डॉ. आशीष थत्ते
‘ब्रेक इव्हन’चे मराठी भाषांतर फारच कठीण आहे म्हणून याला सध्या संबिंदू असे म्हणू. उद्योगामध्ये संबिंदू गाठणे फारच महत्त्वाचे असते. कारण खरा नफा हा त्या बिंदूनंतर असतो. ना नफा-ना तोटा अशा स्थितीत लहान उद्योगांना कदाचित लवकर येता येते. मात्र त्यांचा नफादेखील तेवढाच कमी असतो. मोठय़ा उद्योगांना मात्र संबिंदूला पोहोचेपर्यंत खूप मेहेनत घ्यावी लागते. मात्र त्यानंतर त्यांचा नफादेखील खूप मोठा असतो. मोठे उद्योग जसे की, सिमेंट, विमानसेवा किंवा नवीन उद्योगांमध्ये दूरसंचार वगैरे ज्यात सुरुवातीची गुंतवणूक प्रचंड असते. पण जेव्हा तुम्ही संबिंदूला पोहोचता तेव्हा तुम्ही खरे जिंकलेले असता. म्हणून नवीन उद्योग चालू करताना आपण संबिंदूला कधी पोहोचू याचे ठोकताळे पहिले मांडले जातात. जेवढय़ा लवकर संबिंदूला पोहोचणे म्हणजे नंतरचा नफा लवकर मिळणे. अर्थ आणि वित्त या दोन्ही शाखांमध्ये या विषयावर विपुल लिखाण केले गेले आहे. त्यामुळे त्याचे सूत्र खूप ठिकाणी वाचायला मिळेल.
संबिंदू गाठायला उद्योगांना प्रचंड मेहेनत घ्यावी लागते. कारण चुकणारे अंदाज. जेव्हा गुंतवणूक केली जाते तेव्हा काहीतरी अंदाज वर्तवून ती केली जाते. मात्र जसा काळ पुढे जातो तसे अंदाज चुकतात किंवा त्यात परिस्थितीनुसार बदल होतात. तेव्हा काहीही करून आणि कदाचित अधिक गुंतवणूक करूनदेखील संबिंदू गाठावा लागतो. कारण नफा त्याच्या पुढे असतो. याचा आणखी एक उपसिद्धांत आहे. व्ययाचा न फरक पडणारा बिंदू. म्हणजे एका विशिष्ट परिस्थितीमध्ये कुठलाही पर्याय निवडला तरी खर्च सारखाच असतो. मात्र त्यानंतर दुसरा एखादा पर्याय कमी खर्चाचा असतो. दोन्ही संकल्पना थोडय़ा वेगळय़ा असल्या तरी त्याची सूत्रे जवळपास सारखीच आहेत.
संबिंदू गाठण्यासाठी महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे स्थिर परिव्यय. जेवढा स्थिर परिव्यय कमी तेवढा संबिंदू लवकर गाठता येतो. तर दुसऱ्या बाजूला जेवढा चाल परिव्यय जास्त तेवढा संबिंदू पातळी उशिरा येते. ज्याचा आर्थिक संयम जास्त तो मोठी गुंतवणूक करू शकतो. म्हणूनच मध्यमवर्गीय उद्योग-व्यवसाय सुरू करत नाहीत. कारण त्यांचा संयम (मानसिक आणि आर्थिक) मर्यादित असतो आणि म्हणूनच मध्यमवर्गीयांमधून उद्योगात आलेल्या यशस्वी लोकांचे कौतुक देखील जास्त होते. रोजच्या जीवनात आपण कुठेतरी संबिंदू गाठायचा प्रयत्न करतो, त्याचा ऊहापोह पुढील लेखात. तुमचे काही विचार असतील तर नक्की सांगा.
लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाउंटंट म्हणून कार्यरत / ashishpthatte@gmail. com
@AshishThatte