डॉ. आशीष थत्ते
‘आऊटसोर्सिग’चा स्वैर अनुवाद बाह्य स्रोत असा केला आहे. कंपन्या सर्रासपणे कित्येक कामे ही बाहेरच्या लोकांकडून करून घेतात. यात मुख्यत्वेकरून कमी महत्त्वाची आणि वारंवार करावी लागणारी आणि फारसे काही कौशल्यं नसणारी कामे बाह्य स्रोत वापरून केली जातात. आता तर नवीन तंत्रज्ञान वापरूनदेखील कामे बाहेरून करून घेतली जातात. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करणे, तेही २४ तास अशी महत्वाची कामेदेखील केली जातात. रात्रीच्या वेळी जर तुम्ही एखादी तक्रार केली आणि ती फार महत्त्वाची नसेल आणि त्या वेळी समोरून बोलणाऱ्या माणसाने जर सांगितले, की उद्या सकाळी तुमच्या तक्रारीचे उत्तर देऊ, तर तो कदाचित रोबोटदेखील असू शकतो, हे लक्षात ठेवा. मनुष्यबळ विभागातील काही कामे जसे पगारवाटपाची यादी, मुलाखतीसाठी उमेदवार शोधणे वगैरेची कामे सर्रास बाहेरच्या कंपन्यांकडून करून घेतली जातात. वित्त विभागामध्ये हिशोबनीस किंवा कर भरण्याचे आणि मोजण्याचे काम बाहेरून करून घेतले जाते. कायदेतज्ज्ञ किंवा संकेतस्थळ (वेबसाइट) बनवण्यासाठी कुठेही आपला कर्मचारी नेमण्याची प्रथा नाही. कंपन्यांचे सुरक्षारक्षक, कार्यालयीन छोटे कामकाज करणारे किंवा अगदी चहा किंवा कॉफी बनवून देणेदेखील बाहेरील लोकांवर सोपवले जाते. हे तर काहीच नाही. हल्ली तर मुंबई, पुणे, बंगळूरुसारख्या मोठय़ा शहरात अख्खे कार्यालय तासाच्या हिशोबाने भाडय़ाने मिळते. कंपन्यांची आर्थिक परिस्थिती आणि त्यांचे विचार बदलल्याने हे शक्य झाले आहे. याची दुसरी बाजू म्हणजे बाह्य स्रोतांकडून काम करून घेणे म्हणजे हे काम करणाऱ्या उद्योगांना अधिक संधी उपलब्ध झाल्या आहेत. फारशी महत्त्वाची नसणारी कामे बाहेरून करून घेतल्यामुळे कंपन्या त्यांच्या मुख्य उत्पन्न देणाऱ्या कामाकडे लक्ष केंद्रित करू शकतात हे त्यामागचे तत्त्व आहे.
कंपन्यांचे हे तत्त्व आपण घराघरांत अवलंबले आहे. आता दिवाळी आली म्हणजे फराळ करणे ओघाने आलेच. हल्ली आपण फारच कमी प्रमाणात घरात फराळ बनवतो (काही सन्माननीय अपवाद वगळता). म्हणजे सगळे पदार्थ नाही, पण काही पदार्थ निश्चितच बाह्य स्रोतांकडून घेतो. तसे रोजचे जेवणदेखील हल्ली बाह्य स्रोतांकडून बनवून घेणे सर्वमान्य आहे. एके काळी गाडी धुणे हा रोजचा कार्यक्रम होता, तोदेखील आपण बाहेरील स्रोत वापरून करून घेतो. केस कापणे, दाढी करणे तर आपण कित्येक वर्षे बाह्य स्रोतांकडून करत आलो आहोत. मात्र अजून १०० वर्षांनी नखे कापणे, लहान मुलांना जेवण भरवणे या छोटय़ा कामांसाठी वेळोवेळी माणसे बोलण्याची पद्धत सुरू झाल्यास फारसे आश्चर्य वाटून घेऊ नका. सणासुदीच्या वेळेला घरातील पुरुषांना सगळय़ात न आवडणारी गोष्ट म्हणजे साफसफाई करणे. अहो, आता तेसुद्धा बाह्य स्रोत येतात आणि अगदी पंखे पुसणे ते सर्व घर चकाचक करण्याचे काम करतात. असो. शब्दांचे बंधन आहे म्हणून नाही तर ही यादी अक्षरश: न संपणारी आहे.
थोडक्यात, कमी महत्त्वाची, वारंवार करावी लागणारी आणि फारसे काही कौशल्यं नसणारी कामे बाह्य स्रोतांकडून करून घेतली जातात आणि हे पुढे जाऊन अजून वाढणारच आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आपले बदलणारे विचार आणि आर्थिक सुबत्ता असते. अच्छा, जाताजाता सांगून जातो. माझे लेख मीच लिहितो, बाह्य स्रोतांची मदत घेत नाही, उगाचच शंकेला वाव नको!
लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाउंटंट म्हणून कार्यरत / ashishpthatte@gmail. Com / @AshishThatte