यापूर्वी ‘अर्थ वृत्तान्त’मध्ये (४ ऑगस्ट २०१४)  ‘तेजीच्या वारूवर स्वारी’ लेखामध्ये प्रस्तुत लेखकाने अधोरेखित केलं होतं की – आपण दीर्घकालीन अशा तेजीच्या शेअर बाजारामध्ये आहोत व घातक उतारांना सामोरे जाणे हे तेजीच्या मार्केटचे व्यवच्छेदक लक्षण असते. लेखकाने वाचकांना सावध सल्ला देत म्हटलं होतं की, वरच्या पातळ्यांवर नफारूपी विक्री करून परत खालच्या स्तरावर खरेदी करावी.
‘‘जोपर्यंत निफ्टी निर्देशांक ७४५० ते ७५०० आणि मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक २५०००च्या वर आहे, तोपर्यंत बाजारात ‘तेजीची पालवी’ कायम आहे असे समजा. किंबहुना, आजही हा स्तर म्हणजे भविष्यातील ‘‘कल निर्धारण पातळी’’ (ट्रेंड डिसायडर लेव्हल) समजण्यात यावी.
नवीन वर्षांतील आपण संभाव्य उच्चांक व नीचांक काय असतील ते जाणून घेऊ. पण त्या अगोदर शेअर निर्देशांक : निफ्टी ८६२६ / सेन्सेक्स २८८२२ या शिखर स्तराला होता तेव्हा कुठल्या आíथक कारणांमुळे तेजीच्या वारूच्या घोडदौडीला लगाम बसला ती आíथक कारणे प्रथम समजून घेऊ.
१) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल नवनवीन नीचांकाला बुडी मारत असल्यामुळे ज्या देशांची अर्थव्यवस्था तेलाधारित आहे, त्यांना फार मोठा मंदीचा फटका बसत आहे. त्यात रशिया, नायजेरिया, व्हेनेझुएला हे देश प्रमुख आहेत.
२) आजही कच्चे तेल ऊर्जेचे प्रमुख स्रोत आहे. किंबहुना, आंतरराष्ट्रीय उद्योगधंद्यांचे ‘होकायंत्र’ आहे. जेव्हा कच्च्या तेलालाच उठाव नाही याचा अर्थ आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्योगधंदे मंदीत आहेत. याचा पुरावा म्हणजे अजूनही युरो झोन, ग्रीसमधून मंदीच्या बातम्या येत असतात. चीन, जपानच्या मध्यवर्ती बँकांनी कर्जावरील व्याजाचे दर कमी केले, ज्यायोगे उद्योगधंद्यांना चालना मिळेल.
३) उद्योगधंद्यांना लागणारा कच्चा माल म्हणजे विविध धातू ज्यात पोलाद, अ‍ॅल्युमिनियम, निकेल यांचा समावेश होतो. या धातूंना अजूनही उठाव नाही.
४) देशांतर्गत लघुउद्योगांमध्ये प्रचलित असलेली ‘चलान पद्धत’ (गुलाबी पावती) ज्यात उत्पादक वितरकाला ४५ दिवसाचे ‘क्रेडिट’ देतो (माल विकून ४५ दिवसांनी पसे द्यायचे), आता हे चक्र तब्बल १०० दिवसांवर गेले आहे. जे औद्योगिक उदासीनता दर्शविते.
५) देशांतर्गत उद्योजकांकडून कर्जाला मागणी नसल्यामुळे व बँकांमध्ये कर्जासाठी मुबलक पसा उपलब्ध असल्याने, स्टेट बँक व पंजाब नॅशनल बँकांनी अल्प मुदतीच्या ठेवीवर (ज्यांची मुदत एक वर्षांहून कमी असते) पाव टक्का (०.२५%) व्याज कमी केलं. भरपूर रोकड सुलभता असताना अल्पमुदतीच्या ठेवी या बँकांना आतबट्टय़ाच्या ठरत आहेत.
६) आपल्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं म्हणजे परदेशस्थ गुंतवणूकदार संस्था ज्या अधिकांश अमेरिकास्थित आहेत त्यांच्या दृष्टीने आज अमेरिकेची अर्थव्यवस्था अतिशय झपाटय़ाने विकास पावत आहे. अमेरिकेचे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) हे पाच टक्क्य़ांवर झेपावत आहे. त्यामुळे परदेशस्थ गुंतवणूकदारांचा ओढा व पशाचा ओघ परत मातृभूमीकडे वळण्याची शक्यता आहे. पण जर का आपलं बाजाराचं मूल्यांकन जर वास्तवतेच्या पातळीवर आलं तर आपण गुंतवणुकीच्या दृष्टीने परत आकर्षक होऊ शकतो.
