गुंतवणूकदार जेव्हा नफ्यामध्ये असतो तेव्हा तो जास्त कडवेपणाने वागता दिसतो. पण जेव्हा त्याला नुकसानाची चाहूल लागते तेव्हा तर तो आणखीच आक्रमक होऊन जोखीम ओढवून घेताना दिसतो. स्वत:च्या नफ्याचे त्याला जास्त कौतुक नसते. नुकसान मात्र तो खूप काळ कुरवाळत बसतो. त्याच्यालेखी नुकसानीचे शल्य हे मिळालेल्या नफ्याच्या आनंदाहूनही दुप्पट असते..
आपल्या नवीन आयफोन-५ बद्दल तन्वीची तक्रारवजा कुरकूर थांबत नव्हती. ‘यातील अॅप्स आहेत बरे पण याहूनही आधीचा सॅमसंग फोन बरा होता. तो लवकर चार्ज व्हायचा..’
तन्वीची पुढील प्रतिक्रिया येण्याआधी व्यवसायाने वित्तीय सल्लागार असलेला आर्यन नेहमी प्रमाणे स्मित हास्य करून म्हणाला, ‘लॉस अव्हर्जन, दुसरे काय..’
‘हे काय ? पकवू नकोस.. कुठेही काहीही घरच्या गोष्टीत तुझे फायनान्स घुसळू नकोस’
प्रश्नांचा भडिमार होण्याआधीच आर्यनने शिताफीने संभाषणाची सूत्रे आपल्या हातात घेतली.
‘नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे कुठलीही नवीन वस्तू आपल्याकडे येण्याआधी त्या गोष्टीची जबरदस्त उत्सुकता असते. आनंद ओसरला की त्यातील छोटया छोटया गोष्टीही बोचू लागातात. शेअर बाजारामध्ये ‘लॉस अव्हर्जन (Loss Aversion)’ हा एक महत्वाचा मुद्दा आहे. यात गुंतवणूकदार जेव्हा नफ्यामध्ये असतो तेव्हा तो जास्त कडवेपणाने वागता दिसतो. पण जेव्हा त्याला नुकसानाची चाहूल लागते तेव्हा तर तो आणखीच आक्रमक होऊन जोखीम ओढवून घेताना दिसतो. स्वत:च्या नफ्याचे त्याला जास्त कौतुक नसते. नुकसान मात्र तो खूप काळ कुरवाळत बसतो. नुकसानीचे शल्य हे मिळालेल्या नफ्याच्या आनंदाहूनही दुप्पट असते, असे प्रयोगाअंती सिध्दही झाले आहे.
संभाषणातील तन्वीची तन्मयता पाहून आर्यनने तिला गुंतवणूकक्षेत्रातील उदाहरणे देण्यास सुरुवात केली.
‘२००६ सालात खूप गुंतवणूकदारांनी इन्फ्रा स्टॉक्स्मध्ये पसे गुंतविले. बाजाराच्या निर्देशांकाने २१,०००च्या उच्चांकावरुन खाली बुडी मारली. शेअर्सच्या किंमती पडल्या तरी दीर्घकालीन गुंतवणूकदार म्हणून ते स्टॉक्स् अनेकांनी तेजीच्या काळात विकले नाहीत.
उदाहरणच द्यायचे तर, जय कॉर्प शेअर उच्चांकावर असताना विकत घेतला. पुढे तो कमी किंमतीला उपलब्ध असताना हा शेअर्स नक्की वर जाईल म्हणून ‘अॅव्हरेजींग’च्या दृष्टीने अजून काही शेअर्स विकत घेतले गेले.
त्याच्या नेमके उलट, येस बँकेने २८० रुपयांवरुन थोडया कालावधीत ४०० रु. वरील पातळी गाठली. बँकेचे निकाल चांगले येऊन सुध्दा गुंतवणूकदारांनी स्टॉक विकून नफा जमा केला.
आता त्यातले खूपसे गुंतवणूकदार म्हणतात की, इक्विटी/डेट मार्केट आपल्याला कळत नाही. त्यापेक्षा बँकेची निश्चित परतावा देणारी योजनाच बरी’
‘पण असे निर्णय घेण्यामागे त्यांची काय मानसिकता असेल?’ या प्रश्नावर आर्यनने मानसशास्त्रातील एक दिले.
‘आपण दोन प्रसंग लक्षात घेऊ.
प्रसंग एक : एखाद्याला १०,००० रु. दिले आणि दोन पर्याय दिले.
अ) ५,००० रुपयांचा नक्की फायदा होईल.
ब) नाणेफेकीचा कौल घ्यायचा. छापा आला तर १०,००० रु. मिळतील आणि जर काटा आला तर काहीच मिळणार नाही.
