भक्ती रसाळ bhakteerasal@gmail.com

आर्थिक क्षेत्रात यशस्वी होण्यास हुशार किंवा व्यावहारिकदृष्टय़ा तरबेज असणे गरजेचे नसून, संयम आणि शिस्तबद्धता अधिक फायदेशीर ठरते. सध्याच्या अस्थिर बाजार स्थितीत सर्वानी लक्षात घ्यावयाचा हा अत्यावश्यक मंत्रच..

रिझव्‍‌र्ह बँकेकडून अचानक व्याजदरात वाढ घोषित झाल्याने गेल्या आठवडय़ात भांडवली बाजाराने तीव्र नाराजी नोंदविली. तातडीची बैठक घेऊन झालेली दरवाढ ही म्युच्युअल फंड व्यवस्थापक वर्गालादेखील अनपेक्षित होती. एकंदरीत सध्या अनपेक्षित घटनांची मालिकाच सुरू आहे, त्यात ही नवीन भर. सामान्य गुंतवणूकदार वर्ग तीव्र महागाईने त्रस्त असताना गुंतवणुकांवरील लाभातही घट सोसत आहे. मुळात हा तोटा ‘आभासी’ नफ्यातील आहे! दीर्घावधीत भांडवली बाजार सदैव अपेक्षित परतावा देतोच. सामान्य गुंतवणूकदारांना जोखमींचे मूल्यमापन करून स्वत:च्या जीवनलक्ष्यांववर भिस्त ठेऊन भांडवली बाजाराशी संलग्न गुंतवणुका करणे हिताचे ठरते.

कुटुंबाच्या आर्थिक उद्दिष्टांवर आधारित नियोजन अस्थिर भांडवली बाजारात विश्वासार्ह उपापयोजना ठरते. तुमच्या जोखमींच्या स्तर काय तो जाणून घ्या, त्यानुसार म्युच्युअल फंडांत योजनांची वर्गवारी उपलब्ध आहे. अस्थिर भांडवली बाजारात जोखमींच्या तीव्र किंवा सौम्य श्रेणीनुसार, गुंतवणुका करणे क्रमप्राप्त बनले आहे. योग्य जोखीम विभाजनासाठी पूरक ठरतील अशा जवळपास ३६ प्रकारात म्युच्युअल फंडांचे सध्या वर्गीकरण केले गेलेले आहे. गुंतवणूकदारांनी या वर्गीकरणाद्वारे योग्य श्रेणीतील फंड हा आपले जीवनलक्ष्य आणि उपलब्ध कालावधीनुसार निवडणे अपेक्षित आहे. कुटुंबाच्या जीवनलक्ष्यांचे अंदाजपत्रक मांडून, त्या खर्चाशी निगडित चलनवाढीचा दर लक्षात घेऊन डोळसपणे पैसा गुंतविणे, शिस्तबद्ध पद्धतीने ठरलेली उद्दिष्टे निरंतर पाठपुराव्याने साध्य करणे, केवळ संयम बाळगूनच शक्य आहे.

इंटरनेटवरून मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर गुंतवणूक करणे जास्त जोखमीचे ठरल्याचे दिसून येते. सध्याच्या अस्थिर वातावरणात आर्थिक सल्लागाराशिवाय केल्या गेलेल्या गुंतवणुका जास्त तोटय़ास निमंत्रण ठरत आहेत, ते यामुळेच. भांडवली बाजारातील गुंतवणुका या झटपट श्रीमंती मिळविण्याचा मार्ग नव्हे. आर्थिक नियोजनाचा पाया शिस्त आणि संयम आहे. ज्या गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची क्षमता कमी आहे त्या वर्गासाठी देखील कमीत कमी जोखीम असलेल्या गुंतवणुकांचे पर्याय उपलब्ध आहेत. छोटे व नवखे गुंतवणूकदार, ज्येष्ठ नागरिक यांनी असे मार्ग अनुसरण्यास हरकत नाही. गुंतवणुकांचे ध्येय हे विक्रमी परतावा मिळविणे नसून, स्वत:चे आर्थिक जीवनलक्ष्य ठरावीक मुदतीत साध्य करणे आहे, हे लक्षात घ्या. गुंतवणूकदारांनी ठरावीक अवधीनुसार आपले उद्दिष्ट साध्य होत आहे का, याचा सतत आढावा घेत राहायला हवा. अशा प्रकारचे पुनरावलोकन हे बाजारात अधेमधे होणाऱ्या पडझडीतून गुंतवणूकदारांच्या आर्थिक नियोजनाची घडी विस्कटणार नाही याची काळजी घेते.

