आपल्या जोडीदाराचा ‘कर’ हातात असताना ‘कर नियोजना’चा विषय काढला जाणे प्रथमदर्शनी रुक्ष वाटेल. पण लग्नानंतर जसे अनेक बाबतीत नियोजन आवश्यक असते तसे लग्नापूर्वी देखील एखाद्या मुलाने किंवा मुलीने गुंतवणूक नियोजन केले तर प्राप्तिकर वाचू शकतो..

आजच्या लेखाचे शीर्षक वाचल्यावर वाचकांच्या मनात असा विचार येईल की प्राप्तिकर नियोजनाच्या विषयामध्ये हे लग्न, लग्नाची बेडी या गोष्टी कशा काय संबंधित आहेत? पण वस्तुस्थिती अशी आहे की लग्नाला उभे असलेल्या मुलाने अथवा मुलीने प्राप्तिकर कायद्यातील विशिष्ट तरतुदीचा उपयोग करून पूर्वनियोजन करून गुंतवणुकीची आखणी केली तर प्राप्तिकर वाचवता येईल आणि ‘क्लिबग ऑफ इन्कम’ची तरतूदही लागू होणार नाही.
प्राप्तिकर कायद्यातील विविध तरतुदींचा, कलमांचा प्राप्तिकर वाचवण्यासाठी उपयोग करून घेता येतो. या तरतुदींचा, कलमांचा उपयोग करून घेण्याबरोबर अजून एक कायदेशीर तंत्र प्राप्तिकर दात्यांसाठी उपलब्ध आहे. ते म्हणजे उत्पन्नाची घरातील व्यक्तीच्या नावे विभागणी करणे. प्राप्तिकर कायद्यानुसार कर-निरधारण वर्ष २०१६-१७ ( म्हणजे आíथक वर्ष २०१५-१६) साठी प्रत्येक व्यक्तीला रुपये २,५०,००० पर्यंतचे उत्पन्न करमुक्त मिळते. याचा अर्थ कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडून २,५०,००० रुपयांपर्यंतचे करमुक्त उत्पन्न घरात येऊ शकते. पण असे करताना कलम ६४ अंतर्गत ‘क्लिबग ऑफ इन्कम’ची तरतूद लागू होणार नाही याची काळजी घ्यावी लागते.
‘क्लिबग ऑफ इन्कम’ न होता एकूण उत्पन्नाचे कुटुंबातील इतर व्यक्तीमध्ये विभाजन होऊन प्राप्तिकर वाचवता येईल का? या प्रश्नाचे उत्तर एक उदाहरण घेऊन समजून घेऊया.
समजा एखादी अविवाहित व्यक्ती (मग ती पुरुष असेल अथवा स्त्री) प्राप्तिकरदाता आहे. ही व्यक्ती प्राप्तिकर कायद्यातील विविध वजावटी (deductions) घेऊन प्राप्तिकर वाचवते आहे. या व्यक्तीकडे गुंतवणूक करण्यास सातत्याने काही रक्कम उपलब्ध आहे. ही रक्कम त्याने स्वतच्या नावे गुंतवली तर प्राप्तिकर भरावा लागणार. या व्यक्तीचे लग्न ठरले असल्याने आयुष्याच्या भावी जोडीदाराबरोबर ऑफिस संपल्यानंतर नियमित भेटीगाठी होत आहेत, हातात हात घालून फिरणे होत आहे. आता आपल्या जोडीदाराचा ‘कर’ (म्हणजे हात) हातात असताना ‘कर नियोजनाचा’ विषय उपस्थित केला तर प्रथमदर्शनी ते रुक्ष वाटेल. पण लग्नानंतर जसे अनेक बाबतीत नियोजन आवश्यक असते तसे लग्नापूर्वी देखील एखाद्या मुलाने किंवा मुलीने गुंतवणूक नियोजन केले तर प्राप्तिकर वाचू शकतो. या व्यक्तीचे ज्या मुलीशी लग्न ठरले आहे तिचे स्वत:चे उत्पन्न नाही (किंवा २,५०,००० रुपयांपेक्षा खूप कमी आहे.) असे गृहित धरूया.
वरील उदाहरणात समजा लग्न ठरलेल्या मुलाने लग्नानंतर आपल्या पत्नीच्या नावे गिफ्ट म्हणून काही रक्कम दिली आणि अशी रक्कम त्याच्या पत्नीने गुंतवली तर त्या गुंतवणुकीपासून निर्माण होणारे उत्पन्न कलम ६४ नुसार ‘क्लिबग ऑफ इन्कम’च्या तरतुदी अंतर्गत त्या मुलाचे धरले जाते. म्हणजेच त्या दोघांमध्ये पती-पत्नी असे नाते असेल तरच ‘क्लिबग ऑफ इन्कम’ होते. पण त्या दोघांमध्ये गिफ्ट म्हणून रक्कम हस्तांतरित होताना पती-पत्नी हे नाते नसेल तर ते ‘क्लिबग ऑफ इन्कम’ होणार नाही. आदरणीय सुप्रीम कोर्टाने ‘फिलीप जॉन प्लास्केट थॉमस विरूद्ध. सी.आई.टी.’ ४९ आयटीआर ९७’ या खटल्यात तसा निवाडा केला आहे. या निर्णयाचा आधार घेऊन त्या मुलाने लग्नाआधी आपल्या होणाऱ्या पत्नीला रक्कम गिफ्ट म्हणून द्यावी. अशी रक्कम त्याच्या होणाऱ्या पत्नीने गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवली तर त्या गुंतवणुकीपासून निर्माण होणारे उत्पन्न त्या मुलाचे न धरता त्या मुलीचे धरले जाईल. म्हणजेच ‘क्लिबग ऑफ इन्कम’ होणार नाही. त्या दोघांचे लग्न झाल्यानंतर सुद्धा जोवर त्या गुंतवणुकीची मुदत चालू असेल तो पर्यंत ते उत्पन्न त्या मुलीचेच धरले जाईल. त्यामुळे तिच्या नावे स्वतंत्र उत्पन्न निर्माण होऊन प्राप्तिकराची स्वतंत्र फाईल तयार होईल. अशा प्रकारे आपल्या होणाऱ्या आयुष्याच्या जोडीदारांना लग्नाआधी एकमेकांना काही रक्कम गिफ्ट देऊन गुंतवणूक नियोजन करून प्राप्तिकर वाचवता येईल. त्याच बरोबर सासऱ्यांना किंवा सासूला आपल्या होणाऱ्या सुनेला तिच्या लग्नाआधी काही रक्कम गिफ्ट देऊन गुंतवणूक नियोजन करून प्राप्तिकर वाचवता येईल. असे गुंतवणूक नियोजन करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी म्हणजे एका वर्षांत ५०,००० रुपयांपेक्षा अधिक रक्कम गिफ्ट म्हणून देऊ नये. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या व्यवहाराची नोंद म्हणून गिफ्ट डीड करून ठेवावी.
गुंतवणुकीचे उत्पन्न घरातल्या घरातच राहावे यासाठी हे इन-हाऊस शेअिरग ऑफ इन्कमचे तंत्र करदात्यांसाठी उपलब्ध आहे. ज्यांना हे शक्य आहे त्यांनी या तरतुदीचा लाभ घ्यावा आणि प्राप्तिकर वाचवावा.

दत्तात्रय (वैभव) काळे
लेखक, प्राप्तिकर नियोजन सल्लागार
dattatrayakale9@yahoo.in

 

 

Story img Loader