डॉ. आशीष थत्ते
रॉबर्ट कॅप्लन आणि डेविड नॉर्टन यांनी १९९२ मध्ये जेव्हा संतुलित गुणपत्रकाची संकल्पना मांडली, तेव्हा व्यवस्थापनाच्या जगात जणू क्रांतीच झाली. यथावकाश अमेरिका आणि युरोपातील कंपन्यांनी संतुलित गुणपत्रकाचा उपयोग करून उद्योगांचा विस्तार केला आणि जगाचे लक्ष वेधून घेतले. आपल्याकडे देखील कित्येक लहान-मोठय़ा कंपन्या आपला उद्योग-व्यवसाय वाढवण्यासाठी याचा उपयोग करू लागले आहेत. काही कंपन्या याचा उपयोग संकल्पना म्हणून तर काही प्रत्यक्षात वापरू लागले आहेत. आपण अशा प्रकारचे स्कोअरकार्ड वर्षांनुवर्षे वापरतो. मात्र श्रेय अमेरिकेला जाते. अर्थात त्यांचे ते कौशल्य होते की, अशा प्रकारच्या संकल्पनांना त्यांनी उद्योगात वापरले आणि ते प्रयोग यशस्वी केले.

आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांचे सतत प्रशिक्षण केले पाहिजे, असे संतुलित गुणपत्रकात सांगितले आहे. पूर्वी कर्मचारी कंपनी सोडून गेले तर काय? म्हणून कंपन्या प्रशिक्षणाचे कार्य करत नव्हत्या. कारण अशा प्रशिक्षित कर्मचाऱ्यावर केलेला खर्च वाया जातो आणि नवीन कर्मचाऱ्यावर अजून खर्च करावा लागतो. चांगल्या प्रशिक्षणाबरोबरच अंतर्गतव्यवस्था देखील चांगली करून घेणे आवश्यक आहे. यामुळे कंपन्यांचा नफा आणि विक्री वाढत जातील असे कॅप्लन आणि नॉर्टन यांनी सांगितले. म्हणजे विक्री आणि नफा हे मूळ उद्दिष्ट नसून प्रशिक्षण आणि अंतर्गतव्यवस्था हे मूळ उद्दिष्ट आहे. विक्री, नफा किंवा ग्राहक देखील आपोआप येतील. जर अंतर्गतव्यवस्था आणि प्रशिक्षित कर्मचारी असतील. म्हणजे प्रशिक्षण हे अग्रभागी असणारे उद्दिष्ट (ऑब्जेक्टिव्ह) असावे आणि विक्री व नफा हे मागून येणारे किंवा आपोआप येणारे उद्दिष्ट असावे.

वर्ष १९९२ ते अगदी २००० पर्यंत तुम्ही बँकेत गेल्यावर तुम्हाला काय अनुभव यायचा? त्यावेळी बँकेतील आपले काम करून निघून जात होतो. आता मात्र बँकेतील कोणताही कर्मचारी कामाच्या निमित्ताने क्रेडिट कार्ड, कर्ज योजना, विमा योजना आणि इतर बँकेतील योजनांची माहिती देतो. कारण याबाबत त्यांनी प्रशिक्षण घेतलेले असते. कोणत्या ग्राहकाला काय सांगितले पाहिजे किंवा कोणत्या योजना दिल्या पाहिजेत. यामुळे कित्येक सेवा व उत्पादन कंपन्यांमध्ये प्रशिक्षण व अंतर्गतव्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला जातो. भारतात कित्येक कंपन्या संतुलित गुणपत्रकाचे शात्रोक्त पद्धतीने पालन करतात आणि त्यामध्ये यशस्वी आहेत.

आपण देखील कुटुंब म्हणून असेच शिक्षण (प्रशिक्षण) व संस्कार (अंतर्गतव्यवस्था) या मूलभूत गोष्टींकडे लक्ष देतो. पैसे कमावणे असे सामान्य किंवा श्रीमंत घरात देखील काही मूळ उद्दिष्ट असते असे नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा महात्मा गांधीजींनी देखील याकडे लक्ष द्यायला सांगितले होते. आजही आपण कित्येक पालक असे बघतो जे स्वत:ची कारकीर्द कदाचित मागे ठेवून मुलांना शिक्षण देण्यासाठी धडपडत असतात. कुठल्याही देशाची अर्थव्यवस्था ही देशातील तरुणांच्या शिक्षणावर अवलंबून असते. ‘शिकून मोठा हो’ किंवा ‘भरपूर शिक्षण घे’ असे कुटुंबातील थोर मंडळी सांगतात. तेव्हा त्यांचा अप्रत्यक्ष कल हा नंतर आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल असा असतो. वेळेवर औषधे घ्या किंवा रोज व्यायाम करा असे डॉक्टर सांगतात म्हणजे नंतर तब्येत सुधारेल असा असतो.

जे व्यवस्थापन आपण किती तरी अजाणतेपणे करत होतो ते संतुलित गुणपत्रकात औपचारिकरीत्या उद्योगांसाठी आणण्याचे श्रेय कॅप्लन व नॉर्टन ह्यांना जाते. तेव्हा आपले व आपल्या आयुष्याचे संतुलित गुणपत्रक स्वत:च आखा!
लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाउंटंट म्हणून कार्यरत / ashishpthatte@gmail. Com / @AshishThatte

Story img Loader