बामर लॉरी ही विविध क्षेत्रात कार्यरत असणारी सार्वजनिक क्षेत्रातील एकमेव मल्टी-टेक्नॉलॉजी पब्लिक सेक्टर कंपनी असेल. इंडस्ट्रियल पॅकेजिंग, लॉजिस्टिक्स, पर्यटन आणि ग्रीज् व ल्युब्रिकन्ट्स अशा अनेक उद्योगांत गेली अनेक वर्ष ही कंपनी आपले पाय भक्कम रोवून उभी आहे. मुंबईखेरीज कोलकाता, चेन्नई, मथुरा आणि सिल्वासा येथील प्रकल्पांतून उत्पादन घेणाऱ्या बामर लॉरीची भारतात अनेक कार्यालये आणि सेवा केंद्रे आहेत. कंपनीची भारतात आणि परदेशात अनेक संयुक्त भागीदारीचे उपक्रम सुरू असून ब्रिटन आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये देखील कार्यालये आहेत. इंडस्ट्रियल पॅकेजिंग मध्ये २०० लिटर्सचे स्टील ड्रम्स उत्पादन करणारी भारतातील ही सर्वात मोठी कंपनी असून तिची भारतभरातून विपणन केंद्रे आहेत. सुरक्षित आणि उत्तम पॅकेजिंग म्हणून हे स्टील ड्रम्स केमिकल्स, तेल, ग्रीज, अन्न पदार्थ इ. साठी वापरले जातात. कंपनीचे ग्रीज आणि लुब्रीकंट हे बामेरोल या ब्रॅंड नावाने प्रसिद्ध असून ते मुख्यत्वे वाहन, मरीन आणि इतर इंडस्ट्रीजमध्ये वापरले जाते. ट्रॅव्हल्स आणि टुरिझममध्येही आंतरराष्ट्रीय हवाई सेवा क्षेत्रात बामर लॉरी ही सर्वात मोठी कंपनी गणली जाते. स्टील, खाणकाम, वाहन उद्योग, रेल्वे तसेच सुरक्षा क्षेत्रातही कंपनीच्या उत्पादनांचा वापर होतो. इतर देशांच्या तुलनेत भारतातील आयात निर्यात कमी आहे. परंतु येत्या काही वर्षांत भारत आíथक महासत्ता होणार हे भाकीत खरे ठरले तर आयात निर्यात प्रचंड प्रमाणात वाढेल. एकूणच देशाच्या आíथक प्रगतीप्रमाणे कंपनीचीही भरभराट होणार हे नक्की. कंपनीचे संपूर्ण आíथक वर्षांचा आर्थिक ताळेबंद अद्याप जाहीर व्हायचा असला तरीही डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या विक्रीत १२% वाढ होऊन ती ७१२.१८ कोटींवर गेली आहे तर नक्त नफ्यात ६६% वाढ होऊन तो ३६.२४ कोटीवर गेला आहे. लॉजिस्टिक्स, ल्युब्रिकन्ट्स आणि पर्यटन या तिन्ही क्षेत्रांना अच्छे दिन येणार असल्याने मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी बामर लॉरीचा जरूर विचार करावा.

सूचना : लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये कुठलीही गुंतवणूक नाही तसेच या कंपनीशी कुठलाही संबंध नाही. सुचवलेल्या कंपनीकडून लेखकाने कुठलेही मानधन घेतलेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा