नियोजन भान
आजचे नियोजन ‘लोकसत्ता’च्या पुण्यातील वाचक ऋजुता (३८) यांचे आहे. सध्या त्यांचे वास्तव्य कोथरूड भागातील कर्वेनगरात असले तरी त्यांचे बालपण पुण्यातील शनवार पेठेतील वाडय़ात गेले. त्यांचे शालेय शिक्षण अहिल्यादेवी हायस्कूलमधून झाले, तर पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून उपयोजित कला शाखेतील पदवी घेतली. पदवी जरी चित्रकलेतील असली तरी त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन शिवणकला (फॅशन डिझाइन) आहे. पारंपरिक कपडय़ांना आधुनिक साज चढवितात. चित्रकार असल्याने रंगसंगतीवर त्यांची हुकूमत आहे. पुण्यात त्यांची दोन बुटिक्स आहेत. कोथरूड भागातील बुटिक स्वत:च्या जागेत आहे, तर बावधन भागातील बुटिक भाडय़ाच्या जागेत आहे. आपण आरेखलेली वस्त्रे स्वत: परिधान करून कधी कधी एखाद्या ‘फॅशन शो’मध्ये त्या रॅम्पवर पदन्यासही करतात. ऋजुता यांच्या आईला आपल्या मुलीच्या पशाचे योग्य नियोजन व्हावे अशी इच्छा असल्याने आईनेच पुढाकार घेऊन पहिली भेट नोव्हेंबर महिन्यात घडवून आणली. डिसेंबर महिन्यात मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या एका ‘फॅशन शो’साठी त्या आल्या होत्या. पुढे आणखी एकदा लोकसत्ताच्या कर्मचारी उपाहारगृहात भेट झाली. या दोन भेटीदरम्यान नियोजन नक्की केले.
ऋजुता यांनी एक सदनिका पुण्याच्या चांदणी चौक परिसरात घेतली असून या सदनिकेचा ताबा २०१५ च्या दिवाळीत मिळणे अपेक्षित होते आता हा ताबा मार्च २०१६ पर्यंत मिळणे अपेक्षित आहे. ऋजुता यांच्या व्यवसायातील उलाढाल जरी मोठी असली तरी नफ्याचे कमी प्रमाण असल्यामुळे नफा कमी होतो. व्यावसायिक खर्च, गृहकर्ज फेड व कौटुंबिक खर्च वजा होता वार्षकि अडीच लाखांची बचत त्या करू शकतात. ऋजुता यांच्याकडे चार लाखांच्या मुदत ठेवी असून त्यांनी काही दागिने बनवून घेतले आहेत. या दागिन्यांची किंमत आजच्या बाजारभावानुसार अंदाजे पाच लाख असेल. हे दागिने दैनंदिन वापरातील नसून ते बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवले आहेत. या दोन भेटीदरम्यानच्या काळात दोन मुदत ठेवींची मुदतपूर्ती झाल्याने ही रक्कम अल्प मुदतीच्या रोख्यात गुंतवणूक करणाऱ्या एलआयसी नोमुरा सेिव्हग्ज प्लस या शॉर्ट टर्म फंडात तात्पुरती गुंतविली आहे. मुदतपूर्तीनंतर नूतनीकरण न करता रक्कम मुदत ठेवीऐवजी म्युच्युअल फंडात गुंतविणे हा ऋजुता व त्यांच्या आईच्या पारंपरिक दृष्टिकोनाच्या चौकटीत न बसणारे होते. परंतु एलआयसी ही विश्वासू नाममुद्रा असल्याने त्या तसे करण्यास तयार झाल्या. मुदत ठेवींचे नूतनीकरण न करता अल्प मुदतीसाठी म्युच्युअल फंडात रक्कम गुंतविण्याचा निर्णय ऋजुता यांच्यासाठी हा पहिलाच प्रसंग होता.
ऋजुता यांच्या मागील तीन वर्षांची प्राप्तिकर विवरणपत्रे व गृहकर्जाचा तपशील पाहिला असता, विवरणपत्रातून असे दिसून आले की, बँकेने मुदत ठेवींच्या व्याजावर उगमस्थानी प्राप्तिकर कपात केली आहे (त्यावेळी बँकेत आजच्या पेक्षा अधिक ठेवी होत्या) तर दुसऱ्या बाजूला आíथक वष्रे २०१४-१५ दरम्यान गृहकर्जावर त्यांनी १,५५,६७५ रुपये व्याज दिले आहे. सध्याच्या कर नियोजनाच्या दृष्टीने केलेली ही गुंतवणूक वित्तीय अयोग्य वाटल्याने गुंतवणुकीत मोठे बदल करणे आवश्यक होते. ऋजुता यांनी ‘असहिष्णू सेकंड होम’ हा लेख वाचल्यानंतर त्यांना आपली चूक लक्षात आली असून सदनिकेचा ताबा मिळाल्यावर ही सदानिका त्या संभाव्य कराचा विचार करून विकणार आहेत. सध्याच्या मालमत्ता बाजारपेठेचा विचार करता व कर्जावर भरलेले व्याज लक्षात घेता त्यांना फार काही फायदा होईल असे वाटत नाही. साहजिक काही कर भरावा लागेल असेही वाटत नसल्याने ताबा मिळताच हे घर त्यांना विकण्याचा सल्ला दिला. या सदनिकेला एप्रिल मे २०१६ दरम्यान किती किंमत मिळेल याचा अंदाज नसल्याने हा निर्णय ताबा मिळाल्यावर किमतीचा अंदाज घेऊन करावा असे ठरले. ही सदनिका विकल्यास दरवर्षी व्याजापोटी खर्च होणारे व कर्जाचा हप्ता थांबल्यामुळे रोकड सुलभता वाढेल. सध्याच्या एका अंदाजानुसार हे घर विकल्यास कर्जफेड करून त्यांच्याकडे अंदाजे २० लाखाची रोकड सुलभता असेल. हे २५ लाख गुंतविण्यासाठी त्यांना चार पीएमएस सेवा देणाऱ्या म्युच्युअल फंडांची नावे सुचविली.
दुसरा पर्याय म्हणून त्यांना करमुक्त रोख्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. कर नियोजनाच्या दृष्टीने ३० टक्के करकक्षेत असणाऱ्या करदात्यांसाठी करमुक्त रोखे ही आदर्श गुंतवणूक ठरते. रोकड सुलभता, मुद्दलाची सुरक्षितता व पुरेसा व्याजदर लक्षात घेऊन ऋजुता यांना करमुक्त रोख्यांत गुंतवणूक करण्याची शिफारस केली. मागील काही दिवसांत विक्री झालेल्या २० वष्रे मुदतीच्या रोख्यांच्या खरेदीसाठी अर्ज दाखल करण्याची जवळजवळ सक्तीच केली. दोन महिन्यांत त्यांनी ५० हजारांचे रोखे खरेदी केले आहेत. पुढील पाच वर्षांत प्रत्येक करमुक्त रोखे विक्रीत भाग घेऊन दोन लाखांचे रोखे जमा करण्याचा सल्ला दिला. ऋजुता या सध्या प्राप्तिकराच्या २०% कर कक्षेत येत असल्या तरी भविष्यात त्या ३०% कर कक्षेत येतील. तेव्हा या रोख्यांचा त्यांना फायदा होईल. हे रोखे रोकड सुलभ असल्याने आणीबाणीच्या प्रसंगी मोठी रक्कम उभी करण्यास सोयीचे व कर्जासाठी तारणयोग्य असल्याने हा सल्ला दिला. आपल्या व्यवसायात नित्यनावीन्याची आस असणाऱ्या ऋजुता यांची गुंतवणुकीतील नावीन्य अनुभवण्यास तयारी नव्हती. त्यावेळी त्यांना आठवल्या त्या भारतीयांचे लोकप्रिय साधन असलेल्या बँकांच्या मुदत ठेवी, व ४-४.५% परतावा देणाऱ्या पारंपरिक विमा योजनांपेक्षा करमुक्त रोख्यांचा पर्याय अधिक परतावा देणारा असल्याने कटाक्षाने या विमा योजना व मुदत ठेवी या दोन्हीपासून दूर राहण्याची शिफारस केली. मार्च महिन्यात घराचा ताबा घेऊन ते विकावे असे ठरल्याने पीपीएफ, एनपीएस या दीर्घकालीन गुंतवणूक पर्यायांचा विचार मालमत्ता विकणे अथवा न विकणे हे ठरल्यावर करावा असे ठरले. दीर्घकालीन गुंतवणुकीचा व सेवानिवृत्ती पश्चात बचतीचा विचार आताच करण्याची आवश्यकता नाही. सध्या जी काही शिल्लक राहते ती गृहकर्ज फेडण्यासाठी वापरावी असे ठरले. सध्याच्या दिशा नसलेल्या आíथक परिस्थितीत एक एक करून निर्णय विचारपूर्वक घेणे उचित ठरेल हे त्यांनासुद्धा पटले आहे.
