रोकड सुलभतेच्या जोडीला कुशल नियोजनाची जोड नसेल तर वरवर पाहता बरे दिसणारे नियोजन खोलवर पाहिल्यास किती कामचुकार असते हे आजच्या नियोजनाच्या निमित्ताने जाणून घेऊ.
मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरात वास्तव्यास असलेले समीर (३२) व मेखला (३२) हे स्वतंत्र व्यावसायिक  आहेत. समीर हे अभियंते असून त्यांनी परदेशातून इंडस्ट्रियल इंजिनीयिरग या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. अमेरिकेतील शिक्षण व नंतर पाच वर्षांच्या वास्तव्यानंतर दोन वर्षांपूर्वी ते भारतात परत आले. त्यांच्या कौटुंबिक व्यवसायाला जोड म्हणून त्यांचा परदेशातून आयात केलेल्या एका भांडवली वस्तूंच्या (यंत्रसामग्री) उत्पादकाच्या वतीने उभारणी व विक्रीपश्चात निगा व दुरुस्ती देण्याची सेवा सेवा पुरवणारा व्यवसाय आहे. हा दुसरा व्यवसाय त्यांनी तीन वर्षांपूर्वी सुरू केला. त्यांच्या कंपनीचे कार्यालय अंधेरी येथे एका औद्योगिक वसाहतीत आहे. तर सेवा केंद्र पनवेल परिसरात आहे. या दोन्ही व्यवसायाचे दैनंदिन व्यवस्थापन समीर पाहात असले तरी या व्यवसायांची मालकी कौटुंबिक आहे. समीर यांचे वडील ते स्वत: व त्यांच्या आई हे हा व्यवसाय ज्या कंपनीमार्फत चालविला जातो त्या कंपनीचे संचालक आहेत. त्यांच्या कंपनीची मुंबई व पुणे व गोवा येथे कार्यालये आहेत. त्यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या चारशेच्या आसपास आहे. समीर यांच्या पत्नी डॉ. मेखला या वैद्यकीय व्यवसायात आहेत. त्यांचा मुलगा शौर्य हा चौदा महिन्यांचा आहे.  प्रसूतीसाठी व्यवसायातून उसंत घेतलेल्या मेखला यांनी अजून पूर्णवेळ व्यवसायास सुरुवात केलेली नाही. समीर यांच्या आई मृदुला वागळे या ‘लोकसत्ते’च्या वाचक आहेत. त्यांनी समीर व डॉ. मेखला यांचे नियोजन करण्यास पुढाकर घेतला त्याबद्दल त्यांचे आभार.
दोन टप्प्यात या नियोजनाचा ढाचा ठरला व शेवटी तासाभराच्या भेटीअंती या नियोजनाला अंतिम रूप दिले गेले. दरम्यान समीर यांच्या अनेक शंकाचे निराकरण केले. पहिल्याच संभाषणादरम्यान अति रोकड सुलभता हा समीर यांच्या नियोजनातील दोष आहे, हा मनात आलेला विचार समीर यांना सुद्धा पटला. त्यांनी केलेली प्रत्येक गुंतवणूक (पॉलिसी) त्यांनी कोणाच्या तरी भीड वा मर्जीखातर केली आहे. पहिली गोष्ट जीवन विमा म्हणजे बचत किंवा संपत्तीची निर्मिती नव्हे. अनावश्यक जीवन विम्याची खरेदी करतानाच नियोजनाची पहिली पायरी असलेला मुदतीचा विमा समीर यांच्याकडे नसणे हे याचे उदाहरण आहे. आज समीर यांच्यासमोर कोणतेही वित्तीय लक्ष्यननाही. पुढील तीन महिन्यात अनावश्यक विविध कंपन्यांच्या पंचवीस जीवन विमा पॉलीसी बंद करणे व मासिक चार लाखाच्या रोकड सुलभतेचे नियोजन अशी दोनच उद्दिष्टे समोर ठेऊन नियोजन केले आहे.
