डॉ. आशीष थत्ते
उद्योगधंद्यांमध्ये संबिंदू (ब्रेक इव्हन पॉइंट) गाठणे महत्त्वाचे असते. आपणसुद्धा आयुष्यात संबिंदू गाठतो. आपल्यापैकी खूप लोक तत्त्व पाळून आयुष्य जगतात आणि यशस्वीसुद्धा होतात. तुमची तत्त्वे ऐकताना सुरुवातीला लोक कदाचित तुमची टिंगलदेखील करतात, पण चांगली तत्त्वे पाळणारे नक्कीच यशस्वी होतात. कुठल्या तरी एका वेळेला किंवा प्रसंगाला नक्की आपल्याला असे वाटते की, आपण संबिंदू गाठला आहे आणि यापुढे नक्की यशस्वी होऊ. विद्यार्थ्यांना पेपर सोडवताना लक्ष्य कितीही मार्काचे असले तरी कुठे तरी एका बिंदूवर त्यांना वाटते की, आपले लक्ष्य नक्की पूर्ण होणार. म्हणजे तुम्ही संबिंदू गाठला आहे असे समजावे. राजकारण किंवा खेळातसुद्धा असे होते. एका विशिष्ट बिंदूपर्यंत तोटय़ातच चालले आहे असे वाटत राहते किंवा आपला रस्ता चुकला असे वाटते. पण एका विशिष्ट बिंदूनंतर यश नक्की मिळते. थोडेसे तात्त्विक वाटले तरी सत्य नक्कीच असे आहे!
भौतिक गोष्टींमध्येसुद्धा संबिंदू असतो. जसे मागे म्हटल्याप्रमाणे जलद गाडी पकडण्यासाठी जेव्हा आपण धिमी लोकल सोडतो आणि एका बिंदूला जलद गाडी पुढे गेलेल्या धिम्या गाडीला गाठते आणि पुढे जाते. म्हणजे उद्योगामध्ये व्यय मागे पडून नफा पुढे जाण्यासारखेच हे असते. आपल्या फोनच्या रिचार्जसाठी जेव्हा आपण एखादा प्लॅन निवडतो तेव्हा त्यात काही रक्कम स्थिर असते व काही आपल्या वापरावर अवलंबून असते म्हणजे चल असते. किती रकमेचा प्लॅन घ्यायचा हे आपल्या वापरावर अवलंबून असते तेव्हा दोन प्लॅनमध्ये एक व्ययाचा म्हणजे खर्चाचा फरक न पडणारा बिंदू असतो आणि आपला वापर जास्त असेल तर अधिक स्थिर आकाराचा प्लॅन आपण निवडतो.
घर भाडय़ाने घेताना एक नक्की येणारा अनुभव म्हणजे की रेल्वे किंवा मेट्रोजवळच्या घराचे भाडे जास्त असते, पण स्टेशनपासून दूर असणाऱ्या घराचे भाडे बहुतेक कमी असते. कारण रोजचा येण्या-जाण्याचा खर्च व श्रमसुद्धा. आपल्याला घर निवडताना असे निवडावे लागते ज्यात दोन पर्यायांमध्ये फरक नसेल. म्हणजे अजाणतेपणी आपण स्थिर व चल व्ययाचा विचार करतो आणि पुढे वाटाघाटी करतो. रेल्वेमध्ये देखील मासिक पास काढायचा की, रोज तिकीट काढून जायचे ते आपल्या वापरावर अवलंबून असते. अजाणतेपणे दोन पर्यायांमध्ये निवडताना आपण असा बिंदू ठरवतो जेथे कुठलाही पर्याय निवडला तरी फरक नाही पडणार आणि मग आपल्या वापराप्रमाणे निर्णय घेतो. नोकरी बदलताना सुद्धा कंपन्यांमध्ये स्थिर व चल पगाराचे पर्याय असतात. आपल्याकडे जर इतर पर्याय असतील तर आपण साहजिकपणे अधिक स्थिर पगाराचा पर्याय निवडतो, कारण ते आपले उत्पन्न असते. थोडक्यात काय तर संबिंदू, स्थिर व्यय व चल व्यय वगैरे आपण रोजच वापरतो, पण बहुतेक वेळेला नकळतच!
लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटट म्हणून कार्यरत/ ashishpthatte@gmail.com / @ashishthatte