समीर नेसरीकर

आपण पैसे कमवायला लागतो तेव्हा साधारण विशी-पंचविशीत असतो. शहरी भागातील तरुण याच वयामध्ये कामाला सुरुवात करतात. गावात, निमशहरी भागात किंवा ज्यांना परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागते, त्यांची पैसे कमवायची सुरुवात याहीपेक्षा कमी वयात होते. त्यातून मग उद्योगात, व्यवसायात आले की ‘कॉस्ट ऑफ फंड, फिक्स्ड कॉस्ट, शेअर मार्केट, लिव्हरेज, लोन , रिटर्न ऑन कॅपिटल, प्रॉफिट मार्जिन’ इत्यादी शब्द हळूहळू आयुष्याचा भाग होतात. त्यानंतर वैयक्तिक गुंतवणूक करताना ‘पॉवर ऑफ कंपाऊंडिग, टाइम इन द मार्केट, लॉंग टर्म गोल’ यांचीही ओळख होते. इथे प्रकर्षांने हेही जाणवते की, ज्या कुटुंबातील व्यक्तींचा वित्त क्षेत्रातील माहितीशी संबंध येत नाही त्या कुटुंबाचा ‘पोर्टफोलिओ’ त्याच्या जोखीम क्षमतेशी मिळताजुळता नसतो.

Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप

तेव्हा वर लिहिलेल्या संज्ञा आपल्याला मुलांना अगदी ‘टिन एज’मध्ये म्हणजे लहान वयातच शिकवता येतील का? भांडवल बाजार, गुंतवणुकीसंदर्भात अशा कोणत्या गोष्टी/नियम आहेत की, पालक म्हणून ज्यांची ओळख आपण डोळसपणे परंतु एका खेळीमेळीच्या वातावरणात मुलांना करून देऊ शकतो? गुंतवणुकीसंदर्भात असे एक वर्तणूकशास्त्र असते, त्यात बुद्धिमत्तेपेक्षाही भावनांवर नियंत्रण हा खूप वेळेस महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. याचा विचार करताना काही मुद्दे समोर आले. आज ते इथे मांडण्याचा ऊद्देश हाच की, जी मुले माध्यमिक शाळेत आहेत, त्यांच्यापर्यंत हा विचार जावा आणि त्यांची आर्थिक क्षेत्राविषयीची पायाभरणी व्हावी. साध्या साध्या काही गोष्टी पालकांनी जाणीवपूर्वक करायला हव्यात, कसे ते पाहू.

* नियमितता:  दररोज नीटनेटके शाळेत जाणे, दररोज व्यायाम करणे यासारख्या छोटय़ा कृतींना शाबासकी दिल्यास मुलांना नियमिततेची आवड निर्माण होईल. समभागसलंग्न गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून हा आवश्यक गुण आहे.

* बचत: मुलांना आपण जो ‘पॉकेट मनी’ देतो तो लगेचच खर्च न करता सहामाही परीक्षेनंतर, वार्षिक परीक्षेनंतर कसा आणि कोणती वस्तू घेण्यासाठी खर्च करायचा याबद्दलची चर्चा केल्यास मुलांना बचत आणि अंदाजपत्रक (बजेट) या संकल्पनांची तोंडओळख होईल.

* पैसे कमावण्याचा अनुभव: आम्ही लहान असताना उन्हाळय़ाच्या सुट्टीत केलेला एक प्रयोग. आम्ही सात-आठ जणांनी मिळून प्रत्येकाच्या घरातील नवी-जुनी अशी काही चांगली मासिके गोळा केली आणि सोसायटीतील मोठय़ांना वाचायला दिली. एक आठवडा वाचायला वेळ आणि भाडे २ रुपये. त्या साधारण एका महिन्याच्या अवधीत आमच्याकडे २०० रुपये जमले. कालानुरूप बदल करून आजच्या सातवी ते दहावीमधील मुलांना आपण पैसे कमावण्याची कोणती संधी आणि अनुभव देऊ शकतो, याचा विचार झाला पाहिजे.

* संयम: हा भांडवल बाजारातील यशाचा मूलमंत्र आहे. लहानपणी पत्त्यांचा एकावर एक मनोरा रचताना संयमाची, चिकाटीचीच कसोटी लागते. क्रिकेट खेळताना फलंदाजीत माहीर असणाऱ्यांची विकेट घेताना गोलंदाजाकडे अमाप संयम हवा. प्रसिद्ध तत्त्ववेत्ते लाओझी यांचे सुंदर वाक्य आहे ‘नेचर डझ नॉट हरी, येट एव्हरीथिंग इज अकम्प्लिश्ड’. फूल जेव्हा फुलायची वेळ येईल, तेव्हाच फुलणार. हा विचार मुलांना आपण दिला पाहिजे, म्हणजे भांडवल बाजारातील गुंतवणुकीकडे दीर्घकालीन नजरेने बघण्याची दृष्टी येईल.

* संशोधन : कोणताही आर्थिक निर्णय घेताना मुळापासून अभ्यास आवश्यक असतो. त्यासाठी खोलात जाऊन वाचन करणे गरजेचे असते. मॅगी म्हणजे नेस्ले, हॉर्लिक्स म्हणजे युनिलिव्हर, घराचा रंग म्हणजे एशियन पेन्ट्स, पॅराशूट खोबरेल तेल म्हणजे मॅरिको, डॉमिनोज पिझ्झा म्हणजे ज्युबिलंट फूडवर्क्‍स अशा पद्धतीने मुलांना ‘शेअर बाजार’ समजावला गेला पाहिजे. अवांतर वाचन यात गोष्टींच्या पुस्तकांसोबत महिन्याला एका कंपनीचा वार्षिक अहवाल जो प्रत्येक कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असतो, त्यातील आकडय़ांमध्ये सुरुवातीला न जाता फक्त त्या कंपनीकडे असणाऱ्या नाममुद्रा आणि त्याचा बाजार हिस्सा याबद्दल आपण चर्चा आपल्या किशोरवयीन मुलांशी नक्कीच करू शकतो.

* जीवनशैलीवर आधारित खर्चाला आवर: ‘बाबा, आज आर्यनने ना नवीन घडय़ाळ घातले होते, सगळे जण ते घालून बघत होते, काय मस्त आहे ते घडय़ाळ!’ या  संवादामध्ये आपण पालक म्हणून कसा प्रतिसाद देऊ हे महत्त्वाचे आहे. मुलांना नवीन गोष्टीचे स्वाभाविकपणे आकर्षण असते. मात्र बाजारात येणारी प्रत्येक नवीन वस्तू कितीही घ्यावीशी वाटली तरी अशी वस्तू आवश्यक आहे की अतिरिक्त आहे याचा निर्णय पालकांनी स्वत: घ्यावा. प्रसंगी कठोर निर्णय घेणे देखील आवश्यक आहे. लहानपणीच मुलांनी नकार पचवायला शिकणे किंबहुना त्यांना तसे शिकवणे गरजेचे आहे. गुंतवणूक समुपदेशन करताना हे आढळते की, जीवनशैलीवर आधारित खर्चाचे प्रमाण कुटुंबांमध्ये खूप मोठे आहे. आपल्या मुलांना शिकवताना आपणही नकळतपणे जागे व्हाल ही अपेक्षा आहे. 

* जोखीम: हेलन केलर या जगप्रसिद्ध अमेरिकी लेखिका, त्यांनी एकदा म्हटले की, ‘लाइफ इज आयदर ए डेरिंग अ‍ॅडव्हेंचर ऑर निथग अ‍ॅट ऑल’. जीवनाचे काय सुंदर तत्त्वज्ञान सांगितले आहे. पण आपण आपल्या मुलांना जोखीम घ्यायला शिकवतो का? शाळेची दोन दिवसांची सहल परराज्यात जाते आहे, आपण पाठवता ना, किंवा महाराष्ट्रातील एका गड किल्ल्यावर साहसी दूर्ग मोहीम असेल तेव्हा आपण पाठवाल ना? या गोष्टींमधून मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार येतो. ही मुले मोठेपणी गुंतवणुकीच्या बाबतीत जोखीम घेणारी असतील की जोखीम टाळणारी असतील हे अशा अनुभवाअंती किंवा त्याअभावी ठरेल.

विषय सोपा आहे, मुलांचे कौतुक करण्यापेक्षा त्यांच्या गुणांचे कौतुक करा, शिवाय मुलांपेक्षा त्यांच्या अवगुणांकडे निर्देश करा. मुले नकळतपणे शिकतात, पालकांचे विचार आणि कृती पाहत मोठी होतात. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांना जास्त बोलू द्या, त्यांच्या पैशांबद्दल काय भावना आहेत याची दखल घ्या.

शाळेपलीकडला एक वर्ग रोज आपल्या घरातच भरतो, नाही का?

खर्चाची जाणीव

मुलांबरोबर शाळेतल्या स्टेशनरीची खरेदी करताना ती घराच्या जवळच्या किरकोळ (रिटेल) दुकानातून करायला हवी की एक किलोमीटर दूर असलेल्या घाऊक (होलसेल) बाजारपेठेतून करावी किंवा ‘ऑनलाइन’ पद्धतीने करावी आणि तशी ती केल्यास आपले किती पैसे वाचले याचे मुलांना प्रात्यक्षिक दिल्यास पैसे कसे वाचवायचे हा विचार मनात खोलवर रुजेल. हीच मुले मोठेपणी स्वत:चे उत्पादन बाजारात आणतील तेव्हा त्याचे मूल्य स्पर्धात्मक ठेवण्यासाठी लहानपणी जी खर्चाची जाणीव झाली त्याचा नक्कीच उपयोग होईल.

* (लेखक मुंबईस्थित गुंतवणूकविषयक अभ्यासक)

sameernesarikar@gmail.com