जे विमा पॉलिसीचे वेगवेगळे प्रकार आहेत या पकी ‘की मॅन इन्शुरन्स’ पॉलिसी हा एक प्रकार आहे. व्यवसायातील एखाद्या महत्वाच्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे कंपनीची जी संभाव्य हानी होऊ शकते त्या व्यावसायिक नुकसानाची भरपाई करणारी ही पॉलिसी आहे. परंतु ही पॉलिसी घेण्यासाठी ज्या व्यक्तीचा विमा उतरविण्यात येणार आहे ती व्यक्ती ‘की मॅन’ (अथवा वूमन) आहे हे सिद्ध करणे जरुरी असते. या योजनेत मिळणारे विमाछत्र त्या कंपनीला होणाऱ्या वार्षकि नफ्यावर ठरते. या योजनेअंर्तगत कमाल ७७ कोटींचे विक्रमी विमाछत्र एलआयसीने दिले आहे. कोणा एका व्यक्तीला एकाच पॉलीसीत दिलेले देशातील हे सर्वात मोठे विमाछत्र आहे. तथापि प्रचंड मोठी रोकड सुलभता बाळगणाऱ्या व्यक्तींकडे ही पॉलिसी नसते. याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत. आपला अशील हा त्यांच्या व्यवसायातील ‘की मॅन’ आहे याविषयी अज्ञान असणे व तो किंवा ती ‘की मॅन’ आहे हे सिद्ध करण्यास घ्यावे लागणाऱ्या कष्टाची तयारी नसणे. विमा विक्रेते व वित्तीय नियोजक यामधील फरक अशा गोष्टी अधोरखित करू शकतो. समीर हे या पॉलिसीसाठी असलेल्या ‘की मॅन’च्या व्याख्येत बसत असल्याने समीर यांच्यासाठी हा विमा खरेदी करावा. या पॉलिसीच्या निकषानुसार समीर यांना चौदा कोटीचे विमा छत्र मिळू शकेल.
आज समीर यांच्याकडे सर्व पंचवीस पॉलिसी मिळून केवळ ७२ लाखांचे विमाछत्र आहे. समीर यांचे उत्पन्न व कुटुंबाची जीवनशैली पाहता हे विमाछत्र अपुरे आहे. वैयक्तिकरित्या मेखला व शौर्य यांच्या आíथक सुरक्षिततेसाठी समीर यांचा पाच कोटीचा तीस वष्रे मुदतीचा विमा असणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना अंदाजे पन्नास हजारांचा वार्षकि हप्ता भरावा लागेल. समीर यांचे उत्पन्न वाढेल तसे या विमाछत्रात टप्प्याटप्प्याने वाढ होणे गरजेचे आहे. डॉ. मेखला यांनी एक कोटीचे विमा छत्र व तीस वष्रे मुदतीचा विमा घ्यावा. डॉ. मेखला यांना सव्वा कोटीपेक्षा अधिक रक्कमेचा विमा मिळणार नाही. एक कोटी विमा छत्रासाठी त्यांना विम्याचा वार्षकि हप्ता १०,०३४ रुपये भरावा लागेल.
समीर यांच्याकडे सध्या खासगी सर्वसाधारण विमा कंपनीची त्यांना दहा लाखाचे विमाछत्र देणारी आरोग्य विमा योजना आहे. सध्याच्या आरोग्य विमा योजनेची मुदत एप्रिल महिन्यात संपते. त्यांची पॉलिसी संपण्याआधी ४५ दिवस न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्सकडे सध्याची पॉलिसी वर्ग (पोर्ट) करावी. न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स या विमा कंपनीची ‘न्यू इंडिया फॅमिली फ्लोटर’ ही पॉलिसी त्यांच्या सध्याच्या पॉलिसीच्या तुलनेत अधिक उजवी आहे. या पॉलिसीच्या जोडीला ‘सुपर टॉपअप प्लान’ खरेदी करून समीर यांना २५ लाख विमाछत्र मिळविणे शक्य आहे.