प्रसंग दोन : एखाद्याला २०,००० रु. दिले आणि दोन पर्याय दिले,
अ) ५,००० रुपयांचे नक्की नुकसान होईल.
ब) नाणेफेकीचा कौल घ्यायचा. छापा आला तर काहीच नुकसान होणार नाही. पण जर काटा आला तर १०,००० रुपयांचे नुकसान होईल.
सर्व साधारणपणे पहिल्या प्रसंगामध्ये गुंतवणूकदार पर्याय क्रमांक ‘अ’ला प्राधान्य देईल. जेव्हा फायदा दिसत असतो तेव्हा शक्यतो गुंतवणूकदार कडवेपणाने निर्णय घेतो. पण दुसऱ्या प्रसंगामध्ये मात्र गुंतवणूकदार पर्याय क्र. ‘ब’ला प्राधान्य देईल. कारण नुकसान जेव्हा समोर दिसत असते तेव्हा गुंतवणूकदार आक्रमक धोरणाला प्राधान्य देतो.’
‘हो, मी जर गुंतवणूकदार असेन तर शक्यतो मीदेखील तूच सांगितलेल्या पर्यायांना प्राधान्य देईन.’
केव्हा नव्हे ते तन्वीने प्राजंळपणे कबुली दिली. ‘पण यात योग्य पर्याय कुठला?’ तिचा प्रश्न.
‘माझ्या मते गुंतवणूक परिस्थिती बघितली तर पर्याय क्रमांक ‘अ’ योग्य आहे. कारण कुठल्याही परिस्थितीत गुंतवणूकदाराला १५,००० रुपयांची हमी आहे.’
‘मानसिकतेचा गुंतवणूकक्षेत्रात काय परिणाम होतो?’
तन्वीची विषयातील रुची बघून आर्यनने बिछान्यावर असलेली आपल्या टूरसाठी कपडयांची बॅग भरत पुढचा मुद्दा समजवण्यास सुरुवात केली. ‘लॉस अव्हर्जन (Loss Aversion) मुळे गुंतवणूकदार फिक्स डिपॉझिटला प्राधान्य देतात. महागाईवर मात करण्यासाठी दीर्घकालावधीत इक्विटी प्रॉडक्टस् चांगले परतावे देऊ शकतात. पण मुद्दल कमी होण्याच्या भीतीने गुंतवणूक केली जात नाही.’
‘एखाद्या स्टॉकने चांगला परतावा दिला आणि तो परतावा बँकेच्या फिक्स डिपॉझिट दरापेक्षा चांगला असेल तर गुंतवणूकदाराचा नफा जमा करण्याकडे (Profit Booking) प्राधान्य असते. जर एखादा स्टॉक मूलभूत (Fundamentally) चांगला असेल तर ५० टक्के नफा पदरी पाडून घेऊन उर्वरित रक्कम गुंतवणूक म्हणून राहून द्यावी.’
‘पोर्टफोलियोत जर एखादा स्टॉक कमी परतावा देणारा असेल, तर त्या कमी किंमतीला सुध्दा आपण तो स्टॉक विकत घेऊ का? हा प्रश्न स्वत:ला विचारावा. त्याचे उत्तर होय असल्यास तो स्टॉक पोर्टफोलियोमध्ये ठेवावा. जर उत्तर नकारार्थी असेल तर तो परत उच्च पातळी गाठेल या आशेवर तो शेअर पोर्टफोलियोमध्ये ठेवण्यात काहीच अर्थ नाही.’
‘दैनंदिन जीवनातील एखादे उदाहरण दे. सोपे असे’, तन्वीचा उत्सुकतेने पुढे आलेला प्रश्न.
आर्यनने विचार करुन उदाहरण दिले, ‘आपण जर एखाद्या नवीन हॉटेलमध्ये नवीन जागी जेवायला गेलो तर जास्तकरून जे पदार्थ आपणास माहित असतात त्यालाच आपण प्राधान्य देतो. पण आपणास माहित असलेले पदार्थ मेनू कार्डमध्ये दिसले नाहीत तर मात्र आपण एकदम एक्झॉटिक खाद्यान्नांकडे वळतो.’
आपण टूरवर जाताना तन्वीच्या चेहऱ्यावरील नित्याचा त्रासिक भाव बघून आर्यन तिला म्हणाला, ‘बघ शेवटची टूर सहा महिन्यांपूर्वी झाली होती. आता फक्त मी दोन आठवडे कामानिमित्त बाहेर चाललो आहे. पण तुला सहा महिन्यांच्या एकत्र सहवासापेक्षा दोन आठवडयांच्या वियोगाचा जास्त त्रास होत आहे. आताचे एवढे ऐकल्यावर जो खरे तर तुला नको व्हायला हवा होता.’
लॉस अव्हर्जनच्या या उकलीतून तन्वीला तिच्या सुखी संसाराचे गुपित न कळतच उमगले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा