सुधीर जोशी

गेल्या सप्ताहावर सावट राहिले ते अमेरिकन बाजारातील रोखे दरातील वाढ व त्यामुळे तेथील शेअर बाजारात आलेल्या तीव्र विक्रीच्या लाटेचे. महाराष्ट्र व विशेषत: मुंबईतील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने बाजारात भीतीचे वातावरण तयार होऊन सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स या प्रमुख निर्देशांकात तीन टक्क्यांहून अधिक घसरण झाली. इंधनाच्या व इतर कच्च्या मालाच्या वाढत्या दरांमुळे महागाई वाढण्याची शक्यता, अमेरिकेचा सीरियावरील हल्ला अशा कारणांचाही बाजार पडण्यामागे हातभार लागला. निफ्टी व माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे आघाडीचे समभाग सतत दुसऱ्या आठवडय़ात खाली आले. परंतु मिड कॅप व स्मॉल कॅप श्रेणीतील समभागांना विक्रीची तेवढी झळ लागली नाही.

धातू क्षेत्राचा निर्देशांक ७.५ टक्क्यांनी वर गेला. चीनमधील स्टील उत्पादनाच्या वाढत्या किमतींमुळे चीनची स्टीलची आयात वाढली आहे व परिणामी स्टीलच्या किंमती वाढत आहेत. तांब्याच्या किमतीने गेल्या नऊ वर्षांच्या उच्चांक गाठला आहे. त्याचा फायदा हिंदुस्तान कॉपर, हिंदाल्को, वेदांतासारख्या समभागांना मिळाला. हिंदाल्कोने नवीन भांडवली नियोजन योजना जाहीर केली आहे. यापुढे मिळणाऱ्या रकमेचा विनियोग ५० टक्के भांडवली खर्चासाठी, ३० टक्के कर्जाचे प्रमाण कमी करण्यासाठी तर आठ ते दहा टक्के लाभांशासाठी केला जाईल. भारतातील पायाभूत सुविधांवरील वाढत्या खर्चामुळे तांबे व इतर धातूंच्या मागणीत वाढ होत राहील. कंपनीकडून जास्त मिळकतीची अपेक्षा ठेवता येईल.

गेल्या सप्ताहात सूचिबद्ध झालेल्या रेलटेल व न्युरेका या समभागांनी अनुक्रमे ३३ व ६७ टक्क्यांच्या वाढीने दमदार पदार्पण केले. सप्ताहात प्रारंभिक विक्रीसाठी उपलब्ध होणाऱ्या एमटीएआर टेक्नॉलॉजीच्या समभाग विक्रीत गुंतवणूकदारांना सहभागी होण्याची संधी आहे.

इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रवेशामुळे सर्वाचे लक्ष बॅटरी उत्पादकांकडे लागले आहे. पारंपरिक बॅटरी व्यवसाय एक्साइड व अमराराजा बॅटरी या दोन कंपन्यांच्या ताब्यात आहे. मात्र लिथियम आयॉन तंत्रज्ञानावर आधारित बॅटरी बनविण्याच्या शर्यतीत टाटा केमिकल्स व रिलायन्स आघाडी घेऊ शकतात. टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहने आणण्यात आघाडीवर आहे. टाटा केमिकल्स, टाटा पॉवर या टाटा समूहाच्या सहयोगी कंपन्यांना त्याचा फायदा मिळेल. या तीनही कंपन्यांवर गुंतवणुकीसाठी लक्ष असायला हवे. गेल्या सप्ताहातील बाजारातील मोठय़ा पडझडीचादेखील या समभागांवर फारसा परिणाम झाला नाही, हे लक्षणीय.

रिलायन्सने ‘ऑइल टु केमिकल्स’ साखळीतील सारे व्यवसाय एकत्रित करून स्वतंत्र उपकंपनी स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला. एकत्रित उद्योगामधील नफ्याचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा आहे. कंपनीने या आधी जिओ व रिटेल या उप व्यवसायांकरिता परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठय़ा प्रमाणावर भांडवल उभारणी केली होती. त्याच धर्तीवर या नव्या कंपनीमध्येदेखील मोठी भांडवल उभारणी होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी आपले समभाग राखून ठेवावेत व संधी मिळताच नवीन खरेदी करावी.

ज्योती लॅब ही कंपनी कपडे व भांडय़ांच्या स्वच्छतेशी निगडित हेन्को, उजाला, अ‍ॅक्सो, प्रिल, मार्गो, मॅक्सोसारख्या उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. एफएमसीजी क्षेत्रामधील कमी किमतीचा समभाग दीर्घ मुदतीसाठी गुंतवणुकीला योग्य व सुरक्षित वाटतो. कंपनीने करोना काळातही मिळकतीचा आलेख उंचावला आहे. ग्रामीण भागातील वाढत्या मागणीचा व स्वच्छतेशी निगडित वाढत्या सवयींचा कंपनीला फायदा मिळेल.

भारतातील प्रसिद्ध नौकरी डॉट कॉम, नाइंटीनाइन एकर्स, जीवनसाथी अशा वेबसाइट चालवणारी इंफो एज ही कंपनी ‘मिलेनिअल्स’च्या नोकरी, घर व लग्न अशा तरुणपणातील गरजा त्यांना हव्याशा वाटणाऱ्या इंटरनेट व मोबाइलवर उपलब्ध करते. ही कंपनी झोमॅटो या हॉटेल व्यवसायाशी निगडित ‘फूड डिलिव्हरी’ व्यवसायातही भागीदार आहे. झोमॅटो पुढील वर्षी भांडवली बाजारात उतरण्याची तयारी करत आहे. इंफो एजमध्ये सध्याच्या मूल्यात गुंतवणूक केल्यास अल्पकाळात नफ्याची संधी आहे.

सरकारी व्यवहारांसाठी खासगी बँकांना देण्यात आलेली मुभा, देशातील सर्व सरकारी बँकांचे खासगीकरण करण्याचे व सरकारने स्वत: उद्योग चालविण्याऐवजी उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्याचे पंतप्रधानांनी दिलेले संकेत हे येणाऱ्या काळात खासगी उद्योगांच्या भरभराटीचेच दर्शक आहेत. अर्थसंकल्पानंतर सुरू झालेल्या तेजीला अधूनमधून बसणारी खीळ ही बाजाराच्या एकंदरीत स्वास्थ्यासाठी पोषकच म्हणावी लागेल. भांडवली बाजारात अजूनही थोडय़ा घसरणीची शक्यता नाकारता येत नाही; मात्र या संधीचा समभागातील गुंतवणूक वाढवून फायदा करून घेतला पाहिजे.

sudhirjoshi23@gmail.com

Story img Loader