सरलेल्या डिसेंबर महिन्याच्या १७ तारखेला निफ्टी व सेन्सेक्सने अनुक्रमे ७,९६० आणि २६,४६९ असे नीचांक मारून या पातळ्यांचाच आधार घेऊन हे निर्देशांक सावरल्याचे दिसले आहे. आताच्या घडीला ८,३५० ते ८,४०० आणि २७,८५० ते २८,१००० या पातळ्यांचा निर्देशांकांना भरभक्कम अडथळा आहे. इथून पुन्हा मंदीचे आवर्तन सुरू होईल. दीर्घकालीन तेजीच्या बाजारामध्ये खालील तीन पातळ्या (लेवल्स) दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक ठरतात.
पातळी १ : आताच्या घडीला निफ्टी व सेन्सेक्सची ८०००/ २६,९०० ही महत्त्वाची कल निर्धारण (ट्रेंड डिसायडर लेवल) पातळी आहे. या पातळीचा आधार घेऊन निर्देशांकांनी वरची उसळी मारलीच पाहिजे.
पण जर का यात निर्देशांक अपयशी ठरला व निर्देशांक ८०००/ २६,९०० च्या खाली पाच दिवस टिकला तर तेजीवाल्यांसाठी हा धोक्याचा घंटानाद आहे.
पातळी २ : निर्देशांकांनी ८०००/ २६,५००चा नकारात्मक खालचा छेद दिला तर त्यांना ७८५०/ २६,३०० या पातळ्यांचा आधार असेल.    
पातळी ३ :    मंदीची अतिरंजित (अ‍ॅबरेशन) पातळी ही निफ्टीवर ७५००-७६००, तर सेन्सेक्ससाठी २५,००० अशी आहे. या ठिकाणी बाजार दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक होईल.  
एकदा का बाजाराने तळ गाठला की, भविष्यकालीन चांगल्या घटनांची (तेजीकारक) नोंद घेण्यास बाजाराकडून सुरुवात होईल.
तेजीकारक / चांगल्या घटना खालीलप्रमाणे-
१) मोदी सरकारचा र्सवकष असा फेब्रुवारीतील अर्थसंकल्प हा निवडणुकीत दिलेली आíथक आश्वासने प्रत्यक्षात उतरवण्याची संधी देणारा ठरणार आहे व त्यात प्रामुख्याने आíथक तूट ही सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या आताच्या ४.५% वरून ४.१% मर्यादेत राखणे, तर पुढील वर्षांसाठी तिचे लक्ष्य ३.८% अथवा ३.५% ठेवणे. या निर्धारित पातळीपर्यंत ही तूट खाली आणण्यात सरकार यशस्वी ठरलं तर बाजारात तेजीचा बहर येईल.
२) वस्तू व सेवा कर (जीएसटी) हा प्रलंबित मुद्दा, संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात काही तरतुदी, दुरुस्त्या सुचवून पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहे. जर असं झालं तर कररचनेत सुसूत्रता येऊन अर्थउद्योगास चालना मिळेल व येणाऱ्या काही वर्षांत सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये यापायी अतिरिक्त दोन टक्क्य़ांची वाढ होण्याची शक्यता आहे.
३) आशाळभूत नजरेने सर्व उद्योगजगत ज्याची प्रतीक्षा करत आहे ते कर्जावरील व्याजदर रिझव्‍‌र्ह बँक एप्रिलपासून कमी करण्यास सुरुवात करेल अशी अपेक्षा आहे.
वरील तीन अंदाज जर प्रत्यक्षात आले तर या सुरेख ‘त्रिवेणी’ संगमावरचा तेजीचा संभाव्य उच्चांक काय असेल?
पातळी १: आधी म्हटल्याप्रमाणे निफ्टीने ७८५० अथवा ७५५० ते ७६००चा, तर सेन्सेक्सने २५५०० ते २६००० चा तळ गाठल्यावर तोच बाजाराच्या दीर्घकालीन तेजीचा पाया रचला जाईल. इथून प्रथम निर्देशांकांना ८०००/२६५०० चा अडथळा असेल व तो अडथळा दूर केल्यावर ८३०० ते ८४००चा भरभक्कम अडथळा असेल.
पातळी २: जेव्हा निर्देशांक सातत्याने ८४००/ २८००० च्या वर १५ दिवस टिकत असेल तर शेअर बाजार पुन्हा एकदा ८६००/ २८,८२२ च्या उच्चांकाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करेल.
पातळी ३: एकदा का निर्देशांक ८६००/२८८०० च्या वर १५ दिवस टिकाव धरताना दिसले की त्यांचे नवीन उच्चांक ९२०० ते ९५०० / ३२००० दृष्टिपथात येतील.

Story img Loader