डीएसपी ब्लॅकरॉक इक्विटी फंड
मागील २० वर्षांच्या इतिहासात १६ वेळा पहिल्या पाच फंडांच्या पंक्तीत असलेला आणि मागील १० वर्षांत कायम अव्वल परतावा देणारा हा फंड राहिला आहे. तरी निर्देशांक ३१ हजारांवर असताना निर्धास्तपणे गुंतवणूक करावी, अशी या फंडाबाबत शिफारस करावीशी वाटते, त्याला कारणीभूत अनेक घटक आहेत. फंडाचे निधी व्यवस्थापक म्हणून अतुल भोळे यांचे असणे, हा त्या घटकांमधील एक ठळक पैलू ..
In the short run, the market is a voting machine but in the long run, it is a weighing machine.
बेंजामिन ग्रॅहम यांच्या वरील अवतरणाची सत्यता पडताळून पाहावी अशी सध्याची परिस्थिती आहे. मतदान यंत्र व्यक्तिसापेक्ष कल बदलत असते. परंतु तराजू हे व्यक्ती, स्थळ किंवा काळसापेक्ष बदलत नाही. १ किलो वजनाची वस्तू ही मुंबई, पुणे किंवा अन्य ठिकाणी, अन्य व्यक्तीने वजन केल्यास त्या वस्तूचे वजन १ किलोच दाखवेल असा ग्रॅहम यांच्या विधानाचा अर्थ होतो. निर्देशांकाने ३१ हजारांच्या शिखराला स्पर्श केल्याने व्यक्तिसापेक्ष बाजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची शक्यता असली तरी दीर्घ कालावधीसाठी बाजारात गुंतवणुकीसाठी यापेक्षा सर्वात चांगली संधी उपलब्ध नसेल, हेही नि:संशय खरे. १ जुलैपासून लागू होणाऱ्या वस्तू व सेवाकर अर्थात जीएसटी प्रणालीमुळे सरकारचा महसूल नक्कीच वाढणार आहे. याचा परिणाम वित्तीय तूट कमी होण्यात होईल. दोन ते तीन वर्षांचा विचार केल्यास सध्याचे मूल्यांकन मुळीच महाग वाटत नाही.
डीएसपी ब्लॅकरॉक इक्विटी फंड या फंडाने २९ एप्रिल रोजी २० वर्षे पूर्ण केली. २९ एप्रिल १९९७ रोजी गुंतविलेल्या १००,००० रकमेचे, २५ मे २०१७ रोजीच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्ही प्रमाणे ४५ लाख झाले असून परताव्याचा वार्षिक दर २१.०६ टक्के आहे. डायव्हर्सिफाइड फंड गटात हा परतावा पहिल्या तीन अव्वल फंडात मोडतो. १९९७ ते २००७ या कालावधीत फंडाने संदर्भ निर्देशांकाच्या परताव्यापेक्षा मोठय़ा फरकाने अव्वल कामगिरी केली आहे. अतुल भोळे हे फंडाची धुरा जून २०१६ पासून सांभाळत आहेत. मागील एका वर्षांत फंडाने ३३ टक्के परतावा दिला आहे. जरी डीएसपी ब्लॅकरॉक हे फंड घराणे ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग टेक्निक’ आचरणात आणणारे आहे. उच्च व्यवस्थापन दर्जा व अव्वल व्यवसाय पद्धती असलेला समभाग महाग वाटला व ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग टेक्निक’च्या चौकटीत जरी बसला नाही तरी प्रसंगी उत्सर्जनात वृद्धी दाखविणाऱ्या उद्योगात गुंतवणूक करणारे निधी व्यवस्थापक अशी त्यांची ख्याती आहे. फंडाच्या गुंतवणुकीत बँका, वाहन उद्योग, ग्राहकोपयोगी वस्तू (एफएमसीजी), तेल व नैसर्गिक वायू, सिमेंट व बांधकाम या क्षेत्रांतील कंपन्यांना प्राधान्य देतानाच आरोग्यनिगा व माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रापासून ते दूर राहिले आहेत. फंडाच्या गुंतवणुकीपैकी ६५ टक्के गुंतवणूक लार्ज कॅप प्रकारच्या समभागात आहे. उर्वरित गुंतवणूक मिड कॅप व स्मॉल कॅप प्रकारच्या समभागात आहे.
गुंतवणुकीत वैविध्य साधताना फंडाने गुंतवणुकीत स्टेट बँक, आयटीसी, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, येस बँक हे सर्वाधिक गुंतवणूक असलेले आघाडीचे पाच समभाग आहेत. या पाच समभागांच्या एकत्रित गुंतवणुकीचे एकूण गुंतवणुकीशी प्रमाण २१ टक्के आहे. फंडाचा ७८ टक्के वेळा तीन वर्षांचा चलत परतावा १५ टक्क्यांहून अधिक राहिला आहे. फंडाचा पाच वर्षांचा चलत परतावा ८१ टक्के वेळा १५ टक्क्यांहून अधिक आहे. मागील पाच वर्षांत दरमहा ५,००० रुपये नियोजनबद्ध (एसआयपी) गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना त्यांच्या एकूण ३ लाखांच्या गुंतवणुकीचे २५ मे २०१७ रोजीच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीप्रमाणे ४.८३ लाख रुपये गुंतवणूकमूल्य झाले असून, परताव्याचा दर १८.३२ टक्के आहे.
फंडाच्या मागील २० वर्षांच्या इतिहासात १६ वेळा फंड पहिल्या पाच फंडांच्या पंक्तीत राहिला आहे. मागील १० वर्षांत फंड कायम अव्वल परतावा देणारा फंड राहिला आहे. फंडाच्या सुरुवातीपासून गुंतवणूक केलेल्यांना फंडाने ४४ पट भांडवली वृद्धी दिली असल्याने दीर्घकालीन वित्तीय उद्दिष्टांसाठी फंड एक आकर्षक गुंतवणूक पर्याय राहिला आहे. २,३१० कोटी रुपये मालमत्ता असलेल्या फंडाचे अतुल भोळे हे जाणते निधी व्यवस्थापक असून एचडीएफसीच्या प्रशांत जैन यांच्याप्रमाणे, नुसते फंड व्यवस्थापकाचे नाव पाहून फंडात गुंतवणूक करावी अशी ख्याती असलेले निधी व्यवस्थापक अशी त्यांची ओळख आहे. निर्देशांक ३१ हजारांवर असताना गुंतवणूक विश्वासाने ज्याच्या हाती सोपवावी असा निधी व्यवस्थापक असलेला हा फंड गुंतवणुकीचा एक भाग नक्कीच असायला हवा.
वसंत माधव कुलकर्णी
shreeyachebaba @gmail.com