गेले आठवडाभर सोने दराच्या अस्थिरतेने तमाम अर्थव्यवस्थेत मोठा धुमाकूळ घातला. आंतरराष्ट्रीय पातळीवर जिथे सोने विक्रीस काढण्याचा पर्याय केवळ चाचपडून पाहिला जात होता तिथे रिझर्व बँकही सोने विकायला काढणार आहे, अशी अफवा भारतातील गल्लोगल्लींच्या सराफ्यांच्या पेढय़ांवर पोहोचली.
यामुळे एरवी दिवसाला कधी दशके तर काही शतकांनी सराफा बाजारात घसरणारे दर ऐन मुहूर्ताच्या मोसमात मोठय़ा फरकाने आपटले.
यातही विचित्र बाब म्हणजे पाडव्याच्या व गुरुपुष्यामृतच्या मुहूर्तावर सराफा बाजारात धातूचा भाव चांगलाच तापला. तर दरम्यानच्या काळात अवघ्या आठवडय़ाच्या अवधीत सोने तोळ्यामागे तब्बल ३,४७० रुपयांनी स्वस्त झाले. टक्केवारीत दुहेरी आकडय़ातील ही घट (११.८०%) होती.
पाडव्याच्या पूर्वसंध्येला तसेच गुरुपुष्यामृतच्या तिन्हीसांजेला मौल्यवान धातू दरांच्या बाबततीत अधिक चकाकले होते. बुधवार, १० एप्रिल रोजी स्टॅण्डर्ड सोन्याचा १० ग्रॅमचा दर आधीच्या तुलनेत ९० रुपयांनी वधारून २९ हजाराच्या खाली आला होता; तर यंदाच्या गुरुवारी, १८ एप्रिलला तो याच प्रकार आणि वजनासाठी थेट २४० रुपयांनी वधारून २६ हजाराकडे कूच करू लागला. दरम्यानच्या व्यवहारातील पाचही सत्रात त्याने दरांचा घसरता क्रम कायम राखला होता. रविवारच्या आणि दोन्ही महत्त्वाच्या मुहूर्ताच्या अल्याड-पल्याड त्याने थेट हजाराहून अधिक रुपयांची आपटीही खाल्ली होती.
आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्या तपात सहा पट भाववाढ नोंदविणाऱ्या मौल्यवान धातूच्या दरात २०१३ मध्ये आतापर्यंत १७ टक्क्यांची घट झाली आहे. लंडनच्या मुख्य बाजारात १,३०० डॉलर प्रती औन्स असणारे सोन्याचे भाव हे जानेवारी २०११ पासून नीचांकी पातळीवर आहेत. तर भारतात पाडव्यानंतरच्या आठवडय़ात १० टक्क्यांची दरघट नोंदविणारे सोने दर जानेवारी २०१३ पासून आतापर्यंत २० टक्क्यांनी कमी झाले आहेत.
सुवर्ण दरातील ही घट, भारताच्या बाबत तोळ्यासाठी २५ हजाराचा योग साधणार काय, याच मध्यावर आठवडाभर घसरणीचे हेलकावे घेणारे वातावरण सप्ताहांतीपूर्वीच बदलू लागले. आणि सराफा बाजारात पुन्हा एकदा सोन्याचे भाव शेकडय़ामागे वाढू लागले. २५च काय पण २२, २३ हजाराचे आकडेही आता लुप्त होऊ लागले. (नोव्हेंबर २०१२ मध्ये ३२ हजाराचे शिखर‘दर’ साधल्याण्यापूर्वी आपण हा भाव पाहिलेला आहे. तेव्हा) २५ हजाराखालची सीमारेषा अस्पष्ट होऊ लागली.
‘आता तर भाव घसरण्याचे मुळीच चान्सेस नाहीत’ अशी भविष्यवाणी खुद्द सराफा व्यावसायिकांनी केली आहे. त्याला निमित्तही ते देतात. इतके दिवस लग्नाला नाही पण सोने खरेदीला मुहूर्त होते. आता लग्नाचा सिझन शनिवारपासूनच (२० एप्रिल) सुरू झाला आहे. त्यात येत्या १३ मेला अक्षय तृतिया. म्हणजे सुवर्णखरेदीचा आणखी अर्धा/एक मुहूर्त. शिवाय नव्या १९३५ शकातला दुसरा गुरुपुष्यांमृत १६ मे आणि तिसरा १३ जून रोजी येऊ घातला आहे. ‘हा, यानंतर पुन्हा एकदा पूर्वीचा, ३२ हजारापूर्वीचा भाव पहायला मिळू शकतो’, असेही जवाहिऱ्यांना वाटते.
सरकारची डोकेदुखी ठरलेल्या वित्तीय तुटीला मोठे निमित्त सोन्याच्या अतिहौसेने मिळत असते. गेल्या काही कालावधीतील सोन्याची आयात कमी झाल्याची बाब समाधानकारक असली तरी कमी भावामुळे भासणारी निकड ही तूट चिंता निर्माण करू शकते.
महागाईच्या झळा लागत असताना ‘सोन्यासारखी’ आकर्षक परताव्याची झुळुक अन्य गुंतवणूक पर्यायात नाही, हेच यंदाच्या खरेदीने दाखवून दिले.
