पुढे येणाऱ्या बातम्यांप्रमाणे ३ मार्च रोजी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होऊन ८ मार्चपासून अधिसूचना व आचारसंहिता लागू होणे अपेक्षित आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात पहिल्या टप्प्यातील मतदान होईल तर मेच्या पहिल्या आठवडय़ात शेवटच्या टप्प्यातील मतदान होऊन १८ मेच्या सुमारास निवडणूक आयोग राष्ट्रपतींना निवडून आलेल्या खासदारांची यादी सुपूर्द करेल, म्हणजेच १६वी लोकसभा स्थापन होईल. एका अर्थाने हा लेख प्रसिद्ध झाल्यापासून साधारण तीन महिन्यांच्या कालावधीत बाजाराची अवस्था दोलायमान राहणार आहे.
एक माध्यम समूह व ग्राहक संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या निवडणूकपूर्व चाचणीनुसार भाजपप्रणीत आघाडी २७७ जागांवर विजय संपादन करेल तर काँग्रेसला शंभरही संख्या गाठणे कठीण दिसते. परंतु या पक्षाचे प्रवक्ते जसे म्हणतात त्यानुसार चाचणी अंदाज व प्रत्यक्ष निकाल यात बरेच अंतर असते. मागील दोन भागांत आगामी निवडणूक निकाल कसे असतील यांच्या शक्यता पडताळून पहिल्या. जर काँग्रेस व भारतीय जनता पक्ष हे दोन प्रमुख पक्ष दीडशे, पावणेदोनशे जागांच्या आत अडखळले तर त्रिशंकू लोकसभा आलेली दिसेल. पंधराव्या लोकसभेत काँग्रेसला आंध्र प्रदेश व महाराष्ट्र या दोन राज्यांनी साथ दिली. आज तशी परिस्थिती नाही. सध्या काँग्रेस आघाडीला (यूपीएला) २७७ सदस्यांचे समर्थन लाभले आहे. मागे वळून इतिहासाचा धांडोळा घेतला तर १९९४ ते २००७ या काळात ‘निफ्टी’ निर्देशांकाने आवर्ती १४% दराने परतावा दिला आहे. १०८४ ते ६,३५७ पर्यंतचा प्रवास निफ्टीने पार पाडला. परंतु वर उल्लेखिलेली परिस्थिती निर्माण झाली तर जून-जुल २०१४ दरम्यान निफ्टी ४८०० पर्यंत जाणेसुद्धा अशक्य नाही. अशा परिस्थितीत २००८ ते २००९-१० दरम्यान ज्या समभागांनी सर्वोत्तम कामगिरी केली ती तपासू. (तक्ता पाहा)
दीर्घकाल एखाद्या समभागात गुंतवणूक करण्यानेच परताव्याचा दर वाढतो हे जरी खरे असले तरी एखादी गोष्ट गुंतवणूकदाराचा विश्वास डळमळीत करते. एखादी गोष्ट मग ती राजकीय असो किंवा आíथक जगताशी निगडित असो. कारगील युद्ध होण्याआधी सीमेवरच्या हालचालींनी गुंतवणूकदारांना घाम फोडला होता. ज्या वेळेला अशा घटनांमुळे बाजार निराशेच्या गत्रेत जातो, तेव्हा गुंतवणुकीची चांगली संधी उपलब्ध होत असते. अशी संधी पुढील तीन महिने बाजारात उपलब्ध असणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २७२चा आकडा गाठता येईल या बातमीने बाजार वर जाईल तर त्रिशंकू लोकसभेच्या भीतीने खाली जाईल. या वावटळीत लहान प्रादेशिक पक्ष अधिक जागांवर विजयी होणे अर्थव्यवस्थेला परवडणारे नाही, कारण हे प्रादेशिक पक्ष आपापला हिस्सा वसूल करण्यासाठी अर्थसुधारणांना विरोध करीत राहतील. अशा वेळी गुंतवणुकीची क्रयशक्ती वाढविण्यासाठी वर उल्लेख केलेल्या समभागात गुंतवणूक करणे इष्ट ठरेल.
जर अनेपेक्षितरित्या त्रिशंकू लोकसभा निर्माण झाली तर अशा परिस्थितीत निर्देशांकांची घसरण होईल. जर घसरण झाली तर नेमकी कुठे गुंतवणूक असावी हे ठाऊक असावे. सुक्याबरोबर ओलेही जळते तसे बाजारात भूकंप होतो तेव्हाच अव्वल समभाग तुलनेने स्वस्त झालेले असतात. अशाच वेळी गुंतवणुकीची एक चांगली संधी उपलब्ध होत असते आणि ही संधी मार्च महिन्यातील पहिल्या आठवडय़ापासून ते एका आघाडीला जनमताचा कौल न मिळाल्यास निकाल लागल्यानंतरही उपलब्ध होईल. अशा परिस्थितीत ज्याला ‘डिफेन्सिव्ह सेक्टर’ अर्थात बाजाराच्या दृष्टीने संरक्षक उद्योगक्षेत्रे जसे औषध निर्माण व ग्राहकोपयोगी वस्तू असलेल्या कंपन्यांचे समभाग हाती असावेत. वरील विवेचनावरून असे दिसून येते की, मंदीतही या कंपन्या गुंतवणूकदारांना तारून नेण्यास नक्कीच मदत करतात. तेव्हा निवडणुकांचा काहीही निकाल लागला तरी निवडणूकपूर्व पडझडीत या समभागात गुंतवणूक करणे हे हितावह ठरणार आहे.