श्रीकांत कुवळेकर
मागील पाच वर्षे विचारात घेतली तर, शेअर बाजारातील सध्याच्या पडझडीनंतर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीतील परतावादेखील शेअर बाजारापेक्षा सध्या सरस ठरताना दिसत आहे. कमॉडिटीकडे गुंतवणुकीचे साधन म्हणून गंभीरतेने न पाहिल्यामुळे किती नुकसान होऊ शकते हे गेल्या काही महिन्यात अशा गुंतवणूकदारांना चांगलेच अनुभवास आले आहे.
कमॉडिटी वायदे बाजारामध्ये गेल्या महिन्या-दोन महिन्यांमध्ये सोने आणि चांदी या दोन प्रमुख वस्तूंचे वर्चस्व राहिलेले दिसत आहे. जोडीला कच्चे तेल आणि निकेलसारखे काही धातू आहेत. मात्र कृषी मालाच्या बाजारात विशेष काही झालेले नाही. नाही म्हणायला कापूस या प्रमुख नगदी पिकाच्या वायदे बाजारात अमेरिकेमध्ये चांगलीच मंदी आली आहे. म्हणजे तेथील किमती भारतीय हमीभावापेक्षा चांगल्याच खाली आल्या आहेत. तरीसुद्धा येथील किमती हमीभाव पातळीच्या वरच राहिल्या आहेत.
हाजीर बाजारात सध्या कांद्याला चांगले दिवस आले आहेत आणि ते अजून निदान महिना-दीड महिना तरी राहतील अशी शक्यता आहे.
खरीप हंगामातील पिके या वर्षी एकंदरीत उशिरा येणार असली तरी कुठे कुठे काढणीला सुरुवात झाली आहे. राजस्थानमध्ये मुगाची काढणी चालू असून उत्तर भारतात नवीन कापसाचे आगमन नुकतेच सुरू झाले आहे. परंतु आद्र्रतेचे प्रमाण खूपच जास्त असल्यामुळे सुरुवातीचा माल हमीभावाच्या आसपास विकला जात आहे. उत्तर भारतातील पंजाब, हरयाणा आणि राजस्थान या तीन राज्यांत ६० लाख गाठी कापसाचे उत्पादन होते. म्हणजे देशातील एकूण उत्पादनाच्या सुमारे १५ टक्के कापूस या तीन राज्यांमधून येतो. या राज्यांमध्ये सिंचनाची व्यवस्था असल्यामुळे पेरण्या मेमध्ये आटोपतात आणि उत्पादन ऑगस्टअखेर सुरू होते. देशातील कापसाचे साठे सप्टेंबर महिन्यात सर्वात कमी असल्यामुळे उत्तर भारतात या महिन्यात नव्या कापसाला चांगला भाव मिळत असतो.
या वर्षी मात्र परिस्थिती बदलली आहे. या तीन राज्यांत मिळून एकूण उत्पादन ६४-६५ लाख गाठी होण्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. जागतिक आणि भारतातील उत्पादनात चांगलीच वाढ आणि मागणीत घट अशा दुहेरी संकटात सापडल्यामुळे कापूस बाजार मुळातच मंदीत राहण्याची शक्यता आहे. याचे सावट उत्तर भारतातील कापसावर पडताना दिसत आहे. तसेच इतर उद्योगांप्रमाणेच वस्त्रोद्योगामधील जबरदस्त मंदीमुळे व्यापारी आणि कापड गिरण्या चांगला भाव देण्याची शक्यता कमीच आहे. कापूस महामंडळ बाजारात उतरायला अजून निदान महिना लागेल. तोपर्यंतच्या काळात उत्तर भारतातील कापसाचे भाव हमीभाव पातळीवर राहिले तरी खूप झाले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
देशातील इतर भागांत कापूस वेचणीला अजून महिनाभर तरी आहे त्यामुळे बाजाराच्या एकूण चालीविषयी आताच निश्चित अंदाज काढणे योग्य ठरणार नाही. मुख्य कल मंदीचा असला तरी महामंडळाची खरेदी, अमेरिका-चीनमधील होऊ घातलेल्या चच्रेचे फलित आणि त्यामुळे आयात-निर्यात क्षेत्रातील होणारे बदल, आणि भारतातील उत्पादनाच्या शेवटच्या टप्प्यातील हवामान अशा अनेक गोष्टींचा किमतीवर परिणाम होत असल्यामुळे या महिन्याअखेर त्याविषयी या स्तंभातून सविस्तर सांगण्याचा प्रयत्न राहील.
