समीर नेसरीकर

ज्या कुटुंबाला प्रेमाने एकत्रितपणे सांभाळले ते कुटुंब आपल्या जाण्यानंतरही एकत्र राहावे अशी भावना प्रत्येकाची असते. म्हणूनच आपल्या पश्चात जिवलगांना कमावलेल्या संपत्तीचे हस्तांतरण सुरळीत, कोणतेही वाद/भांडण, न्यायालयीन खटले टाळून व्हावे, असे ज्यांना वाटते त्या सर्वानी इच्छापत्र वेळीच बनवून घ्यावे.

आर्थिक नियोजनाची सुरुवात ही खरे तर बाळ पोटात असल्यापासून करायला हवी असे आम्ही म्हणतो. ‘लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा’ असा नितांतसुंदर, निरागस बालपणीचा काळ. खायचं-प्यायचं, मजा करायची आणि दमल्यावर आई-बाबांच्या, आजी-आजोबांच्या मांडीवर झोपायचं एवढे सोपे गणित असते. तारुण्यात एक मस्ती असते, स्वप्ने असतात आणि त्यांच्या पूर्ततेत आयुष्याचा तो वादळी टप्पाही पार होतो. वाटेवरच्या काही आर्थिक चुका आपल्याला शहाणपण देतात. काय टाळायचे, काय कवटाळायचे याची आर्थिक समज येत येत आपण एका मुक्कामावर पोहचतो.

मुले मोठी झालेली असतात, काही ठिकाणी कमावती झालेली असतात. बऱ्यापैकी पैसा गाठीशी असतो. आयुष्यातील ‘गििव्हग स्टेज’ चालू झालेली असते, आर्थिक, कौटुंबिक आणि सामाजिकही. आणि, मग कधीतरी.. एके दिवशी घरात ‘इच्छापत्रा’चा (विल) विषय निघतो. ‘मृत्यू’ जे अंतिम सत्य आहे, तो दिवाणखानातल्या गप्पांचा भाग होतो आणि तिथेच गाडी अडते. जो दस्तावेज सर्वात महत्त्वाचा असतो त्या विषयीची चर्चा आपण टाळतो आणि मग कधीतरी अघटित घडल्यास इच्छापत्राच्या अभावी कुटुंबातील व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आज ‘इच्छापत्र’ या विषयाची तोंडओळख करून घेऊया.

इच्छापत्र दोन प्रकारचे असते. आपल्या देशातल्या सैनिकांसाठी ‘विशेष इच्छापत्र’ असते आणि इतर जनतेसाठी ‘सामान्य इच्छापत्र’. विशेष इच्छापत्रात साक्षीदार नसतील किंवा इच्छापत्राखाली सही नसेल तरीही ते वैध मानले जाते. परंतु ते स्वत:च्या हस्ताक्षरात असणे आवश्यक असते. ही सुविधा युद्धभूमीवरील सैनिकांसाठीच आहे. आपण इच्छापत्र साध्या कागदावरही लिहू शकतो. १८ वर्षांवरील मानसिकदृष्टय़ा कुणीही संतुलित व्यक्ती इच्छापत्र बनवू शकते. त्यावर किमान दोन साक्षीदारांच्या सह्या असणे आवश्यक आहे. इच्छापत्राचा नमुना आज आपल्याला इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. पहिल्या परिच्छेदात ‘हे इच्छापत्र माझ्या पूर्ण संमतीने आणि कोणत्याही दडपणाखाली करत आहे’ याचा उल्लेख करावा. सर्व आर्थिक गुंतवणुकीचा लेखाजोखा मांडल्यावर जमिनीची/ घराची माहिती द्यावी. लाभार्थी आणि त्यांच्या हिश्शाचे प्रमाण लिहावे. तसेच इच्छापत्रातील तरतुदींनुसार संपत्तीवाटप करण्यासाठी एक विश्वासू आणि नि:स्पृह व्यक्ती ‘एक्झिक्युटर’ म्हणून आपण नेमू शकता. व्यक्तीच्या मृत्यूनंतर एक्झिक्युटर अथवा इच्छापत्रातील कोणीही लाभार्थी व्यक्ती ‘प्रोबेट’साठी अर्ज करू शकतो.

