अर्थात दुसऱ्याच्या उत्पन्नावर करदायीत्व!
कोणतेही आíथक व्यवहार करताना आपण सावध असतो. परंतु हाच आíथक व्यवहार आपल्या कुटुंबातील व्यक्तींबरोबर करताना मात्र गाफील असतो. प्राप्तिकर कायद्याप्रमाणे प्रत्येक सजाण व्यक्ती ही स्वतंत्र व्यक्ती (ज्यांचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त आहे) म्हणून गणली जाते. आपण कुटुंबातील व्यक्तींच्या संदर्भात असे बरेच व्यवहार करतो, की ज्यामुळे प्राप्तिकर कायद्यातील तरतुदींचे पालन आपल्याकडून होत नाही. नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटी कलम ५६ नुसार करपात्र नाहीत; त्या भेटींवर भेट देणारा किंवा भेट घेणारा दोघांपैकी कुणालाही कर भरावा लागत नाही. या लेखात अशा भेटींच्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी प्राप्तिकर कायद्यातील तरतुदी काय आहेत ते बघू या.
आपले पसे कुटुंबातील व्यक्तीच्या खात्यात जमा करावयाच्या आणि त्यांच्या खात्यातून गुंतवणूक करावयाची म्हणजे त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आपल्याला कर भरावा लागणार नाही.. असा साळस विचार करणारे बरेच सापडतील. घरातील इतर सदस्यांचे उत्पन्न किमान करपात्र मर्यादेच्या उत्पन्नापेक्षा कमी आहे त्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर (खात्यात जमा केलेल्या रकमेवर) त्यांना सुद्धा कर भरावा लागणार नाही, अशीही बऱ्याच जणांची खुळी समजूत असते. जे सेवानिवृत्त होतात आणि त्यांना भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी, रजेची भरपाई वगरे मिळून मोठी रक्कम मिळते, त्यांचा असा कल असतो की, थोडे पसे आपल्या खात्यात, थोडे पत्नीच्या खात्यात आणि काही मुलांच्या खात्यात असे विभागून ठेवावेत. जेणेकरून करदायित्व कमी होईल. या प्रकारचे व असे अनेक व्यवहार कुटुंबातील सदस्यांबरोबर होत असतात. उदाहरणादाखल आणखी काही व्यवहार खालील प्रमाणे :
० घर स्वतच्या नावे असतांना त्या घराचे भाडे पत्नी किंवा पतीच्या नावे घेणे
० पसे अजाण मुलाच्या नावाने भेट म्हणून देणे
० घर किंवा इतर मालमत्ता पत्नी किंवा पतीच्या नावाने करून देणे
० पती आणि पत्नीच्या संयुक्त नावाने घर असल्यास भाडे उत्पन्न फक्त एकाच नावाने दाखवणे
असे व्यवहार करून करदायित्व कमी करता येत नाही. अशा व्यवहारांसाठी प्राप्तिकर कायद्यात काही तरतुदी आहेत. प्राप्तिकर कायद्यात काही व्यवहारांमध्ये कलम ६४ मध्ये पती, पत्नी, किंवा अजाण मुले इत्यादींचे उत्पन्न करदात्याच्या उत्पन्नात गणण्याची तरतूद आहे.
पती किंवा पतीचे उत्पन्न :
पती किंवा पत्नीने आपली मालमत्ता मोबदल्याशिवाय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आपल्या पती किंवा पत्नीला हस्तांतरीत केली तर त्यापासून मिळणारे उत्पन्न हे मालमत्ता हस्तांतरित करणाऱ्या व्यक्तीला करपात्र असते. उदा. पतीने एक घर पत्नीच्या नावाने कोणत्याही मोबदल्याशिवाय हस्तांतरित केले, त्या घराचे भाडे जरी पत्नीच्या नावाने आले तरी ते उत्पन्न पतीच्या उत्पन्नातच दाखवावे लागते आणि त्या उत्पन्नावर पतीला कर भरावा लागतो.
याला काही अपवाद आहेत. (१) लग्नाआधी, होणाऱ्या पतीला किंवा पत्नीला मालमत्ता हस्तांतर केली तर ही तरतूद लागू होत नाही. (२) वेगळे राहण्याच्या करारानुसार मालमत्ता हस्तांतरित केली तर (३) पती आणि पत्नी हे संबंध राहिले नसतील तर त्यावर मिळणारे उत्पन्न दुसऱ्याच्या उत्पन्नात मिसळले जात नाही.
मुलाच्या पत्नीचे उत्पन्न :
एखाद्या व्यक्तीने आपली मालमत्ता मोबदल्याशिवाय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आपल्या मुलाच्या पत्नीला हस्तांतरीत केली तर त्या पासून मिळणारे उत्पन्न हे मालमत्ता हस्तांतरित करणाऱ्या व्यक्तीला करपात्र असते. उदा. एका व्यक्तीने आपले घर मुलाच्या पत्नीच्या नावाने कोणत्याही मोबदल्याशिवाय हस्तांतरित केले, त्या घराचे भाडे जरी मुलाच्या पत्नीच्या नावाने आले तरी ते उत्पन्न त्या व्यक्तीच्या उत्पन्नातच दाखवावे लागते आणि त्या उत्पन्नावर त्या व्यक्तीला कर भरावा लागतो.
व्यक्ती किंवा व्यक्तीच्या गटाला (AOP) मिळणारे उत्पन्न :
एखाद्या व्यक्तीने आपली मालमत्ता मोबदल्याशिवाय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या दुसऱ्या व्यक्तीला किंवा व्यक्तीच्या गटाला (AOP), पतीच्या किंवा पत्नीच्या किंवा मुलाच्या पत्नीच्या लाभासाठी हस्तांतरीत केली तर त्यापासून मिळणारे उत्पन्न हे मालमत्ता हस्तांतरित करणाऱ्या व्यक्तीला करपात्र असते. खासगी संस्था (PRIVATE TRUST) देखील स्थापन केली जाते. जेणेकरून त्या पासूनचे उत्पन्न हे पतीच्या किंवा पत्नीच्या किंवा मुलाच्या पत्नीच्या लाभासाठी वापरले जाते. अशा संस्थेला मिळालेले उत्पन्न हे मालमत्ता हस्तांतरित करणाऱ्या व्यक्तीला करपात्र असते.
हिंदू अविभक्त कुटुंबाचे उत्पन्न :
एखाद्या व्यक्तीने आपली आपली मालमत्ता कोणताही मोबदला न स्वीकारता हिंदू अविभक्त कुटुंबाच्या नावाने हस्तांतरित केली असेल तर त्यापासून मिळणारे उत्पन्न हे त्या व्यक्तीचे उत्पन्न म्हणून गणले जाते.
मालमत्ता हस्तांतरित न करता उत्पन्न हस्तांतरित करणे :
कलम ६० नुसार मालमत्ता हस्तांतरित न करता फक्त उत्पन्न हस्तांतरित केले तर असे उत्पन्न हस्तांतरित करणाऱ्याला कर भरावा लागतो. उदा. घर पतीच्या नावे आहे आणि त्यापासून मिळणारे घरभाडे उत्पन्न पत्नीच्या नावाने घेतले तरी ते घरभाडे उत्पन्न पतीच्याच उत्पन्नात गणले जाते.
पालकांना दिलेल्या भेटींवरील उत्पन्न:
मुलाने किंवा मुलीने त्यांच्या पालकांना जर भेट दिली आणि त्यावर त्यांना उत्पन्न मिळाले तर ते उत्पन्न भेट देणाऱ्याच्या उत्पन्नात गणले जात नाही. अशा उत्पन्नाला कलम ६४ च्या तरतुदी लागू होत नाहीत. हे उत्पन्न पालकांच्या उत्पन्नात गणले जाते. पालक जर ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना ३००,००० रुपयांच्या उत्पन्नावर आणि अति ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यावर ५००,००० रुपयांपर्यंत उत्पन्नावर कर भरावा लागत नाही.
सजाण मुलाला मिळालेल्या भेटींवरील उत्पन्न:
तसेच एखाद्या व्यक्तीने त्याच्या सजाण मुलाला किंवा मुलीला (ज्यांचे वर १८ वर्षांपेक्षा जास्त आहे) जर भेट दिली आणि त्यावर त्यांना उत्पन्न मिळाले तर ते उत्पन्न भेट देणाऱ्याच्या उत्पन्नात गणले जात नाही. अशा उत्पन्नाला कलम ६४ च्या तरतुदी लागू होत नाहीत. हे मुलांचे उत्पन्न गणले जाते.
करनियोजनाने बचाव शक्य..
करनियोजन करताना वरील तरतुदींचा विचार अवश्य करावयास हवा. वरील तरतुदींचे उल्लंघन झाले तर अशा उत्पन्नावर कराशिवाय थकविलेल्या कालावधीसाठी व्याज आणि दंड भरावा लागेल. काही व्यवहार असे आहेत की वर सांगितलेल्या कलम ६४ च्या तरतुदींच्या बाहेर आहेत. करनियोजन करतांना खालील बाबी महत्वाच्या आहेत:
योग्य मोबदला घेऊन केलेले हस्तांतरण :
कलम ६४ च्या तरतुदी मालमत्ता मोबदल्याशिवाय हस्तांतरित केल्या तर लागू होतात. जर मालमत्ता योग्य मोबदला घेऊन हस्तांतरित केली तर त्यावर मिळणाऱ्या उत्पन्नावर मालमत्ता हस्तांतरित करणाऱ्याला कर भरावा लागत नाही.
