विश्वास मनोहर हे केमिकल इंजिनीयर आहेत. वय ५० वर्षे. त्यांचा केमिकल उत्पादनांचा व्यवसाय आहे. त्यांची पत्नी सौ. वर्षां मनोहर, वय ४६ वर्षे. त्या एलएल.एम. असून दोन सहकाऱ्यांबरोबर भागीदारीत वकिली व्यवसाय करतात. त्यांना दोन मुले आहेत. मोठी मुलगी वय २२, उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली आहे. त्यासाठी त्यांनी बँकेतून रु. २० लाख शैक्षणिक कर्ज घेतले आहे. लहान मुलगा वय १८, कॉलेजमध्ये शिकत आहे.
त्यांचा स्वत:चा रु. दीड कोटी रकमेचा बंगला आहे. तो बांधण्यासाठी त्यांनी रु. ८० लाख कर्ज घेतले होते. ते आज रु. ७५ लाख बाकी आहे. स्वत:साठी रु. ११ लाखांची गाडी आहे, त्यासाठी रु. ७ लाख कर्ज बाकी आहे. पत्नीसाठी गाडी वेगळी आहे, त्यावरील कर्जाचे सर्व हप्ते पूर्ण झाले आहेत. घरातील वस्तू, फर्निचर खरेदीसाठी बँकेने कर्ज मंजूर करण्यास विलंब केल्याने पतपेढीतून रु. १५ लाख कर्ज घेतले आहे. मागील महिन्यात काही वस्तू क्रेडिट कार्डावर खरेदी केल्या आहेत. त्या व्यतिरिक्त इतर खर्च धरून क्रेडिट कार्डाची एकूण देय रक्कम रु. दोन लाख आहे.
विश्वास आणि वर्षां यांनी केलेली सर्व बचत बंगला बांधताना मोडली गेली आहे. आज त्यांच्याजवळ रु. ५ लाख बँकेत ठेव स्वरूपात आहेत. बचत खात्यांवर प्रत्येकी रु. एक लाख आहेत. दोघांची टर्म पॉलिसी प्रत्येकी रु. ५० लाख आहे. फ्लोटर मेडिक्लेम पॉलिसी कुटुंबासाठी रु. तीन लाख आहे. विश्वास आपल्या व्यवसायातून दरमहा रु. १,७०,०००/- वैयक्तिक खर्चासाठी घेतात व वर्षां आपल्या सर्व भागीदारांप्रमाणे दरमहा रु. ५०,०००/- काढून घेतात.
विश्वास यांनी आपल्या व्यवसायवृद्धीसाठी जास्तीत जास्त नफा धंद्यात जागा व यंत्रसामग्री खरेदीसाठी गुंतवला आहे. आज धंद्याची मालमत्ता रु. ५ कोटींच्या वर असून धंद्यासाठी कर्ज रु. एक कोटी आहे. त्याचे व्याज व कर्ज हप्ता धंद्याच्या उत्पन्नातून सहज फेडला जातो. दुर्दैवाने विश्वास यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन होते. विश्वास मनोहर यांच्याकडे भरपूर मालमत्ता (फिक्स्ड अॅसेट्स) आहे; परंतु तरल गुंतवणूक फक्त रु. ५ लाख म्हणजे १.२ कोटी कर्जासमोर जवळजवळ नसल्याप्रमाणेच. रु. ५० लाख आयुर्विम्याचे मिळाले तरी समोर कर्ज रु. एक कोटी आहे. शैक्षणिक कर्ज शिक्षण पूर्ण झाल्यावर मुलगी फेडू शकते.
वर्षांताई आपला वकिली व्यवसाय भागीदारांवर सोपवून केमिकल व्यवसायात लक्ष घालू लागतात. धंद्याची घडी विस्कळीत होऊ नये म्हणून सनदी लेखापालाची (सी.ए.) मदत घेतात. मार्केटिंगसाठी स्वतंत्र माणसे नेमतात. उत्पादन नीट राहण्यासाठी इंजिनीयरची नेमणूक करतात. व्यवसायाची गाडी रुळावर येण्यासाठी आठ ते दहा महिन्यांचा अवधी लागतो.
आयुर्विम्याच्या मिळालेल्या रकमेतून क्रेडिट कार्ड, वाहन आणि पतपेढीचे कर्ज फेडून टाकतात. बाकी रक्कम रु. २५ लाख तरल गुंतवणूक (इमर्जन्सी फंड) म्हणून म्युच्युअल फंडाच्या लिक्विड फंडात गुंतवतात. रु. ५ लाख बँक ठेवींसमोर कर्जसुविधा उपलब्ध करून ठेवतात. म्हणजे पुढील काही महिन्यांची घरखर्च व कर्ज हप्त्यांची सोय होते.
आर्थिक नियोजनकाराचा सल्ला :
१. आपल्या कर्जापेक्षा जास्त रकमेचा आयुर्विमा असणे आवश्यक आहे. त्यानुसार वर्षांताईंनी आपली रु. ५० लाख टर्म पॉलिसीव्यतिरिक्त अजून रु. १ कोटींचा विमा उतरवणे आवश्यक आहे.
