मिरॅ अ‍ॅसेट टॅक्स सेव्हर फंड

अनेकांचा असा समज आहे की, सेवानिवृत्तीनंतर खर्च कमी होतात. प्रत्यक्षात सेवानिवृत्तीनंतर खर्च कमी न होता खर्चाची कारणे बदलतात. उदाहरणार्थ, अर्थार्जनाच्या काळात छंद, हौस इत्यादीसाठी वेळ नसल्याने छंद जोपासण्यासाठी काही पैसे खर्च होऊ  शकतात. थोडक्यात, जीवनाच्या तिसऱ्या या टप्प्यात अर्थाजन थांबलेले असताना, पूर्वनियोजनाने निवृत्ती कोश तयार करणे आवश्यक ठरते. असा कोश तयार करण्यास मदत करणारा एक उमदा पर्याय..

मानवी जीवनाचे तीन टप्पे आहेत. पहिला टप्पा विद्यार्जनाचा दुसरा अर्थाजनाचा आणि तिसरा सेवानिवृत्तीचा. दुसऱ्या टप्प्यात कमविलेला पैसा महागाईहून अधिक परतावा देणाऱ्या गुंतवणूक साधनांत गुंतविल्यास सेवानिवृत्तीनंतरचे जीवन सुखाचे होऊ  शकते. जीवनाच्या तिसऱ्या टप्प्यात अर्थाजन थांबलेले असताना आपल्या निवृत्तीपूर्व असलेल्या जीवनशैलीला साजेशी जीवनशैली राखायची असेल तर बचतीची क्रयशक्ती वाढविणे गरजेचे असते.

अनेकांचा असा समज आहे की, सेवानिवृत्तीनंतर खर्च कमी होतात. प्रत्यक्षात सेवानिवृत्तीनंतर खर्च कमी न होता खर्चाची कारणे बदलतात. उदाहरणार्थ, अर्थार्जनाच्या काळात छंद, हौस इत्यादीसाठी वेळ नसल्याने छंद जोपासण्यासाठी काही पैसे खर्च होऊ  शकतात. थोडक्यात सेवानिवृत्तीनंतर खर्चाच्या प्राथमिकता बदलत असल्याने तातडीच्या खर्चासाठी बाजूला काढून ठेवायच्या रकमेत वाढ होते. नेमकी याच काळात उत्पन्न थांबलेले असल्याने अर्थार्जनाच्या कालावधीत केलेल्या बचतीवर अवलंबून राहावे लागते. आर्थिक साक्षरतेच्या अभावामुळे अनेकांचा असा समज आहे की व्याजावर जगता येईल. अर्थव्यवस्थेत व्याजदर हे महागाईच्या दराशी संलग्न असतात. याचा अनुभव सरकारने नियंत्रित व्याजदर असणाऱ्या गुंतवणूक साधनांच्या व्याजदरात एकदशांश टक्क्याने कपात केल्याने अनेकांना आला असेल. मागील वर्षभरात केंद्र सरकारने नियंत्रित व्याजदर असणाऱ्या गुंतवणूक साधनांच्या व्याजदरात १.३५ टक्के कपात केली आहे. येत्या आठवडय़ात बँकांकडून ठेवीदरांत कपातीचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिकांना बसतो. घसरते व्याजदर लक्षात घेता, अर्थार्जनाच्या कालावधीत, मोठा निवृत्ती कोश तयार करणे आवश्यक असते.

सेवानिवृत्ती कोश तयार करण्यात सर्वच नोकरदारांना भविष्यनिर्वाह निधीचा पर्याय उपलब्ध असतो. गलेलठ्ठ वेतन असलेल्या चाकरमान्यांना कर वजावटीसाठी आवश्यक असलेली दीड लाखाच्या गुंतवणुकीपैकी मोठा हिस्सा सक्तीच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत करता येतो. अन्य करदात्यांना पर्याय शोधावे लागतात. एक आर्थिक नियोजकाच्या भूमिकेतून विचार करताना मुदतीच्या विम्याच्या हप्त्यांनंतर सर्वाधिक रक्कम कर वजावट पात्र म्युच्युअल फंडात अर्थात ईएलएसएस फंडात होणे आवश्यक असते. ही बचत निवृत्तीपश्चात निर्वाहासाठीची आणि दीर्घ कालावधीसाठी समभागांमध्ये गुंतून राहणार असल्याने गुंतवणुकीच्या संपूर्ण काळात अव्वल परतावा देऊ  शकते.

मागील एका वर्षांत ३८ टक्के व एका वर्षांच्या सिप गुंतवणुकीवर ३६ टक्के परतावा देणारी मिरॅ अ‍ॅसेट टॅक्स सेव्हर फंडाची शिफारस नवीन आर्थिक वर्षांच्या पहिल्या लेखाद्वारे करण्याचे हेच कारण ठरते. डिसेंबर २०१५ मध्ये फंडाने विक्रीला सुरुवात केली आणि गुंतवणूकदारांकडून ३५ कोटी जमविण्यात त्याला यश आले. मागील सव्वा वर्षांत फंडाच्या मालमत्तेत १० पट वाढ झाली असून हा फंड ३५० कोटीचा फंड झाला आहे. पहिल्या वर्षी या फंडाने ५ टक्के लाभांश जाहीर केला आहे. सव्वा वर्षांत फंडाच्या नक्त मालमत्ता मूल्य- एनएव्हीत वाढ होत ३० मार्च रोजी फंडाची रेग्युलर ग्रोथ एनएव्ही १३.३६ इतकी होती.

मिरॅ अ‍ॅसेट या फंड घराण्याच्या अन्य फंडाप्रमाणे यासुद्धा फंडाचे सक्रिय व्यवस्थापन होते. नीलेश सुराणा हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. गुंतवणुकीत ५५ टक्के लार्ज कॅप, ३५ टक्के मिड कॅप आणि उर्वरित १० टक्के गुंतवणुकीसाठी योग्य मूल्यांकन असलेल्या, भांडवली वृद्धीची संधी असलेल्या समभागांचा समावेश गुंतवणुकीत होत असतो. उदाहरणार्थ, फंडाने साधारण वर्षांपूर्वी तोटय़ात असलेल्या टाटा स्टीलचा समावेश आकर्षक मूल्यांकनामुळे केला.

फंड व्यवस्थापनाची प्रसंगी कंपन्यांच्या प्राथमिक विक्रीत अर्ज करून गुंतवणूक करण्याची तयारी असल्याचे दिसून आले आहे. फंडाने गुंतवणुकीत सर्वाधिक गुंतवणूक (२५ टक्के) बँकिंग व आर्थिक सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या समाभागांमध्ये केली आहे. सध्या फंडाच्या गुंतवणुकीत ४०-४५ समभागांचा समावेश आहे. ही संख्या अन्य फंडांच्या तुलनेत कमी असल्याने गुंतवणुकीतील अनावश्यक वैविध्य टाळले आहे, असे वाटते. याचा परिणाम ईएलएसएस फंड गटात एका वर्षांच्या तुलनात्मक परताव्याच्या दरात मागील सहा महिन्यांपासून हा फंड पहिल्या तीन क्रमांकात आहे.

हा फंड अवघा सोळा महिन्यांचा असल्याने या फंडाला गुंतवणुकीचा इतिहास नाही. साहजिकच नामांकित पत निश्चिती करणाऱ्या संस्थांनी या फंडाची पत निश्चित केलेली नाही. त्यामुळे मॉर्निंग स्टार व व्हॅल्यू रिसर्चची पत पाहून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदरांसाठी आजची शिफारस नाही. जे कोणी दहा वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीत करबचतीसोबत संपत्तीची निर्मिती करू इच्छितात अशा गुंतवणूकदारांनी या फंडाचा समावेश गुंतवणुकीत करणे गरजेचे आहे.

वसंत माधव कुलकर्णी

shreeyachebaba@gmail.com