गेल्याच आठवड्यातील गोष्ट. मामीचा फोन आला. ‘सध्या टॅक्स-फ्री बाँड आले आहेत का?’ हा प्रश्न ती दर तीन महिन्यांनी विचारते. टॅक्स-फ्री बाँड याचा अर्थ बऱ्याच गुंतवणूकदारांसाठी आयकरात सूट मिळवून देणारे कर्जरोखे असा होतो. पण आमच्या मामीसाठी टॅक्स-फ्री बाँड म्हणजे करमुक्त व्याज देणारे कर्जरोखे. गेल्यावर्षी आरईसी, एनएचएआय अशा सरकारी कंपन्यांनी असे कर्जरोखे आणले होते. या कर्जरोख्यांवर ८% करमुक्त व्याज देण्यात आले होते. मामी शासकीय कर्मचारी म्हणून सेवा निवृत्त झाल्याने तिला महागाईशी निगडीत निवृत्ती वेतन आहे. एकूणच शिस्तबद्ध जीवन जगल्याने गाठीशी बऱ्यापकी पूंजी आहे. त्यामुळे गुंतवणुकीचे उत्पन्न व निवृत्ती वेतन मिळून ती उच्च उत्पन्न गटात मोडते. साहजिकच बँकांच्या मुदत ठेवीवर १०% व्याज मिळाले तरी हातात मात्र ७% उत्पन्न येते. म्हणूनच करमुक्त उत्पन्न देणाऱ्या कर्जरोख्यांची तिची मागणी आहे. मामांच्या निधनानंतर मामी आता एकटीच राहते. तिच्यावर कोणतीही प्रापंचिक जबाबदारी नाही.
दुसऱ्या बाजूला आहेत आमच्या शेजारी राहणारे एक परिचित काका. राज्य शासनाच्या एका महामंडळातून कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त होऊन आता त्यांना जवळजवळ १० वष्रे झाली. निवृत्ती वेतन नाही पण फंडाचे पसे बँकेत ठेऊन व्याजावर आपला व पत्नीचा चरितार्थ चालवीत आहेत. निवृत्तीच्या वेळी पुरेसे वाटणारे व्याज – आज व्याजदर चढे असूनही – पुरेसे वाटत नाही. कारण महागाई. काकींच्याच शब्दात सांगायचे तर – ‘हे रिटायर झाले तेव्हा तूर डाळ २७ रुपये किलो होती आणि आता ८८ रुपये किलो आहे.’ तपशिलात कदाचित थोडा फार फरक असेलही. पण महागाई आहे हे खरे.
या परस्परविरोधी परिस्थितीत असणाऱ्या दोन्ही व्यक्तींचा उल्लेख एकाच लेखात करण्याचे एक कारण आहे. या दोन्ही ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या गुंतवणूक सल्लागारांकडून शेअर बाजारात पसे गुंतवायचा सल्ला देण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि शेअर बाजार ही जोडीच विसंगत वाटते. ज्येष्ठ नागरिकांना स्वतचे मुद्दल सांभाळून ठेवायचे असते आणि जोखीम घेण्याची कुवत फारच कमी असते. उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असल्याने गुंतवणुका करताना जोखीम टाळण्याकडे कल असतो. शेअर बाजारात मात्र लाखाचे बारा हजार होण्याची शक्यता असते. शेअर बाजारात जास्त उत्पन्न मिळण्याची शक्यता असली तरी जोखीमही जास्त घ्यावी लागते. त्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांना शेअर बाजारात पसे गुंतवण्याच्या सल्ल्याकडे जरा जास्तच विचारपूर्वक पाहणे आवश्यक आहे. वर उल्लेख केलेल्या दोन व्यक्ती ज्येष्ठ नागरिकांच्या दोन वेगवेगळ्या वर्गाच्या प्रतिनिधी आहेत. पहिला वर्ग आहे अशा सेवानिवृत्तांचा ज्यांच्याकडे मुबलक पैसा आहे तर दुसरा वर्ग आहे अशा सेवानिवृत्तांचा ज्यांच्याकडे पसे आहेत पण महागाईपुढे हे पसे पुरेसे पडत नाहीत.
शेअर बाजारात थेट पसे गुंतवले किंवा शेअर बाजारात पसे गुंतवणाऱ्या म्युच्युअल फंडात एक वर्षांपेक्षा जास्त काळ पसे गुंतविले तर हातात मिळणारे उत्पन्न करमुक्त असते. त्यामुळे सुखवस्तू ज्येष्ठ नागरिकांना शेअर बाजारात पसे गुंतवण्याचा सल्ला दिला जातो. दीर्घ मुदतीत शेअर बाजारातून १२-१५% उत्पन्न सहज मिळेल असे एक गृहीतक मांडले जाते. पण वस्तुस्थिती वेगळी असू शकते. गेल्या ५ वर्षांत निफ्टी (इंडेक्स)मध्ये पसे गुंतवल्यास ०.६५% चक्रवाढ दराने उत्पन्न मिळाले आहे. गेल्या पाच वर्षांत डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडात जास्तीत जास्त १२.५% उत्पन्न मिळाले आहे. जास्त उत्पन्न मिळावे व महागाईवर मात व्हावी या कारणास्तव शेअर बाजारात पसे गुंतविण्याचा सल्ला दुसऱ्या वर्गातील सेवानिवृत्तांना दिला जातो. दीर्घ मुदतीत महागाईचा दर ६% असल्याचे गृहीत धरले. एकूण गुंतवणुकीपकी १०% पसे शेअर बाजारात गुंतविले. मुदत ठेवी आणि कर्जरोख्यांमध्ये गुंतविलेल्या तुमच्या एकूण बचतीपकी ९०% रकमेवर ८% उत्पन्न मिळाले व उरलेल्या पशावर शेअर बाजारात १५% उत्पन्न मिळाले तर एकूण पोर्टफोलीओवर ८.७% उत्पन्न मिळेल असे गणित मांडले जाते. वस्तुस्थिती व अपेक्षा यात जमीन-अस्मानाचा फरक असू शकतो, हे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे.
अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांनी शेअर बाजारात पसे गुंतवावेत का? हा प्रश्न राहतोच. माझ्या मामीला कदाचित शेअर बाजारात पसे गुंतवायची गरज कधीच पडणार नाही. निवृत्तीवेतन महागाईशी संलग्न असल्याने ती आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत आहे. तिचे सध्याचे उत्पन्न (गुंतवणुकांवरचे व्याज व निवृत्तीवेतन) हे तिच्या गरजेपेक्षा जास्तच आहे. त्यामुळे बचत होऊन तिच्या गुंतवणुका वाढत चालल्या आहेत. त्यामुळे तिच्या उत्पन्नवाढीचा दर हा महागाईच्या दरापेक्षा जास्त आहे. थोडक्यात सांगायचे तर तिला महागाईला मागे टाकायला कदाचित शेअर बाजारात पसे गुंतवायची गरज पडणार नाही. आता राहिला प्रश्न ‘कर मुक्त’ उत्पन्न मिळविण्याचा. तिने जर थोडी वाट पहिली तर याही वर्षी कर मुक्त बाँड्स बाजारात मिळतील. अर्थात व्याजदर कदाचित ८% पेक्षा कमी असतील. दुसरा मार्ग असेल म्युच्युअल फंडाच्या इन्कम फंडांचा. या योजनांमध्ये लाभांशावर १२.५% कर असतो तर एक वर्षांपेक्षा जास्त काळ पसे गुंतविल्यास दीर्घ मुदतीतील लाभावर कर असतो (२०% इंडेक्सेशन नंतर किंवा १०% इंडेक्सेशन पूर्वी). या योजना कर्जरोख्यामध्ये पसे गुंतवीत असतात व लाभ किती होईल हे आधीच सांगता येत नाही. दुसरा पर्याय आहे फिक्स्ड मॅच्युरिटी प्लान. या ठराविक मुदतीच्या योजना असून पसे कर्जरोख्यांमध्ये गुंतविले जातात. मधल्या काळात या योजनांमधून बाहेर पडणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे जो पसा मुदतबंद झाल्यास तुमचे अडणार नाही असाच पसा या योजनांमध्ये गुंतवू शकता. सगळ्यात महत्वाचे – केवळ चांगल्या फंड कंपन्यांच्या (एचडीएफसी, टेम्पलटन, आयडीएफसी, एसबीआय) अशा योजनांमध्ये पसे गुंतवा. कदाचित हा मार्ग मामीसारख्या ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त ठरावा.
आता आपण आमच्या काकांकडे वळूया. महागाईच्या वेगापुढे काकांच्या गुंतवणुका हळूहळू माघार घेत आहेत हे स्पष्ट आहे. त्यांना जास्त उत्पन्न देणारे मार्ग शोधावेच लागतील. काही वेळा कंपन्यांच्या मुदत ठेवी जास्त व्याजदर देताना दिसतात. पण चुकुनही जास्त व्याजाच्या हावेने आपले मुद्दल पणाला लावू नका. बाजारात ‘ट्रिपल ए’ रेटेड किंवा निवडक ‘एए’ रेटेड कंपन्यांचा मुदत ठेवी पलीकडे जाऊ नका. तरीही जास्त उत्पन्न मिळवणे ही गरज असेल तर शेअर बाजाराचा विचार करावा. शेअर बाजार म्हणजे अनिश्चितता. त्यामुळे त्यातल्या त्यात कमी जोखीमेचे मार्ग निवडावेत. डे ट्रेडिंग किंवा डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगमध्ये फायदा किती होतो ते सांगणे कठीण आहे पण जोखीम मात्र खूप जास्त असते. स्वत:ची कुवत ओळखूनच निर्णय घ्या. शेअर बाजारात पसे गुंतावायचे काही मार्ग आपण पुढील लेखात बघू.
‘धन’वाणी : ज्येष्ठ नागरिक आणि शेअर बाजार?
गेल्याच आठवड्यातील गोष्ट. मामीचा फोन आला. ‘सध्या टॅक्स-फ्री बाँड आले आहेत का?’ हा प्रश्न ती दर तीन महिन्यांनी विचारते. टॅक्स-फ्री बाँड याचा अर्थ बऱ्याच गुंतवणूकदारांसाठी आयकरात सूट मिळवून देणारे कर्जरोखे असा होतो. पण आमच्या मामीसाठी टॅक्स-फ्री बाँड म्हणजे करमुक्त व्याज देणारे कर्जरोखे.
First published on: 15-10-2012 at 01:33 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commerce dhanwanishraddha sawant senior citizen share market