मुंबई शेअर बाजारात बुधवारी मोठा उत्साह पाहायला मिळाला. बाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्सनं तब्बल २७० अंकांनी उसळी घेतल ५६ हजारांवर झेप घेतली आहे. सेन्सेक्स ५६ हजार ०९९ वर गेला आहे. त्यापाठोपाठ निफ्टी५० नं देखील ८० अंकांची वाढ नोंदवत १६ हजारांचा टप्पा पार केला आहे. निफ्टीनं १६ हजार ७०१ पर्यंत झेप घेतली आहे. काल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिानं तब्बल ८ महिन्यांनंतर एचडीएफसी बँकेला ग्राहकांसाठी पुन्हा क्रेडिट कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम देखील शेअर बाजारात दिसून आल्याचं अभ्यासकांचं मत आहे.
शेअर बाजारात कुणाची झाली सरशी?
आज सकाळी शेअर बाजार उघडला, तेव्हाच Nifty50 नं ०.३९ टक्क्यांची वाढ नोंदवत १६ हजार ६७८.९५ अंकांपर्यंत मजल मारली. त्याच वेळी सेन्सेक्स ०.४३ टक्क्यांनी वधारत ५६ हजार ०३२.०३ पर्यंत पोहोचला होता. HDFC बँकेला क्रेडिट कार्डची परवानगी दिल्यामुळे त्यांच्या विक्रीमध्ये तब्बल ३.०७ टक्के इतकी घसघशीत वाढ झालेली आहे. याशिवाय, बँक निफ्टी ३६ हजार १०० वर बंद झाला. एचडीएफसी बँकेपाठोपाठ अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी, टायटन, पॉवर ग्रीड यांच्या शेअर्सनी चांगली कमाई केली. तर दुसरीकडे इन्फोसिस, टाटा स्टील इंडसइंड बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्सला फटका सहन करावा लागला.
दरम्यान, एकीकडे बाजारात उसळी दिसत असताना शुगर स्टॉक्स मात्र घट दाखवत होते. केंद्र सरकार लवकरच साखरेच्या निर्यातीवरील सबसिडी काढून घेण्याची शक्यात असल्याचं वृत्त रॉयटर्सनं दिल्यानंतर हा प्रभाव बाजारात दिसून येत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. बलरामपूर चिनी, द्वारिकेश शुगर्स आणि श्री रेणुका शुगर्स यांचे शेअर्स १.३ टक्के ते ३ टक्क्यांपर्यंत खाली कोसळल्याचं दिसून आलं.