समीर गुंतवणुकीसाठी पारंपारिक प्रकारची साधने वापरत आहेत. उदाहरणार्थ त्यांच्या कुटुंबाकडे दीड कोटीहून अधिकच्या मुदत ठेवी आहेत. या मुदत ठेवींवर व्याजाचा दर आठ टक्के आहे. समीर यांनी स्थावर मालमत्ता गुंतवणूक न्यास (REIT) व खाजगी समभाग गुंतवणूक कंपन्या (Private Equity) या साधनांचा पाच वष्रे गुंतवणूक करण्यास वापर केल्यास अनुक्रमे पंधरा ते अठरा व अठरा ते बावीस टक्के व्याज मिळू शकेल. दोन म्युच्युअल फंडानी स्थावर मालमत्ता गुंतवणूक न्यास स्थापन केले असून त्यांच्या योजना अर्थसंकल्पानंतर गुंतवणुकीस खुल्या होतील अशी अपेक्षा आहे. या म्युच्युअल फंडाच्या एका युनिटची किंमत दोन ते तीन लाखांदरम्यान असेल. समीर यांनी दोन लाखाच्या एसआयपी सुरू करण्यासाठी ‘लोकसत्ता कत्रे- म्युच्युअल फंडां’च्या यादीतून तीन लार्ज कॅप, दोन मिड कॅप, एक बँकिंग व फायनान्शियल सíव्हसेस फंड यांची निवड करावी. बँकिंग व फायनान्शियल सíव्हसेस फंडात पाच वष्रे व अन्य म्युच्युअल फंडात पाच ते दहा वर्षांसाठी गुंतवणूक करावी.  
समीर व मेखला यांनी करावयाच्या गोष्टी
* समीर यांच्यासाठी ‘एससबीआय लाईफ शील्ड’ या ‘की मॅन इन्शुरन्स’ची खरेदी
* समीर यांनी स्वत:साठी पाच कोटी विमाछत्र देणारी तीस वष्रे मुदत असलेली ‘एसबीआय ई शील्ड’  या विमा पॉलिसीची खरेदी करणे
* डॉ. मेखला यांनी स्वत:चा एक कोटींचा तीस वष्रे मुदत असलेला विमा खरेदी करणे.
* समीर यांनी आरोग्य विमा पॉलिसी न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्सकडे पोर्ट करणे व शौर्यचे नांव या पॉलीसीत समाविष्ट करणे.   
* समीर यांनी अन्य स्थिर उपन्न देणाऱ्या साधनांची निवड करणे
* म्युच्युअल फंडात तीन लाखांच्या एसआयपी सरू करणे.
* संपत्ती व्यवस्थापन व्यवसायातील संस्थेचे नोंदणीकृत ग्राहक होणे
shreeyachebaba@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजचा अर्थबोध:
आरोग्य विमा ‘पॉलिसी पोर्टेबिलिटी’ या आधीच सुरू झाली आहे. जर आपण आरोग्य विमा योजना खरेदी करण्यात चूक केली असे वाटले तर पॉलिसी बंद करण्यापेक्षा पसंतीच्या कंपनीकडे आपली पॉलिसी ‘पोर्ट’ करणे (वळती करून घेणे) विमा खरेदीदाराच्या फायद्याचे असते.
‘अर्थ वृत्तान्त’संबंधी अभिप्राय/प्रतिक्रिया कळवा: arthmanas@expressindia.com

आजचा अर्थबोध:
आरोग्य विमा ‘पॉलिसी पोर्टेबिलिटी’ या आधीच सुरू झाली आहे. जर आपण आरोग्य विमा योजना खरेदी करण्यात चूक केली असे वाटले तर पॉलिसी बंद करण्यापेक्षा पसंतीच्या कंपनीकडे आपली पॉलिसी ‘पोर्ट’ करणे (वळती करून घेणे) विमा खरेदीदाराच्या फायद्याचे असते.
‘अर्थ वृत्तान्त’संबंधी अभिप्राय/प्रतिक्रिया कळवा: arthmanas@expressindia.com