपनीचा बीटा १.१ असल्याचे लेखात म्हटले असून ‘रॉयटर्स’ या व्यापारविषयक प्रसिद्ध संस्थेच्या संकेतस्थळावर मात्र हा आकडा ०.८६ असा देण्यात आला आहे.
लेखकास अशी नम्र विनंती करावीशी वाटते की, लेखात आपण देत असलेल्या आकडेवारीच्या उगमस्त्रोताचाही उल्लेख लेखात असावा व ‘बीटा’ संज्ञेचा थोडक्यात अर्थही विशद करावा. वाचकांचे योग्य प्रबोधन व्हावे यासाठी हे आवश्यक आहे.
विजय गोखले, डोंबिवली (पूर्व)/ vtgokhale@rediffmail.com