श्रीकांत कुवळेकर
गेल्या लेखामध्ये आपण सोने आणि चांदीमधील गुंतवणुकीसाठी सध्याची वेळ कशी योग्य आहे याविषयी चर्चा करतानाच आपण टप्प्याटप्प्याने सोन्यामध्ये खरेदी करण्यासाठी योग्य वेळ असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर लगेचच सोन्याच्या किमती सुमारे ५ टक्के तर चांदीची किंमत ८-१० टक्क्यांनी वाढली. अर्थात चांदीमधील तेजी ही अत्यंत चढ-उतारांनी भरलेली होती. सोन्या-चांदीतील ही गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी म्हणजे ५-७ वर्षांसाठी असावी, असे लेखामध्ये असे नमूद केले होते. त्यामुळे मागील १०-१५ दिवसांतील तेजी ही कदाचित कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक गाठ पडावी अशा प्रकारची असू शकेल आणि येत्या काळामध्ये दोहोंमध्ये परत घसरण होऊ शकेल.
सध्याच्या वेगवान जगामध्ये आणि अति चढ-उताराच्या काळात गुंतवणुकीसाठी ५-७ वर्षे हा किमान कालावधी काही जणांना प्रदीर्घ वाटतो. मात्र सोन्याची खासियतच मुळी ही आहे की, सोन्यामध्ये दोन तेजीच्या कालखंडांमधील कालावधी ६-८ वर्षांचा तरी असतो. या आधारावर विचार करायचा तर ऑगस्ट २०२० मध्ये विक्रमी २,०७८ अमेरिकी डॉलर प्रति ट्रॉय औन्स (सुमारे ३१ ग्रॅम) या विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या सोन्याला परत तो दिवस पाहण्यासाठी निदान २०२५ पर्यंत वाट पाहायला लागेल. आपण त्यापूर्वीच्या तेजी पाहू. या शतकाचे सुरुवातीचे दशक हे कमॉडिटी मार्केटमधील ‘सुपर सायकल’ म्हणून गणले जाते. या काळात सर्वच कमॉडिटीच्या किमती जागतिक बाजारामध्ये नवनवीन विक्रम करत होत्या. सोने-चांदीबाबत बोलायचे तर शतकाच्या सुरुवातीला ३०० अमेरिकी डॉलर प्रति औंसवर स्थिर असलेले सोने २०११ च्या सप्टेंबपर्यंत १८२० डॉलपर्यंत गेले होते. या काळात आयातीत सोन्याच्या भावाबरोबरच रुपयांमध्ये झालेले अवमूल्यन अशा दुहेरी परिणामामुळे भारतात सोने अधिकच महाग झाले. २०११ नंतर २०१९ या काळात मात्र सोन्याच्या किमती हळूहळू खाली येऊन २०१६ मध्ये तर ११०० डॉलपर्यंत येऊन गेल्या आणि कोविड-१९ काळापर्यंत त्या त्याच कक्षेत फिरत राहिल्या. याच आधारावर आपण म्हटले आहे की, पुढील मोठी तेजी २०२५ नंतरच येईल. याला अपवाद अर्थातच जगातील मोठय़ा प्रमाणात वाढलेले भू-राजकीय तणाव, युद्धे आणि त्या अनुषंगाने बदलणारी मागणी-पुरवठा समीकरणे आणि चलन बाजारातील पडण-घडण या गोष्टी आहेतच.
मात्र अशा अनिश्चिततेच्या काळामध्ये सोन्यामध्येच का पैसे ठेवावे? ज्यामुळे ते सुरक्षित असतील, या प्रश्नाला उत्तर शोधण्यासाठी केवळ तीन महिने मागे जावे लागेल. रशिया-युक्रेन युद्ध, महागाई आणि त्यानंतर जगातील व्याजदर वाढ अशी एकाहून एक संकटे शेअर बाजारावर येत होती. तेव्हा शेअर बाजारातील गुंतवणूक मूल्य अल्पावधीमध्ये २५ ते ७५ टक्क्यांनी घसरल्यामुळे गुंतवणूकदार कुठल्या मानसिक धक्क्यातून गेले हे येथे विशद करून सांगण्याची गरज नाही. त्या काळात सोने २ ते ३ टक्के नरम झाले असले तरी चलन-दरातील फरकामुळे एकूण भांडवल सुरक्षितच राहिले असे म्हणता येईल.
