केंद्रातील सरकारने गुंतवणूकदारांना स्थानिक बाजाराकडे आकर्षति करण्यासाठी जाहीर केलेल्या आर्थिक सुधारणांनंतरही रूपयाची चिंताजनक घसरण सुरूच आहे. गेल्या महिन्यातील रूपयाची डॉलरच्या तुलनेत ३.६ टक्क्यांची घसरण जगातील सर्वात वाईट चलनऱ्हास म्हणता येईल. चलन बाजाराचे नामांकित विश्लेषक आणि  ‘इंडिया फॉरेक्स अ‍ॅडव्हायझर्स प्रा. लि.’चे  संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, अभिषेक गोएंका यांच्या मते, नजीकच्या काळात  रुपया-डॉलर दराची ५७-५८ पातळीपर्यंत घसरण दिसून येते..
डॉलरच्या तुलनेत रूपयाची घसरण अद्यापही सुरूच आहे. गेल्या अडीच महिन्यांमधील सर्वात खालची ५५.८७ची पातळी रूपयाने डॉलरच्या विनिमयात गाठल्याचे आपल्याला नुकतेच दिसले. भारतीय अर्थव्यवस्था सर्वात कमकुवत क्षमतेने विस्तारत असून त्याचवेळी वाढलेली चलनवाढ आणि कमी झालेली गुंतवणूक यांच्यामुळे अर्थव्यवस्थेवरील तणाव आणखीच वाढला आहे.
परकीय गुंतवणूकदारांना आकर्षति करण्याचे सरकारचे प्रयत्न व्यापार आणि वित्तीय अशा दुहेरी तुटीमुळे वाया जाऊ लागले आहेत. यातून रूपयाच्या मूल्याला  आणखीच फटका बसू लागला असून गेल्या महिन्यातील रूपयाची डॉलरच्या तुलनेत ३.६ टक्क्यांची घसरण जगातील सर्वात वाईट चलनऱ्हास म्हणता येईल. किराणा व्यापार, निवृत्ती वेतन आणि विमा क्षेत्र परकीय कंपन्यांसाठी खुले करण्याच्या धोरणावरील संसदेतील अवरोधही अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर आणण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना खीळ घालणाराच आहे.
चलन बाजारातील विश्लेषकांनी जसा कयास केला होता त्याप्रमाणे रूपयाबाबतचा आगामी दृष्टिकोन तितकासा वाईट नाही. डॉलरच्या तुलनेत सर्वच आशियाई चलने स्थर्य राखून आहेत. त्याचवेळी रूपया मात्र डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरू लागला आहे. केंद्र सरकारने गुंतवणूकदारांना स्थानिक बाजाराकडे आकर्षति करण्यासाठी जाहीर केलेल्या आर्थिक सुधारणांच्या धोरणांनंतरही रूपयाची ही चिंताजनक घसरण सुरूच आहे.
केवळ स्थानिक घटकच नाही तर आंतरराष्ट्रीय घटनांचाही रूपयावर परिणाम होऊ लागला आहे. गेली तीन वष्रे सुरू असलेल्या युरो कर्ज अरिष्टामुळे जागतिक गुंतवणूकदारांना त्यांच्या पूंजीच्या सुरक्षिततेबाबत शंका वाटू लागली आहे. त्यातूनच अमेरिकेची मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्‍‌र्हच्या अर्थउभारीच्या क्यूई-३ उपायांनंतरही यूएस ट्रेझरी बाँड्सचा परतावा २ टक्क्यांखाली गटांगळ्या खाताना दिसत आहे.
युरो झोनबाबत अजूनही लोकांमधील काळजीचे वातावरण कायम आहे. फ्रान्समधील घसरता ग्राहक-विश्वास, तर इटलीत व्यावसायिकांचा भरवसाही उतरंडीला लागला आहे आणि स्पेन तसेच जर्मनीमधील बेरोजगारीने कळस गाठला आहे. स्पेनला संकटाच्या खाईतून वर काढण्यासाठी बेल-आऊट केले किंवा नाही केले तरी युरो झोन मंदीच्या गत्रेत खोल अडकला आहे आणि नजीकच्या काळात तो वर येण्याची शक्यता नाही, या धारणेने गुंतवणूकदारांच्या मनात ठामपणे घर केले आहे. त्यामुळे गुंतवणुकीच्या सुरक्षित ठिकाणांची मागणी दिवसेंदिवस वाढणार आहे.
