गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारामध्ये निर्माण झालेलं चिंतेचं वातावरण गुरुवारी देखील कायम राहिलं. बुधवारी गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा देणारा शेअर बाजार गुरुवारी पुन्हा एकदा आपटला. तब्बल ११०० अंकांची घसरण नोंदवत मुंबई शेअर बाजारानं पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना धडकी भरवली. आज सकाळी मुंबई शेअर बाजार खुला होताच सेन्सेक्स ११०० अंशांनी खाली येत ५६,७४०वर पोहोचला. त्यापाठोपाठ निफ्टीही १६,९५८.८५ पर्यंत खाली उतरला. त्यामुळे गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले.
मंगळवारी सेन्सेक्सनं गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा देत थोडी वाढ दर्शवली होती. सलग पाच सत्रांतील घसरणीला विराम देत भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी मंगळवारी सकारात्मक वाढ साधली होती.
मुख्यत: युरोपीय बाजारातील अनुकूल कलामुळे निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या मारुती, अॅक्सिस बँक आणि स्टेट बँकेच्या समभागात झालेल्या खरेदीमुळे निर्देशांक सकारात्मक पातळीवर स्थिरावले होते. मात्र, त्यानंतर आज पुन्हा एकदा सेन्सेक्स घसरणीला लागला आहे.
आजच्या व्यवहारांमध्ये एचडीएफसी बँक, टायटन कंपनी, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, विप्रो, हाऊसिं डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन, इन्फोसिस यांच्या समभागांना प्रामुख्याने फटका बसला आहे. तर अॅक्सिस बँक, मारुति सुझुकी आणि इंडसइंड बँक यांना फायदा झाल्याचं दिसून आलं आहे.
अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात खळबळ ; निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये मोठी घसरण
देशाचा २०२२ सालासाठीचा अर्थसंकल्प अवघ्या काही दिवसांमध्येच मांडला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारामध्ये निर्माण झालेलं घबराटीचं वातावरण देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चिंता वाढवणारं ठरलं आहे. त्यामुळे आता अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी रोजी कोणत्या घोषणा करणार, यावर शेअर बाजारातील या घडामोडी कोणत्या दिशेने वळणार हे अवलंबून असेल.