गेल्या आठवडय़ात निफ्टी निर्देशांकात दुरुस्तीची शक्यता वर्तविताना, ५६४० ही या दृष्टीने महत्त्वपूर्ण पातळी असल्याचे भाकीत या स्तंभाने वर्तविले होते. सरलेल्या आठवडय़ात निफ्टी निर्देशांकाने ५६३७ या नीचांकापर्यंत म्हणजे भाकीत केलेल्या पातळीपर्यंत नेमकी घसरण दाखविली. मागच्या आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तांत्रिक आलेखावर तयार झालेली ‘बेअरिश एन्गल्फिंग’ धाटणीची मंदीसदृश्य मेणबत्तीरचना आणि ऑप्शन राइटर्सकडून मिळालेल्या संकेताआधारे ‘करेक्शन’चे हे भाकीत करण्यात आले होते. तथापि निफ्टीने सरलेल्या गुरुवारीच ५६४० या महत्त्वाच्या आधार पातळीला अनेकवार धडक दिली पण अखेर निर्देशांक सावरून या पातळीच्या वर सप्ताहअखेर स्थिरावला.
एकंदर अटीतटीच्या ५६३७ या नीचांक पातळीपासून निर्देशांक गुरुवारी सावरल्यानंतर, बाजार अग्रणी इन्फोसिसच्या खराब तिमाही निकालांनी शुक्रवारी बाजाराचा कल निश्चित केला. हे निकाल एकंदर अपेक्षेच्या जेमतेम जवळपास जाणारे असले तरी, कंपनीच्या व्यवस्थापनाने प्रति समभाग मिळकतीविषयी व्यक्त केलेले आगामी भाकीत बाजाराचा घात करणारे ठरले आणि त्यापायी इन्फोसिसचा समभागही जवळपास ७ टक्क्यांनी रोडावला.
शुक्रवारीच जाहीर झालेले ऑगस्ट महिन्याचे औद्योगिक उत्पादन दराचे आकडे हे  आधीच्या जून व जुलै महिन्यातील उणे कामगिरीपेक्षा काहीसे सकारात्मक म्हणजे २.७ टक्के आले. तरीही ही बाब बाजारात अपेक्षित उत्साह निर्माण करू शकली नाही. हे आकडे बाहेर आल्यासरशी बाजारातील घसरण आणखीच विस्तारली आणि सप्ताहअखेर निफ्टी निर्देशांक आपली ५६४० या आधारपातळीच्या किंचित वर ५६७६ वर स्थिरावताना दिसला.
सोबतच्या तांत्रिक आलेखात दिसते त्याप्रमाणे भाव रेषेच्या वरच्या सीमेला छेद देण्यात अपयशी ठरल्यानंतर, निफ्टी निर्देशांक आता मिळेल तो नफा पदरी पाडून घेण्याच्या प्रवृत्तीच्या दबावाखाली सापडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. चालू आठवडय़ासाठी म्हणूनच मंदीसदृश्य भाकीत स्वाभाविकपणे कायम राहते. कारण पुट/ कॉल गुणोत्तर (पीसीआर) रोडावत आता १.०च्याही खाली गेले आहे. आलेखात दिसते त्याप्रमाणे आरएसआय आणि एमएसीडी देखील घसरणीचाच संकेत देत आहेत. त्यामुळे ५६००-५६४० या पातळ्या निफ्टीच्या घसरणीतील अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतील. या पातळ्यांखाली निफ्टी घसरला तर मग ५४५० ची पातळीही तो दाखवेल.             
सप्ताहासाठी शिफारस
* भारती एअरटेल : (सद्य दर २६०.३५ रु.)
विक्री: रु. २५७ खाली;  लक्ष्य: रु. २५०-२४४
* आयसीआयसीआय : (सद्य दर १०४५ रु.)  
विक्री : रु. १०३८ खाली;  लक्ष्य: रु. १०००
* ऑरबिंदो फार्मा : (सद्य दर १५८.५० रु.)  
विक्री: रु. १५६ खाली;  लक्ष्य: रु. १५०
गेल्या आठवडय़ातील खरेदी शिफारशीप्रमाणे, कॅस्ट्रॉल आणि आरईसीने आपापले लक्ष्य गाठून अनुक्रमे ३३७.५० आणि २३२.५० असे उच्चांक दाखविले. इंडिया बुल्स रिअल इस्टेटची शिफारस मात्र अपयशी ठरली.

Story img Loader