अन्य उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांप्रमाणे न वागता भारताच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदर ‘जैसे थे’ रोखून धरले आहेत. आपल्या पतधोरणातील व्याजाचे दर चढेच राहिले असून, त्यामुळे अर्थ मंत्रालयावरील ताण आणखी वाढला आहे. सप्टेंबरच्या मध्यावर सरकारने जाहीर केलेल्या धोरणांमुळे अनेक बाजारतज्ज्ञांनी रुपया-डॉलरच्या ५० रूपये दराबाबत चर्चा केली. आता अशा शक्यतेला कुणीच भीक घालणार नाही हे खात्रीने सांगता येईल.
चलन पश्चानयनासंबंधी (कॅरी ट्रेड) ताज्या रंजक अभ्यासात डॉलर आणखी बळावण्याच्या शक्यतेवर चर्चा केली गेली आहे. डिसेंबर २००८ पासून फेडने व्याजदर ०.२५ टक्क्यांवर कायम ठेवले आहेत आणि त्याचवेळी अर्थउभारीचे ‘क्यूई’ उपाय म्हणून दर महिन्याला अब्जावधी डॉलर बँकिंग यंत्रणेमध्ये ओतणेही सारखे सुरू आहे. त्यामुळे अमेरिकी डॉलरला चलन बाजारात कॅरी ट्रेडसाठी आणखी मुभा मिळत गेली आहे. रोजगारविषयक सुधारलेली आकडेवारी, गृह विक्री, ग्राहक विश्वास यातून अमेरिकी अर्थव्यवस्था हळूवार ताळ्यावर येत असल्याचे दिसत आहे आणि पुढे आणखी सुधारणांनंतर फेड रिझव्‍‌र्हला व्याजदर फिरवता येईल. हा अमेरिकी डॉलरच्या ‘कॅरी ट्रेड’ला पायबंद ठरेल.
डॉलरची वारेमाप छपाई करून फेडला डॉलरच्या मूल्यातील स्फोटक चंचलतेला फार काळ दाबून ठेवता येणार नाही. दुसरी गोष्ट अशी की, अमेरिकी अर्थव्यवस्थेने तिसऱ्या आणि  चौथ्या तिमाहीत सुधार घडवून आश्चर्याचा धक्का दिल्यास फेडचे व्याजदरांबाबत धोरण कलाटणी घेताना दिसेल, अशी बाजारात आताच शक्यता वर्तविली जात आहे.  तिसरी गोष्ट अशी की, अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यामधील ताज्या लष्करी संघर्षांची  परिणती म्हणून भू-राजकीय तणाव वाढत जाऊन अर्थव्यवस्थेत सुधाराऐवजी ‘ डबल डीप’ मंदीचे धोक्याचे वादळ घोंघावत येऊ शकते. २००८ सालाप्रमाणे सध्याची स्थिती आहे. जागतिक बाजारपेठेत धोका टाळण्याचे जितके अधिक प्रयत्न होतील, तितके डॉलरची ताकद आणखीच वाढताना दिसेल. गुंतवणूकदारांना अमेरिकी खजिन्याच्या सुरक्षिततेबाबत खात्री आहे. यूएस ट्रेझरी बाँड्समधील वाढती गुंतवणूक त्याचा प्रत्यय देते. यातून डॉलरमध्ये तेजीला ऊत येण्याचीच शक्य आहे.
गेल्या जवळपास १० वर्षांतील मंदीतून सावरून सुरू झालेल्या डॉलरच्या तेजीला आगामी काळात विराम मिळताना पाहता येईल. सध्याची जागतिक परिस्थिती याकडेच निर्देश करते. युरो झोनमधील अशाश्वतता आणखी वाढणार आहे आणि जगभरात अनेक देशांच्या अर्थव्यवस्था आणखी गटांगळ्या खाऊ शकतील.
रूपयाबाबत बोलायचे झाले तर सध्या त्याचा डॉलर विनिमय दर ५५ च्या पातळीवर सुरू असून डॉलर निर्देशांक ८० अंशांवर आहे. डॉलर निर्देशांक ८५ची पातळी (जो १२० अंशांपासून ७० अंशांपर्यंतच्या मंदीसदृश निसरडय़ा प्रवाहाचा एक-तृतीयांश टप्पा आहे) किंवा त्याहीपेक्षा वर जात असून त्यामुळे नजीकच्या काळात रूपयाची घसरण ५७-५८ या पातळीपर्यंत शक्य दिसते.

Story img Loader