असे म्हणतात की एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातास समजू नये. परंतु मरावे परी किर्तीरूपे उरावे असे प्रत्येकास वाटत असते. मग श्रीमंत ग्राहक आपल्या नावे संस्थांना मोठय़ा देणग्या देऊन शाळेच्या वाचनालयास, हॉलला किंवा प्रयोगशाळेस, हॉस्पीटलला किंवा एका वॉर्डला आपले नाव देतात. सामान्य पगारदारांना हे दानधर्म करत असताना त्यावर आयकरात सूट मिळते. वैयक्तिक स्वरूपात दिलेल्या देणगीवर कलम ‘८० जी’नुसार वजावट मिळविता येते.
दुसऱ्याला मदत करणे ही भावना प्रत्येकाच्या मनात असते. दान हे त्याग शिकवत असते. ही मदत खूपदा आíथक स्वरूपात असते. विविध सामाजिक उपक्रमात आपण सहभागी होतो किंवा आíथक मदत देत असतो. ही आíथक मदत देताना आयकर वाचवावा हा मूळ हेतू नसतो (किंवा नसावा). संस्थेस मदत करता-करता त्यावर्षी आयकरात काही सूट मिळाली तर फारच उत्तम.
कंपन्यांसाठी ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलीटी’ हा नियम आता आला. परंतु सामाजिक जबाबदारीची जाणीव लक्षात ठेवून टाटा उद्योग समूह कित्येक वष्रे आíथक मदत देत आहे. असाच प्रकार काही इतर व्यावसायिकांमध्ये आढळतो, तो म्हणजे एखाद्या देवस्थानास आपल्या व्यवसायात भागीदार म्हणून हक्क देणे. दरवर्षी ताळेबंद बनवून झाल्यावर देवस्थानच्या भागाचा नफा तेथे पोहोचवला जातो.
हे करत असताना त्यावर आयकरात सूट मिळते. वैयक्तिक स्वरूपात दिलेल्या देणगीवर कलम ‘८० जी’नुसार वजावट मिळते तर व्यावसायिक आणि औद्योगिक उपक्रमांस कलम ३५ (१) (२) व कलम ३५ एसी अंतर्गत वजावट मिळते.
नोकरदार मंडळी किंवा निवृत्त झालेल्यांना ‘८० जी’ अंतर्गत दिलेल्या देणग्यांच्या पन्नास टक्के वजावट त्यावर्षीच्या उत्पन्नातून मिळते. यासाठी दुसरी अट एकूण उत्पन्नाच्या दहा टक्के रकमेवरच ही वजावट मिळते. म्हणजे वार्षकि उत्पन्न पाच लाख असेल तर सर्व संस्थांना मिळून ५० हजारच देणगी या कलमासाठी ग्राह्य होईल व २५,००० रुपयांची वजावट उत्पन्नातून मिळेल. परिणामी करपात्र उत्पन्न ४,७५,००० रुपये होईल. ही देणगी फक्त मान्यताप्राप्त संस्थांनाच द्यावी लागते.

या कलमाखाली काही संस्थांना देणगीच्या १००% वजावट मिळते. उदा. पंतप्रधानांचा राष्ट्रीय पुनर्वसन फंड, राष्ट्रीय क्रीडा विकास किंवा सांस्कृतिक विकास फंड, जिल्हा साक्षरता समिती.
या व्यतिरिक्त कलम ‘८० जीजीए’अंतर्गत वैयक्तिक देणगीदार जे व्यावसायिक नाहीत अशा व्यक्तींना, शास्त्रीय संशोधन करणाऱ्या संस्था, विद्यापीठे किंवा विद्यालये यांना दिलेल्या देणग्यांवर १००% वजावट त्यावर्षीच्या उत्पन्नातून मिळते. या कलमाखालील देगण्यांना उत्पन्नाच्या १० टक्के मर्यादेची अट नाही. देणगी वस्तू स्वरूपात दिल्यास वजावट मिळत नाही, ती पैशांच्या रूपातच हवी. देणगी १० हजार रुपयांच्या वर असल्यास धनादेश किंवा डिमांड ड्राफ्टनेच द्यावी लागते. १० हजार रुपयांपेक्षा अधिक रोख देणगीवर आयकरात सूट मिळत नाही. या संस्थांची नोंदणी आयकर विभागाकडे असणे आवश्यक आहे.