दर अस्थिरतेवर ‘सुवर्ण अधिवेशन’
सोने दरातील गेल्या आठवडय़ातील घालमेलीने तमाम सुवर्णकार, सराफ पेढय़ा, ब्रॅण्डेड दालनांमध्येही धास्ती पसरली. सोने दर जसे खरेदीदारांना चांगले तसे व्यावसायिकांच्याही पथ्यावरच पडणारे. मात्र या अती दर आपटीने गल्ल्यावर अस्वस्थ वातावरण निर्माण होते, असे त्यांना वाटते. आणि याला कारणेही नेमकी
आहेत. ती म्हणजे वायदा बाजार..
या वायदे बाजारातील धातूच्या मिनिटागणिक बदलले जाणाऱ्या दरांमुळे पेढय़ांवरही दिवसाला किमान दरबदलाचे ‘तीन शो’ चालतात. सकाळी आलेल्या ग्राहकाला ‘इंडिकेटरवर/फळीवर’ संध्याकाळी दुसराच (अधिकतकर वाढलेलाच) भाव दिसतो. याचा सामना करावा लागतो तो या व्यावसायिकांना.
सराफा बाजारातील धातूंच्या या दरातील अस्वस्थता संपुष्टात आणण्याच्या जिकरीने मुंबईत दोन दिवसांचे सुवर्णकारांचे मोठे अधिवेशन होऊ घातले आहे. वायदा बाजारांवर बंदीसह सराफांबाबत अनेकदा अंमलात आणले जाणाऱ्या पोलिसांच्या कलम ४११,४११अ वर नियंत्रण आणण्याच्या मागणीचा ठरावही या अधिवेशनात होणार आहे. चोराकडून सोने हस्तगत करण्यात आल्यानंतर सराफ्यांना वेठीस धरून या कलमाचा दुरुपयोग करण्यात येत असल्याची सराफा संघाची तक्रार आहे.
सोन्यावर नियंत्रण आणण्याच्या विपरित कालावधीत अस्तित्वात आलेल्या ‘सुवर्णकार संघा’च्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात अस्थिर दरांबरोबरच हॉलमार्किंग, विविध कर, मनी लॉन्ड्रिग अॅक्ट असे संवेदनशील विषयही घेण्यात येणार आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात असलेल्या लाखभर सुवर्ण कारांच्या उपस्थितीत या अधिवेशनातून अस्थिर दरांबाबत अधिक भूमिका स्पष्ट होण्यास मदत निश्चितच होईल. सोन्यावर शुल्क लागू केल्यानंतर ऐन दसरा-दिवाळीच्या कालावधीत तब्बल २० दिवसांहून अधिक देशव्यापी बंद सुवर्णकार संघामार्फत गेल्या वर्षी पुकारला होता.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने दरांमध्ये आणखी घसरण संभवते. लंडनच्या मुख्य बाजारपेठे प्रती औन्स १,५०० च्या डॉलरच्या खाली पहायला मिळालेल्या दरांनी भारतीय बाजारपेठेतही २६ हजाराखालचा तळ गाठला आहे. एकेकाळी ३२,५०० नजीक जाणाऱ्या सोन्याचा दर २० टक्क्यांपर्यंतची सुधारणा नोंदवू शकतो. मोठय़ा स्वरुपात सोने खरेदी करणाऱ्यांनी अती घाई करू नये.
– नितीन नचनानी, विश्लेषक, जिओजित कॉमट्रेड लिमिटेड.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने विक्रीच्या निर्णयामुळे भारतासारख्या मोठय़ा प्रमाणात वापर असलेल्या सोने दरात एकदम मोठी घसरण पहायला मिळाली. सोने आणखी स्वस्त होईल, या आशेने अनेकजण ताटकळत बसले आहेत तर पुन्हा कधी तोळ्यासाठी २५ हजाराचा भाव पहायला मिळेल, या हेतूने दुकांनामध्ये गर्दी केली. तोळ्यासाठी गेल्या काही कालावधीतील २ हजार ते ४ हजार रुपयांपर्यंतचा दर घसरणीचा फरक नजीकच्या भविष्यात येऊ शकेल, याची शक्यता कमी आहे.
– माधवराव वडनेरे, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश सुवर्णकार परिषद.
पाडव्यानंतर सोने आणि चांदी एकाच दिवसात अनुक्रमे ६ आणि ८ टक्क्यांनी आपटलेली आपण अनुभवली आहे. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर मौल्यवान धातूने त्याच्या गेल्या सव्वा वर्षांचा नीचांक गाठला आहे. व्हिएतनामच्या मध्यवर्ती बँकेनेही सहा फैरींमध्ये साधारणत: ६ टन सोने विकले आहे. स्थानिक पातळीवर पाहिले तर ईटीएफसारख्या गुंतवणूक पर्यायातूनही निधी काढून घेण्यात आला आहे. अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या पाश्र्वभूमिवर सोने दरांमध्ये आणखी घट संभविते.
– पृथ्वीराज कोठारी, संचालक, रिद्धीसिद्धी बुलियन्स.