२. कर्जफेड करताना मोठे कर्ज आधी न फेडता, जास्त व्याज असलेले कर्ज आधी फेडा. क्रेडिट कार्डावर व्याज दरमहा २ ते ३ टक्के आकारले जाते म्हणजे व्याजावर व्याज आकारून सावकारी पद्धतीने वार्षिक ४० टक्क्य़ांपेक्षा जास्त होते. वैयक्तिक कर्जावर व्याजदर १६ ते १८ टक्के असतो. वैयक्तिक कर्ज हे अनुत्पादित कर्ज स्वरूपातील असते. यापासून नवीन उत्पन्न वाढण्याची शक्यता नसते. उदा. फर्निचर, गृहवस्तू कर्ज. यानंतर वाहन कर्जावर व्याज १२ ते १३ टक्के आकारले जाते. शैक्षणिक कर्ज व वास्तू कर्ज यावरील व्याजदर सर्वात कमी असतो. कर्जफेड वेळेवर करण्यास प्राधान्य द्यावे. यामुळे आपली पत सुधारते. न केल्यास बँका ‘सिबिल’कडे आपले नाव कळवतात. त्यामुळे इतर बँका आपल्याला रेकॉर्ड खराब म्हणून कर्ज देत नाहीत.
३. व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाचा कल जास्तीत जास्त बचत पुन्हा आपल्या व्यवसायात गुंतवण्याकडे असतो, त्यामुळे मालमत्ता (अॅसेट्स) निर्माण होतात; परंतु यात मोठी रक्कम अडकून राहते. आपल्या व्यवसायातून नियमित रक्कम बाजूला काढून तरल गुंतवणूक व कर्जरोखे स्वरूपात गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
४. स्वत:चा व्यवसाय असेल तर निवृत्तीचे वय ६० नसून आपण ठरवू तितके ते पुढे सरकवता येते. त्यामुळे बहुतेक सर्व व्यावसायिक या बाबत उदासीन असतात. निवृत्तीसाठी गुंतवणूक हा विचार काही प्रमाणात वयाची साठी उलटल्यावर चालू होतो.
५. व्यवसायातून आयत्या वेळेस रक्कम बाजूला काढणे शक्य होत नाही. मुलांच्या शिक्षणाची सोय म्हणून नियमित दरमहा बचत केल्यास शैक्षणिक कर्ज घ्यावे लागणार नाही. (किंवा कमी कर्ज घ्यावे लागेल.)
विलास दाभोळकर यांनी प्रश्न विचारला आहे की, गुंतवणूक करताना काय गोष्टी विचारात घ्याव्यात?
गुंतवणूक तीन प्रकारात विभागता येते. रोकडसुलभ गुंतवणूक, कर्जरोखे आणि जोखीमयुक्त गुंतवणूक.
गुंतवणुकीस सुरुवात करताना आधी तरल किंवा रोकडसुलभ गुंतवणुकीस प्राधान्य द्यावे. ही गुंतवणूक मासिक उत्पन्नाच्या सहापट असावी. या नंतर कर्जरोखे स्वरूपातील गुंतवणूक करावी. या दोन प्रकारचे भक्कम पाठबळ तयार झाल्यावर मगच जोखीमयुक्त गुंतवणुकीकडे वळावे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गरजा विचारात घ्याव्यात. आपल्याला रक्कम दोन-तीन वर्षांत लागणार असेल तर सुरक्षित आहे म्हणून प्रॉव्हिडंट फंडात गुंतवून चालणार नाही आणि निवृत्तीची सोय म्हणून रक्कम बँकेत मुदत ठेव म्हणून ठेवणेही उपयुक्त नाही.
गुंतवणूक करण्यापूर्वी त्या योजनेची संपूर्ण माहिती मिळवावी. बहुतेकवेळा योजनेचे एजंट तोंडी माहिती सांगतात ती माहिती त्या वेळेस लक्षात राहते, नंतर राहत नाही. योजनेचे माहितीपत्रक आवर्जून मागून घ्यावे. त्या व्यतिरिक्त त्या योजनेची माहिती इंटरनेटवरून शक्य असल्यास घ्यावी. गुंतवणूक करताना घाई करू नये. ‘ही योजना बंद होणार आहे.. आज शेवटचा दिवस आहे, नंतर संधी निघून जाईल..’ असे गुंतवणूक एजंटने सांगितल्यास अशी संधी आनंदाने सोडून द्यावी. घाई-गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्णय खूपदा चुकतात. सर जॉन टेम्पलटन यांनी गुंतवणुकीचे १६ नियम सांगितले आहेत, त्यात पहिला ‘देवाची प्रार्थना करा’ असा आहे. म्हणजे मन शांत असेल तर निर्णय चुकणार नाही. आपण ज्या योजनेत रक्कम गुंतवतो ती आपली गरज असते तितकीच गरज (किंवा जास्त) गुंतवणूक योजना चालवणाऱ्या संस्थेची असते. त्यामुळे गुंतवणूक योजना चालवणाऱ्या संस्थेची असते. त्यामुळे संधी कधीच निघून जात नाही. वेगळ्या स्वरूपात आपल्यासमोर पुन्हा सादर होते. भारतात ४० म्युच्युअल फंड संस्था आहेत. आयुर्विमा कंपन्या १५-२० आहेत. बँका शंभरच्या वर आहेत. शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्या पाच हजारपेक्षा जास्त आहेत. प्रत्येक ठिकाणी भरपूर पर्याय आहेत.
गुंतवणूक केल्यावर फॉर्म सादर केल्याची पावती मागून घ्यावी. नंतर पक्की रिसिट किंवा त्या स्वरूपातील कोणताही दस्तऐवज हातात आल्यावर संपूर्ण वाचावा. मुख्यत्वे बारीक अक्षरांतील अटी तपासाव्यात.
शेवटी आपण गुंतवणूकदार म्हणजे ग्राहक आहोत. आपल्या याबाबतच्या हक्कांची माहिती करून घ्यावी.
कर्जफेडीची तत्परता
क्रेडिट कार्ड व्याजदर : २४ ते २६%
वैयक्तिक कर्ज व्याजदर : १६ ते १८%
वाहन कर्ज व्याजदर : १३ ते १५%
शिक्षण कर्ज व्याजदर : १२ ते १३%
घर कर्ज व्याजदर : १०.५ ते ११%