अजय वाळिंबे
काही कंपन्याच अशा आहेत ज्यांची नावे सुचवायला मलाच काय कुणालाच कधीच भीती वाटणार नाही. डोळे मिटून गुंतवणूक करावी अशा काही शेअर्सपैकी एक म्हणजे आज सुचविलेली टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस उर्फ टीसीएस.
१९६८ मध्ये स्थापन झालेली टाटा समुहाची ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी केवळ भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठी कंपनी आहे. जगातील काही मोजक्याच आघाडीच्या कंपन्यांमध्ये टीसीएसचा समावेश होतो.
भारतामधील सर्वात जास्त कर्मचारी असलेली कंपनी म्हणूनदेखील टीसीएसचे नाव आहे. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता कंपनीने २४,१७९ नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली असून त्यामुळे कंपनीची एकूण कर्मचारी संख्या ४,४८,४६४ वर गेली आहे.
केवळ भारतीयच नव्हे तर सुमारे ४६ देशांतील कर्मचारी टीसीएसमध्ये काम करतात. कंपनी जवळपास सर्वच क्षेत्रातील उद्योगांना सेवा पुरवत असून त्यात मुख्यत्वे बँकिंग आणि वित्तीय, औषधनिर्माण, विमा, प्रसार माध्यम आणि दळणवळण, ग्राहकपयोगी वस्तू, किरकोळ विक्री, वितरण, ऊर्जा आदी विविध क्षेत्रांचा समावेश होतो.
प्रमुख सेवांमध्ये कन्सल्टन्सी व्यतिरिक्त इंटरनेट ऑफ थिंग्ज, ब्लॉकचेन, इंडस्ट्रियल इंजिनीरिंग, क्लाउड अॅप्स आणि मायक्रो सव्र्हिसेस, सायबर सिक्युरिटी, ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स इत्यादी सेवांचा समावेश होतो.
मार्च २०२० साठी संपलेल्या आर्थिक वर्षांचे निकाल जाहीर झाले असून कंपनीने १,३१,३०६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३३,२६० कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तो ११ टक्क्य़ांनी अधिक आहे.
सध्याच्या परिस्थितीत आगामी कालावधी कसा असेल हे सूज्ञ वाचकांना पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही. परंतु अशा आपत्कालीन परिस्थितीत टीसीएससारख्या उत्तम व्यवस्थापन असलेल्या बलाढय़ कंपन्या सहज तगू शकतात. घसरणारा रुपया माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला आणि मुख्यत्त्वे टीसीएससारख्या बहुराष्ट्रीय भारतीय कंपनीला डोकेदुखी ठरत नाही.
अॅम्वे या बहुराष्ट्रीय कंपनीने टीसीएसबरोबर नुकतीच एक धोरणात्मक भागीदारी केली आहे. याचा मोठा फायदा कंपनीला होईल. सध्या सगळेच शेअर्स आकर्षक भावात उपलब्ध असताना टीसीएससारखा अल्प बीटा, उत्तम शेअर तुमच्या पोर्टफोलियोची शान वाढवेल यात शंकाच नाही!
आजच्या परिस्थतीत ‘माझा पोर्टफोलियो’मध्ये सुचविलेले शेअर्स हे तुम्हाला खालच्या भावात मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणूक एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्याने करावी.
टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस
(बीएसई कोड – ५३२५४०)
शुक्रवारचा बंद भाव : रु. १,८१८/-
लार्ज कॅप
प्रवर्तक : टाटा समूह
उद्योग क्षेत्र : माहिती तंत्रज्ञान
बाजार भांडवल : रु. ७,०४,७९२ कोटी
वर्षभरातील उच्चांक/नीचांक : रु. २,२९६/१,५०४
भागभांडवल भरणा : रु. ३७५.२४ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%) प्रवर्तक ७२.०५
परदेशी गुंतवणूकदार १५.९०
बँक/म्यु. फंड/सरकार ८.१०
इतर/जनता ३.९५
पुस्तकी मूल्य : रु. १९८.२
दर्शनी मूल्य : रु.१/-
लाभांश : ७,३००%
प्रति समभाग उत्पन्न : रु. ८८.६
पी/ई गुणोत्तर : २१.८
समग्र पी/ई गुणोत्तर : १४.८
डेट इक्विटी गुणोत्तर : ०.१०
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : ४६.७०
रिटर्न ऑन कॅपिटल : ४७.७६
बीटा : ०.६६