श्रीकांत कुवळेकर

महिन्याभरापूर्वी या सदरातून सोन्या-चांदीमध्ये गुंतवणुकीसाठी ‘बुलडेक्स’ या वायदे बाजारातील सोने-चांदी निर्देशांकाविषयी लिहिले होते. ‘एमसीएक्स’वर २४ ऑगस्टपासून उपलब्ध असलेल्या ‘बुलडेक्स’च्या एका वायदा काँट्रॅक्टमध्ये गुंतवणूक केल्यास ७१ टक्के सोने आणि २९ टक्के चांदीमध्ये गुंतवणूक होण्याची सोय आहे. आज दीड एक महिन्यानंतर या गुंतवणूक साधनाने बऱ्यापैकी पाय रोवले आहेत. आता त्याच पठडीतील अजून एक साधन ‘एमसीएक्स’ने गुंतवणुकीसाठी खुले केले आहे. त्याचे नाव आहे मेटलडेक्स. म्हणजे सोन्या-चांदीऐवजी हा निर्देशांक पाच प्रकारच्या नॉन-फेरस मेटल किंवा गैर-लोह धातूंमध्ये गुंतवणुकीची संधी देईल. सोमवारपासूनच यात व्यापार सुरू होणार आहे.

थोडक्यात, आपण कमॉडिटी इंडेक्समधील ट्रेडिंग म्हणजे काय हे पाहू. मेटलडेक्स हा निफ्टी, बँक निफ्टी किंवा सेन्सेक्स यांसारखाच एक सेक्टोरल निर्देशांक आहे. ज्याप्रमाणे कुठल्या बँकेच्या शेअरमध्ये गुंतवणूक जास्त फायदा देईल हे गुंतवणूकदाराला न कळल्यामुळे तो ‘बँकनिफ्टी’ या निर्देशांकात गुंतवणूक करणे पसंत करतो अगदी त्याचप्रमाणे काही कारणाने नेमकी कुठल्या मेटलमधील गुंतवणूक जास्त फायदा देईल हे लक्षात येत नाही अशांनी ‘मेटलडेक्स’मध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरेल. शेअर बाजारात निफ्टी किंवा ‘बँकनिफ्टी’मध्ये ट्रेडिंग चालू झाल्यावर हळूहळू बाजारातील एकूण व्यापाराच्या ७० ते ८० टक्के वाटा हा इंडेक्समधील ट्रेडिंगचा राहिला आहे. अर्थात कमॉडिटी बाजाराची सर्वच बाबतीत शेअर बाजाराशी तुलना होत नाही, परंतु तेथेदेखील हळूहळू इंडेक्स ट्रेडिंगचा एकूण व्यापारातील वाटा पुढील एक-दोन वर्षांत वाढायला सुरुवात होईल.

मेटलडेक्सच्या एका वायद्यामध्ये व्यवहार केल्यास गुंतवणूकदाराच्या पैशापैकी ३३ टक्के झिंक (जस्त), ३० टक्के कॉपर (तांबे), १५ टक्के निकेल, १३ टक्के लेड (शिसे) आणि फक्त ९ टक्के अ‍ॅल्युमिनिअममध्ये गुंतविले जातात. कमोडिटी बाजारातील एकूण उलाढालीमध्ये मेटल ट्रेडिंगचा वाटा ३०-३५ टक्के तरी असतो. तसेच ट्रेडिंगच्या भाषेत बोलायचे तर या बाजारात चांगलीच तरलता किंवा लिक्विडिटी असते. त्यामुळे गुंतवणूकदाराला कमीत कमी वेळात बाजाराच्या कलाप्रमाणे आपले सौदे करणे शक्य होते.

‘बुलडेक्स’प्रमाणेच ‘मेटलडेक्स’चे एक कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ५० युनिट्स खरेदी करण्यासारखे असते. सध्या या निर्देशांकाची किंमत ११,९५० च्या आसपास आहे. म्हणजे सहा लाखांहून थोडी कमी गुंतवणूक एका कॉन्ट्रॅक्टद्वारे होते, परंतु यात गुंतवणूक करण्यासाठी वायद्याची पूर्ण किंमत नाही तर फक्त मार्जिन द्यावे लागते. जे साधारण सहा-सात टक्के असते. त्यानंतर एक वायदा खरेदी केल्यावर प्रत्येक एका पॉइंटची वाढ किंवा घट म्हणजे ५० रुपयांचा फायदा किंवा तोटा असल्याप्रमाणे असते. हा फायदा तुम्ही जोपर्यंत सौदा चालू ठेवला आहे तोपर्यंत तुम्हाला दररोज मिळत असतो तर तोटा झाल्यास दररोज तो एक्सचेंजला ब्रोकरमार्फत द्यावा लागतो. म्हणजे अगदी शेअर बाजारातील निफ्टी किंवा बँक निफ्टीच्या सौद्यांप्रमाणेच हे व्यवहार चालतात.

मेटलडेक्समध्ये गुंतवणूक कुणी करावी? तर ज्याला जगाच्या आणि भारताच्या आर्थिक प्रगतीबाबत आशावाद आणि विश्वास आहे, नजीकच्या काळात गृहनिर्माण आणि पायाभूत क्षेत्रात मोठी वाढ दिसत असते अशा गुंतवणूकदारांना एक योग्य साधन हवे असते. शिवाय मुख्य म्हणजे ज्यात डिलिव्हरी घेण्याची आवश्यकता नसते असे गुंतवणूक साधन. वरील धातूंचे स्वतंत्र वायदे हेदेखील गुंतवणुकीसाठी उपलब्ध असतात. परंतु त्यात डिलिव्हरी अनिवार्य असते. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदार त्याकडे दीर्घ मुदतीने गुंतवणूक करण्याचा विचार करू शकत नाहीत. शिवाय आता म्युच्युअल फंडांसाठीदेखील काही प्रमाणात कमॉडिटी बाजारात पैसे वळवण्याची परवानगी मिळाली असल्यामुळे सोने-चांदीबरोबरच हे फंड हळूहळू कॅश-सेटल्ड प्रकारच्या निर्देशांकांमध्ये पैसे टाकण्यास उत्सुक आहेत. एकंदर हे क्षेत्र पुढील एक-दोन वर्षांत बऱ्यापैकी जोर धरेल अशी अशा करायला हरकत नाही.

लेखक वस्तू बाजार विश्लेषक.

ksrikant10@gmail.com