व्यावसायिक व्यक्ती किंवा कंपन्यांसाठी देणग्यांवर आयकर कलम ‘३५ एसी’ नुसार १००% वजावट मिळते. यासाठी संस्था आíथक किंवा सामाजिक प्रगतीसाठी, केंद्र सरकारने नमूद केलेल्या उद्दिष्टांसाठी कार्यरत असावी.
या व्यतिरिक्त कलम ३५ (१) (१) नुसार नोंदणीकृत शास्त्रीय संशोधन करणाऱ्या संस्थांना संशोधन प्रकल्पासाठी देण्यात येणाऱ्या देणग्यांवर १७५% वजावट मिळते यासाठी संशोधन तुमच्या व्यवसायाशी संबंधीत असलेच पाहिजे असे नाही. म्हणजे १० हजार रुपये देणगी दिल्यास त्या वर्षीच्या खर्चात १७,५०० रुपये दाखवता येतात. ज्या संस्था सामाजिक किंवा सांख्यिकी क्षेत्रात संशोधन करतात अशा संस्थांना देण्यात येणाऱ्या देणग्यांवर १२५% वजावट मिळते.
देणगीची वजावट आयकराच्या कोणत्याही एकाच कलमाखाली घेता येते.
आíथक नियोजन करताना ग्राहक मध्यमवर्गीय असो अथवा श्रीमंत, त्याच्या दिलेल्या माहितीत खर्चाच्या तक्त्यांत ‘धर्मादाय कामासाठी’ रक्कम लिहिलेली असतेच. आज भारतात प्रत्येकी ६०० व्यक्तींमागे एक सेवाभावी अथवा स्वयंसेवी संस्था- एनजीओ आहे. यापकी किती संस्था खरोखरच सामाजिक, आíथक जीवनमान उंचावण्यासाठी कार्यरत आहेत हा प्रश्न आहे. पण आज एनजीओ काढणे व त्यासाठी सरकारी मदत घेणे हा सुद्धा एक व्यवसायाचा भाग झाला आहे. मग आपण दिलेले सत्पात्री दान आहे का? हा प्रश्न सर्वसामान्यांस पडणे स्वाभाविक आहे. आíथक नियोजनकारासाठी ‘फिलांथ्रोपी मॅनेजमेंट’ हा अभ्यासाचा विषय आहे.
ग्राहकासाठी योग्य संस्था निवडणे ही जबाबदारी आíथक नियोजनकारावर येते. मग ग्राहक त्याच्या स्वभावानुसार, त्याच्या इच्छेनुसार संस्था कशी असावी हे सांगतो. एका अशीलाचे सर्व शिक्षण एका दानशूर व्यक्तीने केले होते. त्याला गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणाऱ्या ‘माधव सेवा फाउंडेशन’चे नाव सुचवले व त्यांचे कार्य ज्या ठिकाणी चालते त्या वस्त्यांमध्ये त्याला नेले. असे एका महिला अशीलाला महिलांच्या शिक्षणासाठी मदत करावयाची होती. तिला औरंगाबादच्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या पालक योजनेची माहिती दिली. एका व्यक्तीस अन्नदानाची आवड होती त्याला तशी संस्था निवडून दिली.
असे म्हणतात की एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातास समजू नये. परंतु मरावे परी किर्तीरूपे उरावे असे प्रत्येकास वाटत असते. मग श्रीमंत ग्राहक आपल्या नावे संस्थांना मोठय़ा देणग्या देऊन शाळेच्या वाचनालयास, हॉलला किंवा प्रयोगशाळेस, हॉस्पीटलला किंवा एका वॉर्डला आपले नाव देतात. अशा संस्थाची नावे आíथक नियोजनकार सुचवतो. काहीजण आपल्या उद्दिष्टांसाठी स्वतंत्र ट्रस्ट स्थापन करतात, असा ट्रस्ट स्थापन कारण्यास मदत करतो. काही वेळा तो या ट्रस्टचा एक ट्रस्टी सुद्धा असतो. आपल्या परिचयात अशा संस्था किंवा आíथक नियोजनकार नसल्यास आणि दानधर्माची इच्छा असल्यास ‘लोकसत्ता’च्या ‘‘सर्वकाय्रेषु सर्वदा’’ उपक्रमातील संस्था निवडाव्यात.
