शक्यता अशीही आहे की, निफ्टीवर अजूनही  ५५० ते ६०० गुणांचा व सेन्सेक्सवर २,००० गुणांचा घातक उतार बाकी आहे. निफ्टी ५,३०० पर्यंत खाली आल्यावर मंदीचे एक आवर्तन संपेल.
आपणांसी जे ठावे ते इतरांसी सांगावे
शहाणे करून सोडावे सकल जन
समर्थाच्या दासबोधातील हा श्लोक डोळ्यासमोर ठेवून २६ नोव्हेंबर २०१२च्या ‘अर्थ वृत्तान्त’मध्ये शेअर मार्केटचा संभाव्य उच्चांक काय असेल याचा आढावा घेण्यात आला होता. लेखाचे शीर्षक होते ‘गणित नवीन उच्चांकाचे’. पण अंतिम परिणाम चिंतीत करणाराच! त्या लेखातील खालील उतारा फार महत्त्वाचा होता. निफ्टी येणाऱ्या दिवसात ५९५० ते ६०५० पर्यंत मजल मारताना दिसेल व तेजीच्या उधाण वाऱ्यात ६१५०ची शक्यताही नाकारता येत नाही. वरील सर्व पातळ्यांवर गुंतवणूकदारांनी समभाग विकून फायदा पदरात पाडून घेणे इष्ट ठरेल. कारण हे तेजीच अंतिम पर्व आहे व फेब्रुवारी २०१३च्या पश्चात घातकी उतारांना बाजाराला सामोरे जावे लागणार आहे.  ज्या वाचकांनी समभाग विकून फायदा पदरात पाडून घेतला असेल त्यांना आताच्या घडीला समभाग अतिशय स्वस्तात मिळत आहेत. आता समभाग खरेदी करण्याचा मोहही होत असेल.  दीर्घकालीन गुंतवणूकदारांना हे स्तर अतिशय आकर्षक वाटत आहेत. पण या घडीला समभाग खरेदी करण्याची घाई करू नका. थोडी सबूरी ठेवा. कारण यापेक्षा स्वस्तात आपल्याला समभाग मिळणार आहेत यावर श्रध्दा ठेवा.  
येणाऱ्या दिवसांतील घातक उतारांची कारणे –
राजकीय अस्थर्य : दक्षिणेतील द्रविडी प्राणायामामुळे केंद्र सरकारचा श्वास घुसमटायला लागला. नेहमी अशी बिकट परिस्थिती ‘मुलायम’ पध्दतीने हाताळणारे यावेळेला ‘तिसऱ्याच गोष्टी’ करायला लागले. त्यामुळे संकटकाळी कुठला मित्र धावून येतो याची शोधाशोध सुरू झाली व या मत्रीची किंमत म्हणजे राज्याला ‘विशेष विकास दर्जाची’ अथवा ‘वाढीव आíथक निधी’ची मागणी रेटत राहायची, असे हेतू साध्य करणारी.
पहिला हेतू : उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालमध्ये नवीन सरकार येऊन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यामुळे प्रस्थापित सरकारविरुध्दची लाट (अ‍ॅण्टी इन्कम्बन्सी वेव्ह) हळूहळू जोर पकडायला लागली आहे. त्यामुळे आम्ही विकासास कटिबद्ध आहोत मात्र केंद्र सरकारच वाढीव विकास निधी देत नाही, असे कारण सांगून राज्यातील जनक्षोभ शांत करायचा.
दुसरा हेतू : आपले उपद्रवमूल्य वाढवून पर्यायाने राजकीय अस्थर्य वाढवून लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकांची टांगती तलवार ठेवून जास्तीत जास्त राजकीय फायदा पदरात पाडून घ्यायचा.
हे विस्ताराने अशासाठी मांडत आहे की, राजकारण व अर्थकारण हे हातात हात घालून चालत असतात. वरील उल्लेखलेल्या राजकारणाची पडछाया अर्थव्यवस्थेवर कशी पडते ते पाहा –
केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत नुकताच सादर झाला. त्यात या ‘विशेष विकास दर्जा’ची कुठेही तरतूद नाही. पुढे ही जी काही लाखो करोडो रुपयांची तरतूद करायची म्हटले तरी आíथक तुटीचे काय? मानवतेच्या दृष्टीकोनातून दुष्काळासाठी वाढीव तरतूद करावीच लागणार आहे व हे सर्व कमी म्हणून चालू खात्यातील तूट (करंट अकाऊंट डेफिसिट) धोकादायक पातळीवर पोहोचलेली आहे व या आगीत तेल ओतण्याचे काम सशक्त डॉलर करत आहे.