म्युच्युअल फंडातील कमी जोखमीचे अथवा अस्थिर भांडवली बाजारात उपलब्ध सोयीस्कर पर्याय –

)बॅलन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंड (बीएएफ)-

सामान्य गुंतवणूकदाराला बाजारातील अस्थिरता, जागतिक जोखीम अशा संकटांचा अंदाज बांधणे अशक्य असते. बदलत्या भांडवली बाजारात म्युच्युअल फंड व्यवस्थापक अशा जोखमींचा अभ्यासपूर्वक अंदाज घेऊन योग्य ते बदल त्यांच्या चालू योजनेतील गुंतवणुकांमध्ये करतात. हे योजनेतील फेरबदल बाजारातील घडामोडींना सत्वर प्रतिसाद म्हणून वेगाने होत असतात. अस्थिर वातावरणात अशा फंडांमधील गुंतवणूक ही जोखीम व्यवस्थापनाकरिता उपयुक्त ठरते. हायब्रिड बॅलन्स्ड फंड, इक्विटी सेिव्हग्ज फंड या सारख्या पर्यायांमध्ये समभागांतील गुंतवणुकीबरोबरीने कमी जोखीम असणाऱ्या गुंतवणूक साधनांचाही समावेश असल्याने, त्यांना बाजारातील अस्थिरतेवर मात करणे शक्य होते.

) रिस्कोमीटर –

साधारणपणे गुंतवणूकदार योजनेची श्रेणी पाहून सर्वोत्कृष्ट योजनेत गुंतवणूक करतात. परंतु जोखमींच्या संकेतांकांकडे दुर्लक्ष करतात. ‘रिस्कोमीटर’ त्या फंडातील जोखमीचा स्तर दर्शविते. ‘सेबी’ने घालून दिलेल्या नियमांनुसार ‘रिस्कोमीटर’ सहा विविध स्तरांनुसार, जोखमीचे सौम्य व तीव्र स्वरूप दर्शविते. ‘सेबी’ने आखून दिलेले मापदंड छोटय़ा गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ नये यासाठी आहेत. त्यामुळे आपल्या मेहनतीचा पैसा गुंतविताना ‘रिस्कोमीटर’वरील जोखमीचा स्तर अवश्य अभ्यासावा.

)दिशाभूल केली जाण्यापासून सावधता –

सध्या व्हॉट्सअ‍ॅप, यूटय़ुब व तत्सम समाजमाध्यमांद्वारे कोणताही खात्रीदायक पुरावा नसताना अनेक प्रकारची माहिती व मजकूर आपल्यापर्यंत येऊन सारखा धडकत असतो. अशा कमअस्सल माहिती व अफवांचे आयुष्यमान अत्यल्प असले तरी त्याच्या प्रभावातून होणारी दिशाभूल मात्र घातक ठरू शकते. कोणत्याही आर्थिक घडामोडीशी निगडित नकारात्मक बातमी गुंतवणूकदारांना भरकटवू शकते. संपूर्ण खात्री केल्याशिवाय अशी महिती वाचून त्याबरहुकूम निर्णय घेणे हे कधीही जास्त जोखमीचे ठरते.

आर्थिक क्षेत्रात यशस्वी होण्यास हुशार किंवा व्यावहारिकदृष्टय़ा तरबेज असणे गरजेचे नसून, संयम आणि शिस्तबद्धता अधिक फायदेशीर ठरते. आर्थिक नियोजनाच्या सफलतेसाठी गुंतवणूकदारांची भावनिक सशक्तता ही जास्त पोषक असते.

अस्थिर बाजारात एसआयपी’ –

दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करण्याकरिता ‘एसआयपी’ सर्वोत्तम माध्यम आहे. बाजारातील अस्थिरता, चलनवाढ, कालावधी यावर दीर्घकालीन ‘एसआयपी’ गुंतवणुकीचा परतावा हमखास मात करतो. प्रत्यक्षात बाजारातील चढ-उतार हे सरासरीचा नियम लागू होऊन ‘एसआयपी’ गुंतवणूकदारास लाभाची संधी निर्माण करीत असतात. एसआयपी संयमाने दीर्घकाळ चालू ठेवणे गरजेचे आहे. तथापि ठरावीक मुदतीत या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा ठरविलेल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यास मदतकारक ठरत आहे काय, याचे नियतकालिक पुनरावलोकन मात्र आवश्यक आहे.

* लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आणि व्यावसायिक विमा सल्लागार

Story img Loader