या सदराचा उद्देश अर्थसाक्षरता होता हा उद्देश बहुतांशी सफल झाल्याने आजच्या या नियोजनाबरोबर या सदराची सांगता होत आहे. शतकाच्या उंबरठय़ावर बाद झालेल्या फलंदाजाची जी भावना असते तीच भावना हे सदर थांबवितानाची आहे. या सदरातून ९४ कुटुंबीयांचे नियोजन प्रसिद्ध झाले. दोन वर्षांत ९४ आíथक नियोजने करणे व्यावसायिक नियोजकालासुद्धा शक्य नसते. इतक्या मोठय़ा संख्येने नियोजने लिहिता आली ती वाचकांच्या या सदराला अपेक्षेहून अधिक प्रतिसादामुळेच. १००० शब्दांच्या मर्यादित चौकटीत एखाद्याचे नियोजन मांडणे कठीण होते. म्हणून त्या कुटुंबीयांच्या एखाद्या मुख्य गोष्ट नक्की करून त्याभोवती नियोजनाची मांडणी केली. त्यामुळे काही गोष्टी मांडायच्या राहून गेल्या. त्या गोष्टी वाचक कुटुंबीयांना प्रत्यक्ष सांगितल्या होत्या. हे सदर सर्वस्वी वाचकांच्या प्रतिसादावर अवलंबून असल्याने नोव्हेंबर २०१३ मध्ये या सदराची जुळवाजुळव सुरू होती तेव्हा वाचकांचा या सदराला कितपत प्रतिसाद लाभेल याविषयी साशंकता होती. गोंदियापासून मुंबईपर्यंत व नागपूरपासून सोलापूपर्यंत अशा महाराष्ट्राच्या चारही दिशांच्या वाचकांचा समावेश या सदरात करता आला. केवळ दोन अपवाद वगळता (पकी एका वेळी वाचक कुटुंबाचे छायाचित्र वेळेत न आल्याने) काय लिहायचे असा प्रश्न पडला नाही. त्याबद्दल ज्या वाचक कुटुंबीयांचे नियोजन प्रसिद्ध झाले त्या सर्वाच्या सहकार्याबद्दल आभार. ज्या वाचकांचे नियोजन प्रसिद्ध होऊ शकले नाही त्यांच्या प्रति खेद व्यक्त करतो. कर नियोजनासाठी करावयाच्या गुंतवणुकीचा विचार करताना पीपीएफ व पारंपरिक विमा योजना यांच्यापलीकडे असलेल्या पर्यायांचा वाचकांनी विचार केल्यास या सदराचा उद्देश सफल झाला असे मानता येईल. ‘लोकसत्ता’ने ही संधी दिली त्याबद्दल संपादकीय मंडळाचे आभार मानतो. नूतन वर्षांभिनंदनाच्या शुभेच्छांसह निरोप घेतो.
(समाप्त)
shreeyachebaba@gmail.com