जागतिक बाजारातील अनिश्चितता शिगेला पोहोचली आहे असे म्हणता येईल. अमेरिका आणि चीन व्यापार युद्ध बाजाराच्या सतत मानगुटीवर बसलेले असताना आता ब्रिटनचे युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेमुळे निर्माण झालेले वादळ, हाँगकाँगमधील निदर्शने, आखाती देशातील अराजक इत्यादी गोष्टी बाजार अस्थिर करताना दिसत आहेत. याचा फायदा उत्पादक, गुंतवणूकदार किंवा व्यापाऱ्यांना किती होतो ठाऊक नाही. मात्र कमॉडिटी एक्स्चेंजेसना निश्चित होतो आहे. एमसीएक्स या भारतातील प्रमुख एक्स्चेंजची उलाढाल २०१३ नंतरचे दररोजचे नवनवे विक्रम प्रस्थापित करताना दिसत आहे.
शुक्रवारी एमसीएक्सची वायदे सौद्यांमधील उलाढाल ५०,००० कोटी रुपयांहून अधिक झाली आहे, जी जून २०१३ नंतर सर्वाधिक आहे. मागील वर्षांपर्यंत दैनिक उलाढाल २०,०००-२४,००० कोटी रुपये एवढी होती. उलाढालीतील या वाढीमुळे त्या कंपनीचा शेअर ९८० रुपयांवर जाऊन आता थोडा ९०० रुपयांच्या खाली आला आहे. लवकरच तो १,००० रुपयांची पातळी गाठू शकेल.
या स्तंभाचा हेतू शेअर बाजारातील गुंतवणूक सल्ला नसला तरी एमसीएक्सचा कमॉडिटी बाजाराशी थेट संबंध असल्यामुळे त्याच्या शेअरबद्दलचे निरीक्षण नोंदवले आहे. त्याकडे गुंतवणुकीची शिफारस म्हणून न समजता कमॉडिटी बाजाराच्या चष्म्यातून पाहिले जावे.
कमॉडिटी बाजारातील गुंतवणुकीचा विचार करता आपण मागील एक वर्षांचा आढावा घेतला असता असे दिसेल की, या स्तंभामधून मांडलेले सर्व अंदाज अचूकतेच्या कसोटीवर अस्सल ठरताना दिसत आहेत. गुंतवणूकदारांना फारशा परिचित नसलेल्या वेलची बाजाराबद्दल लिहिताना एक वर्षांपूर्वी या सुगंधी मसाल्याच्या किरकोळ बाजारातील किमती सहा-आठ महिन्यांत प्रति किलो २,५०० रुपयांवर जातील असे म्हटले होते. प्रत्यक्ष दोन महिन्यांतच हे लक्ष गाठले गेले. त्यानंतर किमती ३,००० रुपयांवर जातील असेही सांगितले होते. आजची परिस्थिती अशी आहे की, चांगल्या दर्जाची वेलची आजही ४,००० ते ४,५०० रुपये किलोने विकली जात आहे.
याबरोबरच वेळोवेळी कापूस, मका, सोयाबीन आणि सरकीची पेंड या आणि अशा महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या वस्तूंच्या किमतींचा आगाऊ अंदाज दिला होता त्यापेक्षा कितीतरी अधिक या किमती वाढल्या, त्यादेखील खूप कमी कालावधीमध्ये. अगदी अलीकडील म्हणजे जून महिन्यात या स्तंभातून कांद्याचे किरकोळ बाजारातील भाव दोन-तीन महिन्यांत ४० रुपयांवर जाण्याचे अंदाज वर्तविले होते त्याप्रमाणे आज होताना दिसत आहे. सर्वावर कळस म्हणजे जुलैमध्ये सोन्यामध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना भावात ३८,००० ते ४०,००० रुपयांची पातळी दिवाळी किंवा डिसेंबपर्यंत येईल असे सांगितले होते. प्रत्यक्ष एक महिन्यातच ही दोन्ही लक्ष्ये गाठली गेली आहेत. सर्वात जास्त परतावा चांदीमध्ये होताना दिसत आहे. अत्यंत वेगाने चांदीच्या भावात २० टक्क्यांहून अधिक वाढ होऊन किमती ५०,००० रुपये प्रति किलोच्या पलीकडे गेल्या आहेत.
शेअर आणि चलन बाजारातील गुंतवणुकीमध्ये प्रचंड नुकसान होताना दिसत असताना अजूनही कमॉडिटीकडे गुंतवणुकीचे साधन म्हणून गंभीरतेने न पाहिल्यामुळे किती नुकसान होऊ शकते हे गेल्या काही महिन्यांत दिसून आले आहे. पाच वर्षांच्या कालावधीचा विचार केला तर शेअर बाजारातील सध्याच्या पडझडीनंतर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीतील परतावा हादेखील शेअर बाजारापेक्षा अधिक होताना दिसत आहे. म्हणजे हा शेअर बाजाराचे महत्त्व कमी लेखण्याचा प्रयत्न नसून जोखीम व्यवस्थापन करताना सोने आणि इतर कमॉडिटीजमध्ये बऱ्यापैकी निधी ठेवणे कसे गरजेचे आहे हे सांगण्याचा आहे.
ksrikant10@gmail.com
(लेखक वस्तू बाजार विश्लेषक )