आज अमेरिकेतील उद्योगपतींच्या दानशूरपणाचे कौतुक भारतात खूप असते. परंतु तेथील सामाजिक परिस्थितीनुसार आपल्या वारसास कोणी काही देत नाही. तेथील कर रचनेनुसार वारसा कर-  इस्टेट डय़ूटी प्रचंड (जवळपास ८५%) आहे. याचा अर्थ मी त्यांचा दानशूरपणा कमी लेखतो असे नाही. गरिबाला देण्यासाठी ज्याचा हात ‘स्वाभाविकपणे’ खिशाकडे जातो तो खरा दानशूर, या अर्थाने टाटा कुटुंबीय हेच खरे दानशूर.
आíथक नियोजनकारांच्या सोयीसाठी क्वांटम म्युच्युअल फंड पुरस्कृत एक पुस्तिका आहे. यात भारतातील १७५ संस्थांच्या (एनजीओ) तीन वर्षांच्या ताळेबंदाची माहिती आहे. यामध्ये महाराष्ट्रातील संस्था फारच थोडय़ा आहेत आणि ‘क्राय’ वगळता नावाजलेल्या संस्था जवळ जवळ नाहीतच.
धर्मादाय संस्थांची विभागणी तीन भागांमध्ये करता येते.
१) समाजापेक्षा स्वहितासाठी काढलेल्या संस्था उदा. आधुनिक शिक्षणसम्राटांच्या संस्था
२) समाज हितासाठी म्हणून त्यागमूर्तीनी काढलेल्या पण आíथकदृष्ट्या मजबूत नसलेल्या.
३) आíथकदृष्ट्या प्रचंड सधन असलेल्या संस्था उदा. सत्यसाईबाबा ट्रस्ट, तिरुपती मंदिर ट्रस्ट, केरळमधील पद्मनाभ मंदीर
या तिसऱ्या भागातील संस्थांबद्दल पुढील लेखात पाहू.
शेवटी संस्कृत श्लोक सांगून थांबतो –
दानम् भोगो नाश:।
तिसरो गतयो भवती वित्तस्य।
न भुक्ते, तस्य त्रितीया गतिर्भवती।
संपत्तीचा विनियोग तीन मार्गानी होतो, दान, त्याचा उपभोग घेणे आणि नाश पावणे. जे दान देत नाहीत किंवा जे त्याचा उपभोग घेत नाहीत त्यांच्या संपत्तीचा नाश होतो. पसा गुंतवणे, तो वाढवणे हे त्याचा उपभोग घेण्यासारखेच आहे.
(लेखक सेबीकडे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)
लक्षात घ्यावयाच्या ठळक गोष्टी
1 वैयक्तिक स्वरूपात दिलेल्या देणगीवर कलम ‘८० जी’नुसार वजावट मिळते तर व्यावसायिक आणि औद्योगिक उपक्रमांस कलम ३५ (१) (२) व कलम ३५ एसी अंतर्गत वजावट मिळते.
1 या व्यतिरिक्त कलम ‘८० जीजीए’अंतर्गत वैयक्तिक देणगीदार जे व्यावसायिक नाहीत अशा व्यक्तींना, शास्त्रीय संशोधन करणाऱ्या संस्था, विद्यापीठे किंवा विद्यालये यांना दिलेल्या देणग्यांवर १००% वजावट त्यावर्षीच्या उत्पन्नातून मिळते.
1 देणगीची वजावट आयकराच्या कोणत्याही एकाच कलमाखाली घेता येते.
1 देणगी १० हजार रुपयांच्या वर असल्यास धनादेश किंवा डिमांड ड्राफ्टनेच द्यावी लागते. १० हजारांपेक्षा अधिक रोख देणगीवर आयकरात सूट मिळत नाही.

Story img Loader