सध्या व्याजदर वाढ करण्यामध्ये एकमेकांशी स्पर्धा करीत असलेल्या जगातील मुख्य देशांच्या मध्यवर्ती बँका या अनिश्चिततेच्या भरलेल्या वर्षांमध्ये काय करीत आहेत यावर एक नजर टाकली तरीदेखील आपल्याला लक्षात येईल की, सोन्यामध्ये गुंतवणूक कशी आणि किती महत्त्वाची आहे. अलीकडेच वल्र्ड गोल्ड कौन्सिलने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जागतिक अर्थव्यवस्थेवर सध्या असलेल्या प्रचंड ताणामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला येत आहेत. श्रीलंकेचे काय झाले आहे किंवा १९९० मध्ये भारताचे काय झाले होते, यापेक्षा आता तुर्की, इजिप्त, कोरिया, इराण, पाकिस्तान, बांगलादेश यांच्या बरोबरीने अनेक युरोपीय अर्थव्यवस्थादेखील कमालीच्या संकटामध्ये सापडल्या आहेत. काही देशांच्या बाबतीत तर श्रीलंका जात्यात तर असे देश सुपात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी देशाच्या तिजोरीमध्ये किती सोने आहे, यावरच त्या अर्थव्यवस्थेचा टिकाऊपणा आणि जागतिक पत अवलंबून असते. त्यामुळेच अनेक देश आपल्या तिजोरीमध्ये सोन्याचे साठे वाढवण्याच्या मागे लागलेल्या दिसतात. उदाहरणच द्यायचे तर जानेवारी ते जून या सहा महिन्यांमध्ये तुर्कीच्या मध्यवर्ती बँकेने ६३ टन सोने खरेदी केले आहे. म्हणजे देशाच्या एकूण सुवर्णसाठय़ांपैकी ३२ टक्के केवळ मागील सहा महिन्यांतच खरेदी केले गेले आहेत. त्यानंतर इजिप्तनेदेखील ४४ टन आणि जूनमध्येच इराकने ३४ टन सोने खरेदी केले आहे. एवढेच काय पण आर्यलड आणि इक्वेडरसारख्या लहान देशांनीदेखील प्रत्येकी ३ टन सोने खरेदी केले. रशियामधून माहिती मिळत नसली तरी मागील दोन-तीन वर्षांपासून सातत्याने सोने खरेदी केल्यामुळे शेवटच्या माहितीप्रमाणे २,३०० टन सोने देशाच्या तिजोरीत जमा असून यात मोठी वाढ झाल्याची शक्यता आहे. अगदी भारताच्या तिजोरीमध्ये देखील सुवर्ण साठय़ामध्ये १५ टन वाढ दिसत असल्याचे वल्र्ड गोल्ड कौन्सिलने नमूद केले आहे. अगदी अलीकडेच स्वित्र्झलडने रशियन सोन्याच्या आयातीवर बंदी घातलेलीदेखील आपण पाहिली आहे.
आता येत्या काळातील घटनांचा मागोवा घेतल्यास असे दिसून येईल की, सततच्या व्याजदर वाढीनंतरही इंग्लंडमधील महागाई नियंत्रणात येत नसल्याने वर्षांअखेपर्यंत देश मंदीमध्ये जाईल असे भाकीत केले आहे. तर अमेरिकेमधील परिस्थितीदेखील असे दर्शवत आहे की, तेथे व्याजदर वाढीचे सत्र पुढेही चालूच राहील. तर भारतातदेखील तिसऱ्यांदा व्याजदर वाढ केली गेली आहे. वस्तुत: व्याजदर वाढ ही सोन्यातील भाव कमी करत असते. परंतु व्याजदर वाढीचे कारण हे महागाई आणि अर्थव्यवस्थेवरील मंदीचे सावट आणि इतर अनिश्चितता आहे. यामुळे सोन्याला सध्या सुरक्षित गुंतवणुकीचे कवच मिळाले आहे. तसेच सध्याची परिस्थिती लवकर पूर्ववत होण्याची कोणतीही चिन्हे नसून उलट चीन आणि तैवान यांच्यातील तणाव वाढीमुळे त्यात चिंतेने भर घातली आहे. जोडीला चीनमधील गृहबांधणी क्षेत्रामध्ये मोठे अरिष्ट येण्याचे बोलले जात असून त्याचा थेट फायदा सोन्याला मिळू शकेल.
सध्या अमेरिकी डॉलर जरी गुंतवणुकीच्या वाढत्या ओघामुळे मजबूत होत असला तरी जगात चालू असलेले रशिया, चीन, भारत, इराण असे एक प्रकारचे ध्रुवीकरण, आंतरराष्ट्रीय व्यापारातील बदलती परिस्थिती यातून या देशांच्या चलनाची डॉलरवरील तुलनात्मक कुरघोड यातून कुठेतरी सोन्याला अधिक महत्त्व प्राप्त होईल अशी शक्यता आहे. जागतिक व्यापार आणि साधन संपत्तीवर पकड मिळवण्याच्या स्पर्धेमध्ये अमेरिकेचे स्थान नक्कीच डळमळीत होऊ लागले आहे. या सर्व परिस्थितीमध्ये सोन्याचे कधी कमॉडिटी तर बरेचदा चलन म्हणून असलेले महत्त्व अधिकच अधोरेखित होईल असे म्हटले जात आहे.
लेखक वस्तू बाजार विश्लेषक
ksrikant10@gmail.com
अस्वीकरण : कमॉडिटी बाजार हा मुख्यत: जोखीम व्यवस्थापनासाठी असून वरील लेख या गोष्टीचे महत्त्व आणि त्यातील गणित विशद करून सांगण्यासाठी आहे, लेखाला गुंतवणुकीचा सल्ला मानण्यात येऊ नये.