अमेरिकेच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाचा दिवस जसा जवळ येत आहे तसा गुंतवणूकदारांचा धीर खचत चालला आहे. बाजारात रोज नैराश्याची नव्याने लाट येत असल्याचे दिसत आहे. एका अर्थी हे चांगलेच आहे की, बाजाराने ट्रम्प यांच्या विजयाची शक्यता गृहीत धरली आहे. उद्या ट्रम्प विजयी झालेच तर बाजाराला तो ‘ब्रेग्झिट’सारखा सर्वस्वी अनपेक्षित निकाल नसल्याने पडझड कमी असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ प्रश्न विचारू लागला. ‘‘राजा मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाचा दिवस जसा जवळ येत आहे तसा गुंतवणूकदारांचा धीर खचत असल्याचे दिसत असून बाजारात रोज नैराश्याची नव्याने लाट येत असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत सामान्य गुंतवणूकदारांनी नेमके काय करावे असा प्रश्न गुंतवणूकदार समुदायास पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर तू सांगितले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील,’ वेताळाने राजाला सांगितले.

‘बाजाराला अनिश्चितता कधीच पसंत नसते. आज बाजार नेमका याच मानसिकेत आहे Known devil is better than unknown angel ही म्हण तुला ठाऊक असेल. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या दोन प्रमुख दावेदारांपैकी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या वक्तव्यामुळे बाजाराला सैतान व डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन या देवदूत वाटत असल्या तरी परिस्थिती वेगळी आहे. चिनी माकडाची खोटी न ठरणारी भविष्यवाणी व दिल्लीत हिंदू सेनेने अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणुकीच्या निकालाआधीच त्यांच्या विजयाच्या शुभेच्छा देणे ही लक्षणे बाजाराला धडकी भरावी अशीच आहेत. रिपब्लिकन हे पारंपरिक विचारांचा पगडा असलेले तर पक्षाचे डेमोक्रॅट हे आधुनिक विचारांचे असा समज असतो. जेव्हा या युद्धाच्या तुताऱ्या फुंकल्या गेल्या तेव्हा दोन उमेदवार एकमेकास तुल्यबळ वाटले नाहीत. हिलरी क्लिंटन यांची छबी जगाला परिचित होती. आर्कान्सा राज्याच्या ‘फर्स्ट लेडी’नंतर अमेरिकेच्या ‘फर्स्ट लेडी’, नंतर सेनेटर व ओमाबा प्रशासनात परराष्ट्र मंत्री या नात्यांनी त्यांचा समाजात वावर होता. त्यांची अमेरिकेच्या परराष्ट्र, आरोग्य, अंतर्गत सुरक्षा व संरक्षण विषयक धोरणे सगळ्यांना ज्ञात होती तर ट्रम्प ही नवखी छबी असल्याने सुरुवातीला मतदारांची पसंती हिलरी क्लिंटन यांना मिळाल्याचे दिसून आले. समाजात स्वत:ला अभिजन समजणारा वर्ग असतो. तृतीय पानी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारा हा वर्ग समाजाचे नेतृत्व आपण करीत असल्याच्या थाटात वावरत असतो. हा वर्ग नेहमी उर्वरित समाजघटकांवर आपली मते लादत असतो. हिलरी या वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. तर डोनाल्ड ट्रम्प हे या बाबतीत नवखे व दरबारी राजकारणात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे मुखवटे परिधान न करणारे. दोन उमेदवारांच्या जाहीर वादविवादात हिलरी जिंकल्याचे चित्र उभे राहिले. ३५ टक्के मतदारांची पसंती डोनाल्ड ट्रम्प यांना तर हिलरी क्लिंटन यांना ४५ टक्के मतदारांचा कौल होता. जशी मतदानाची तारीख जवळ आली तसे हे चित्र पालटले व शेवटच्या मतदानपूर्व चाचणीत डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतल्याचे दिसले. साहजिकच बाजाराला हादरे बसायला सुरुवात झाली,’ राजा म्हणाला.

‘अमेरिकेत मंगळवारी मतदान असल्याने बुधवारी आपला बाजार उघडेल तेव्हा मतदानोत्तर चाचण्यांचे पडसाद उमटलेले दिसतील. डोनाल्ड ट्रम्प यांचे पारडे सध्या भारी वाटत असल्याने बाजाराला धडकी भरली आहे. एका अर्थी हे चांगलेच झाले. बाजाराने डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची शक्यता गृहीत धरल्याने उद्या डोनाल्ड ट्रम्प खरोखरीच विजयी झाले तर बाजाराला तो ‘ब्रेग्झिट’सारखा सर्वस्वी अनपेक्षित निकाल नसल्याने पडझड कमी असेल. काही पोर्टफोलिओ मॅनेजर्सनी निफ्टी ७,८०० पर्यंत घसरला तरी हरकत नाही, अशी भक्कम तटबंदी उभारली आहे. बाजारात यशस्वी होण्यासाठी असे धोरण असावे लागते. बाजारात जरी घसरण झाली तरी आपली अर्थव्यवस्था पाहता बाजारात पोत्याने खरेदी करण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळेल. बाजार खरोखरीच मोठय़ा घसरणीला सामोरा गेला तरी घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही. सहा-आठ महिन्यांत झालेली घसरण सहज भरून निघेल. अमावास्येला रवि-चंद्राची युती असते व पौर्णिमेला सूर्य-चंद्र हे एकमेकांच्या समोर १८० अंशात असतात. त्यामुळे आपणास अंधार दिसतो. अमावास्येला चंद्र नाही असे वाटते व पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसतो. समुद्राला सर्वात मोठी भरती अमावास्येच्या दिवशीच येत असते तर ओहोटी पौर्णिमेला,’ राजाने खुलासेवार सांगितले.

‘निवडणूक सभेतील उमेदवारांची वक्तव्ये किती गंभीरपणे घ्यायची हे ज्याचे त्याने ठरवायचे. एन्रॉन अरबी समुद्रात बुडविण्याच्या घोषणा करणाऱ्यांनी सत्तेवर आल्यावर एन्रॉनला पुनरुज्जीवित केले. दाऊदच्या मुसक्या बांधण्याची भाषा करणाऱ्यांच्या घोषणा सत्तेवर आल्यावर हवेत विरल्या हे विसरू नकोस. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे बाजार कोसळला तरी ती प्रासंगिक प्रतिक्रिया असेल,’ राजा म्हणाला. अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.

 

gajrachipungi@gmail.com