इच्छापत्राविषयी काही समज-गैरसमजाचे मुद्दे मांडायला हवेत. इच्छापत्र केल्यावर मृत्यू जवळ येतो ही एक पूर्वापार चालत आलेली गैरसमजूत आहे. आपला अंतिम श्वास कधी असेल याचा कोणालाच अंदाज नाही आणि म्हणूनच मृत्यू कधीही येऊ शकतो याची जाणीव ठेवून जेवढय़ा लवकर आपण इच्छापत्र कराल तेवढे चांगले आहे. इच्छापत्र हा श्रीमंत, मध्यमवर्गीय, गरीब हा भेद करत नाही. आपल्या जिवलगांना आपली आयुष्यातील कमावलेली संपत्ती वाटण्याचा हा कायदेशीर मार्ग आहे. ज्यांना हे हस्तांतरण सुरळीत व्हावे असे वाटते त्या सर्वानी इच्छापत्र बनवून घ्यावे.

इच्छापत्रामुळे व्यक्तीच्या सर्व संपत्तीचा गोषवारा (स्थावर आणि जंगम) एकाच कागदावर येतो. इच्छापत्रातून आपण आपल्या अजाण, लहान (मायनर) मुलांचे कायदेशीर पालकत्व नोंदवू शकता. दानधर्मासाठी आपण इच्छापत्राचा उपयोग करू शकता. भविष्यातील घडामोडींनुसार आपण इच्छापत्रात बदल (कोडिसिल) करू शकता. आपण ज्या कुटुंबाला प्रेमाने एकत्रितपणे सांभाळले ते कुटुंब आपल्या जाण्यानंतरही एकत्र राहावे अशी भावना प्रत्येकाची असते. इच्छापत्र केल्यास भविष्यातील वाद/भांडणे, न्यायालयीन खटले टाळण्यास मदत होईल. इच्छापत्राच्या अभावी, घरातल्या माणसांना वेगवेगळय़ा आस्थापनांमध्ये फिरून होणारा मनस्ताप आणि खर्च तुम्ही टाळू शकता. इच्छापत्राशिवाय जर कोणी व्यक्ती मरण पावली त्याच्या संपत्तीचे वाटप भारतीय कायदे आणि व्यक्तीच्या धर्म कायद्याप्रमाणे (उदा. हिंदू वारसाहक्क कायदा) केले जाते. ‘नॉमिनी’ हा व्यक्तीच्या मालमत्तेचा (घर / म्युच्युअल फंड/ शेअर्स / बँक खाते इत्यादी) फक्त एक विश्वस्त असतो. प्रत्यक्ष मालमत्ता वाटप हे त्या व्यक्तीने केलेल्या इच्छापत्रानुसार अथवा इच्छापत्र नसल्यास वर उद्धृत केलेल्या कायद्यानुसार होते. अनुभव असं सांगतो की, एकापेक्षा अधिक अपत्य असतील किंवा विनापत्य विधवा/ विधुर असल्यास संपत्तीच्या वाटणीसाठी इच्छापत्राची अत्यंत आवश्यकता आहे. 

इच्छापत्र बनवताना जर आपण कायदेतज्ज्ञाची मदत घेतल्यास ही प्रक्रिया अधिक सुकर होऊ शकेल.

अ‍ॅथेलेटिक्समध्ये रिले शर्यतीत जसे एका धावपटूकडून दुसऱ्या धावपटूकडे ‘बॅटन’ दिले जाते, तसे तुमच्या संस्कारांचे, चांगल्या वर्तणुकीचे ‘बॅटन’ पुढच्या पिढीत संक्रमित होतच आहे, परंतु त्याचबरोबरीने त्यांना ‘लक्ष्मी’चा आशीर्वादही तुमच्या इच्छापत्राद्वारे लाभावा.

ग.दि.माडगूळकरांनी म्हटल्याप्रमाणे ‘जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे’ अशा आयुष्याच्या टप्प्यात असताना इच्छापत्र म्हणजे तुमचे ‘देणे वार्धक्याचे’ व्हावे.

(लेखक मुंबईस्थित गुंतवणूकविषयक अभ्यासक)

sameernesarikar@gmail.com

(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.)