जोपर्यंत आíथक तूट नियंत्रणात येत नाही तोपर्यंत चलनवाढ/महागाई आटोक्यात येणार नाही. त्यामुळे व्याजदर हे चढेच राहणार व स्वस्तात कर्ज मिळण्याची आशा धूसर होणार आणि विकासदर ५%च्या आसपास घुटमळत राहणार. या दुष्टचक्राचा अंतिम परिणाम म्हणजे भविष्यात हेच कारण दाखवत आंतरराष्ट्रीय पतमापन संस्था ‘मूडी’, ‘एस अ‍ॅण्ड पी’ या भारताचे गुंतवणूकयोग्य मांनाकन उणे (खाली) करणार जो भांडवली बाजाराला व आंतरराष्ट्रीय बाजारातील भांडवल उभारण्याच्या भारतीय उद्योगांच्या प्रक्रियेला धक्का बसवेल.
हे भारताच्या बाबतीत झाले आता आंतरराष्ट्रीय स्तरावरची आíथक संकटे पाहू –
१) आंतरराष्ट्रीय बाजारात सोने – चांदीची विक्रमी घसरण होत आहे. अवघ्या तीन महिन्यात चांदी प्रति किलो ६३,४०० वरून ५१,००० पर्यंत खाली आली. सोने तोळ्यामागे ३०,८०० वरून २९,००० रुपयांवर आले. जेव्हा गुंतवणूकदारांचा गुंतवणूकयोग्य पर्यायांवरचा विश्वास उडतो तेव्हा लोक सुरक्षित पर्याय म्हणून मौल्यवान धातूचा पर्याय निवडतात. आता गुंतवणूकदारांना सोने-चांदीवरदेखील विश्वास वाटत नसेल तर हे लक्षण अर्थव्यवस्था मंदीच्या उंबरठय़ावर उभी आहे, असेच सांगणारे आहे.
२) अमेरिकेची आíथक समस्या – ‘फिस्कल क्लिफ’ अजूनही सुटलेली नाही व डाऊ जोन्सचा आलेख तेजीच्या अंतिम चरणावर आहे.  तिथून पुढे तो मंदीकारक होईल.
३) आशिया खंडातील दक्षिण व उत्तर कोरियाचा युध्दज्वर.
४) श्रीलंकेची समस्या भारतासाठी ‘डोकेदुखी’ ठरत आहे व चीनसाठी सुवर्णसंधी ठरत आहे.
५) युरोपचे दुष्टचक्र अजूनही संपलेले नाही. त्यात सायप्रसची भर पडली आहे.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर येणाऱ्या दिवसात भारतीय शेअर बाजाराची दिशा कशी असेल याचा आढावा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे घेऊ या –
२९ जानेवारी २०१३ ला निर्देशांकांनी उच्चांक केला. निफ्टीची ६,१११ व सेन्सेक्सची २०,२०३ वरून पहिली जोरदार घसरण सुरू झाली व हे दोन्ही निर्देशांक अनुक्रमे ५,६०४ व १८,५६८ पर्यंत खाली आले. मध्यंतरी जी तेजी दिसते ती मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक आहे. सध्या निफ्टी ५,५५० व सेन्सेक्स १८४५० या खालच्या आधारस्तरावर आहेत. अशा परिस्थितीत बाजाराच्या आगामी प्रवासात दोन शक्यता दिसून येतात –
शक्यता १ : अती समभाग विक्रीचा मारा झाल्याने बाजार पुन्हा उसळी घेऊ शकेल. निफ्टी यातून ५,७०० ते ५,८००चा तर सेन्सेक्स १९,००० चा टप्पा दाखवू शकेल. पण त्यानंतर पुन्हा घातक उतार सुरू होईल. निफ्टी ५,२०० ते ५,३०० आणि सेन्सेक्स १७,५०० चा तळ दाखवेल.
शक्यता २ : निफ्टीने ५,५५० हा जीवन-मरणाचा आधारस्तर तोडून तो या पातळीखाली आठवडाभर राहिल्यास लगेचच या निर्देशांकाचा पुढचा टप्पा हा ५,३०० असेल.
दोन्ही शक्यतेतून अंतिमत: निफ्टी निर्देशांक ५,३०० तर सेन्सेक्स निर्देशांक १७,३५० ते १७,४०० पर्यंत खाली येईल. थोडक्यात, निफ्टीवर अजूनही ५५० ते ६०० गुणांचा व सेन्सेक्सवर २,००० गुणांचा घातक उतार बाकी आहे. तथापि निफ्टी ५,३०० पर्यंत खाली आल्यावर मंदीचे एक आवर्तन मात्र संपेल.