उत्पन्नातून मिळालेले उत्पन्न:
कलम ६४ प्रमाणे मोबदल्याशिवाय हस्तांतरित केलेल्या मालमत्तेवर मिळालेल्या उत्पन्नाचा समावेश होतो. परंतु या उत्पन्नावर मिळालेल्या उत्पन्नाचा समावेश कलम ६४ मध्ये होत नाही. उदा. पतीने पत्नीच्या नावाने २००,००० रुपये बँकेच्या मुदत ठेवीमध्ये गुंतविले. त्यावर पत्नीला २०,००० रुपये व्याज मिळाले. हे व्याज कलम ६४ प्रमाणे पतीच्या उत्पन्नात गणले जाते आणि त्यावर पतीला कर भरावा लागतो. पत्नीने व्याजाचे मिळालेले २०,००० रुपये दुसऱ्या मुदत ठेवींमध्ये गुंतविले. दुसऱ्या वर्षी पत्नीला पतीने दिलेल्या २००,००० रुपयांवर २०,००० रुपये इतके व्याज मिळाले आणि तिने गुंतविलेल्या २०,००० रुपयांवर २,००० रुपये इतके व्याज मिळाले. दुसऱ्या वर्षी सुद्धा २००,००० रुपयांवर (जे पतीने दिले आहेत) मिळालेले २०,००० रुपयांचे व्याज हे पतीच्या उत्पन्नात गणले जाईल. मात्र २,००० रुपयांचे व्याज हे पत्नीच्या उत्पन्नात गणले जाईल. हे उत्पन्न पतीच्या उत्पन्नात गणले जात नाही.
करमुक्त रोखे किंवा खात्यात गुंतवणूक:
अजाण मुलांच्या नावाने पसे करमुक्त रोखे किंवा खात्यात गुंतविले (उदा. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), करमुक्त रोखे इत्यादी) तर त्यावरील व्याज करमुक्त असल्यामुळे ते आई किंवा वडिलांच्या उत्पन्नात गणले जात नाही. आता पीपीएफमध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा प्रतिवर्षी दीड लाख रुपये इतकी आहे. स्वतच्या आणि अजाण मुलांच्या नावाने पीपीएफ खात्यात (दोघांच्या खात्यात मिळून) वार्षकि दीड लाख रुपये इतकेच गुंतविता येतील, हे मात्र लक्षात घ्यावे.
अजाण मुलांचे उत्पन्न आणि कर-भार:
अजाण मुलाला (ज्यांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे) मिळालेले उत्पन्न हे आई किंवा वडिलांचे उत्पन्न म्हणून गणले जाते. ज्यांचे उत्पन्न जास्त आहे त्यांना त्यांच्या उत्पन्नात अजाण मुलांचे उत्पन्न मिळवून त्यावर कर भरावा लागतो. एकदा अजाण मुलाचे उत्पन्न एका पालकाच्या उत्पन्नात दाखविले, तर पुढील वर्षी दुसऱ्या पालकाच्या उत्पन्नात दाखवायचे असल्यास प्राप्तिकर अधिकाऱ्याला सूचित करावे लागते. हे उत्पन्न आई किंवा वडिलांनी दिलेल्या भेटीवर आधारित असले पाहिजे, अशी अट नाही. याला काही अपवाद आहेत. (१) अजाण मुलाने जर उत्पन्न अंग मेहनत, हुशारी, कौशल्य, विशेष ज्ञान, अनुभव याद्वारे मिळवले असेल तर ते उत्पन्न आई किंवा वडिलांच्या उत्पन्नामध्ये गणले जात नाही. (२) जर मुल अपंग असेल तर त्याला मिळणारे उत्पन्न आई किंवा वडिलांच्या उत्पन्नामध्ये गणले जात नाही.
जोपर्यंत मुलगा किंवा मुलगी अजाण आहे तोपर्यंत त्याचे उत्पन्न आई किंवा वडिलांच्या उत्पन्नात मिसळले जाते. आणि ज्या वर्षी त्याचे वयाची १८ वर्षे पूर्ण करेल त्या वर्षांपासून हे उत्पन्न आई किंवा वडिलांच्या उत्पन्नामध्ये गणले जात नाही. जर आई आणि वडिलांचा घटस्फोट झाला असेल तर मुलाचा सांभाळ ज्याच्याकडे आहे त्याच्या उत्पन्नात मुलाचे उत्पन्न दाखवावे लागते. मुलांचा हा संदर्भ सावत्र मुले आणि दत्तक मुलांनाही लागू होतो.
अजाण मुलांचे उत्पन्न आई किंवा वडिलांच्या उत्पन्नात गणताना प्रत्येक मुलासाठी कमाल १,५०० रुपयांची सूट मिळते. ही सूट फक्त दोन मुलांसाठीच मिळू शकते. उदा. जर अजाण मुलांच्या नावाने मुदत ठेवींमध्ये पसे गुंतविले आणि त्यावर १२,००० रुपये इतके व्याज मिळाले तर १०,५०० रुपये (१२,००० वजा १,५०० रुपये) उत्पन्न आई किंवा वडिलांच्या उत्पन्नात (ज्यांचे उत्पन्न जास्त आहे) गणले जाईल.
– प्रवीण देशपांडे, pravin3966@rediffmail.com
लेखक सनदी लेखाकार आहेत