एशियन पेंट्स ही भारतातील सर्वात मोठी रंगांची कंपनी असून आशिया खंडातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. सजावटीचे रंग, औद्योगिक रंग आणि रसायने अशा तीन प्रमुख विभागांत कंपनी आपली उत्पादने करते. ब्ल्यू चिप कंपनी म्हणून ओळखली जाणाऱ्या या कंपनीचे ३० सप्टेंबर २०१३ रोजी समाप्त तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर झाले.  कंपनीच्या नक्त नफ्यात ३६.६६% वाढ होऊन तो ३२४.८४ कोटी रुपयांवर गेला आहे. भागधारकांना ११०% अंतरिम लाभांशही कंपनीने दिला आहे. कंपनीने गेल्या तिमाहीत आपल्या एशियन पेंट्स इंटरनॅशनल या उपकंपनीमार्फत बर्जर इंटरनॅशनल लिमिटेड या सिंगापूरस्थित कंपनीतील २५.७२% हिस्सा ताब्यात घेऊन तो ९४.९% वर नेला आहे. स्लीक इंटरनॅशनल या घर सजावट करणाऱ्या कंपनीतही एशियन पेंट्सने ५१% गुंतवणूक केली आहे. फेब्रुवारी महिन्यात भारतातील तिचे सातवे उत्पादन केंद्र खंडाळा येथे सुरू झाले. तसेच रोहटक येथील उत्पादन क्षमता ५०,००० किलो लिटरवरून दोन लाख किलो लिटपर्यंत वाढवण्यात आली आहे. गेल्या आíथक वर्षांत एकूण नक्त नफ्यापकी सुमारे ४९% लाभांश देणाऱ्या या कंपनीने एशियन पेंट्स होम सोल्यूशन्स ही पहिली ब्रँडेड सेवा सुरू केली आहे. जगभरातील एकूण १७ देशांत मनाचे स्थान पटकावलेल्या एशियन पेंट्सची एकूण २५ उत्पादन केंद्रे असून, ६५ देशांना ही कंपनी आपली उत्पादने पुरवित आहे. मंदीच्या परिस्थितीतही कंपनीकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा असून केवळ ०.०७ कर्ज/भांडवल गुणोत्तर असलेली ही कंपनी तुम्हाला किमान १५% परतावा एका वर्षांत देऊ शकेल.