|| सुधीर जोशी
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या निकालांमुळे सर्वाचे लक्ष लागलेल्या गेल्या सप्ताहात ग्राहकोपयोगी वस्तू (एफएमसीजी) वगळता सर्वच क्षेत्रातील समभाग प्रकाशात राहिले. धातू, वाहने व ऊर्जा क्षेत्रांबरोबर साखर, खते, सिमेंट अशा क्षेत्रांतील कंपन्यांच्या समभागांना मागणी राहिली. सेन्सेक्स व निफ्टी या निर्देशांकांनी सलग चौथ्या सप्ताहात तेजीकडे वाटचाल करीत पुन्हा एकदा ६१,००० व १८,००० चा टप्पा पार केला.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रोचा अपवाद वगळता इतर सर्व कंपन्यांनी परंपरेने कमी उत्पन्न असणाऱ्या तीन महिन्यांच्या काळात चांगली कमाई केली. टीसीएसच्या ४५०० रुपयांच्या समभाग पुनर्खरेदीच्या योजनेमुळे कंपनीच्या समभागांच्या घसरणीवर मर्यादा असेल. मोठय़ा उद्योगांबरोबरचे विश्वासाचे संबंध आणि नवीन तंत्रज्ञान व कौशल्य विकास यामध्ये केलेली गुंतवणूक भविष्यात कंपनीला नेहमीच आघाडीवर ठेवेल. विप्रोचे समभाग विकण्याची गरज नाही; पण आणखी तीन महिने वाट पाहावी लागेल. इन्फोसिसने सर्व सम-व्यावसायिकांना मागे टाकत दमदार कामगिरीचे प्रदर्शन केले. वार्षिक तुलनेत मिळकतीमधील २१.५ टक्क्यांची वाढ गेल्या ११ महिन्यांतील सर्वोच्च ठरली. चालू आर्थिक वर्षांच्या मिळकतीमधील वाढीचा कंपनीने २० टक्क्यांपर्यंत वाढविला आहे. त्यामुळे सध्या गुंतवणुकीसाठी टीसीएस व इन्फोसिस हे समभाग अग्रक्रमावर असायला हवे.
टाटा कम्युनिकेशन्स – ही जगातील डिजिटल इकोसिस्टम सक्षम करणारी कंपनी आहे. कंपनी सध्या मोठय़ा प्रमाणात मागणी असलेल्या क्लाऊड, डेटा सेंटर, डिजिटल नेटवर्क अशा सेवा पुरविते. कंपनीने नुकताच झेन केएसए या अग्रणी मोबाइल दूरसंचार आणि डिजिटल सेवा प्रदाता कंपनीबरोबर सामंजस्य करार केला आहे. झेन केएसए ही नावीन्यपूर्ण सेवा पुरविणारी आखातातील नेक्स्ट जनरेशनमधील तंत्रक्रांतीचे नेतृत्व करणारी कंपनी आहे. सौदी अरेबियामधील उद्योग आणि सरकारी संस्थांच्या डिजिटल परिवर्तनाला चालना देण्यासाठी नव्या सहकार्याच्या माध्यमातून उभय कंपन्या एकत्रित कार्याद्वारे अद्ययावत पथदिवे, कचरा व्यवस्थापन, कामाच्या ठिकाणचा तंत्रस्नेही संपर्क, आरोग्यसेवा तसेच दळणवळण व वाहतूक सुविधा आदी शहर पुनर्रचनेसाठी उपाय पुरविणार आहेत. कंपनीच्या समभागात गेल्या पाच वर्षांत सरासरी १८ टक्क्यांची वाढ झाली आहे. बाजाराच्या प्रत्येक घसरणीत जमवून ठेवण्यासारखा हा समभाग आहे.
अॅव्हेन्यू सुपरमार्ट (डी-मार्ट): कंपनीने डिसेंबरअखेर तिमाहीचे उत्तम निकाल जाहीर केले. मिळकतीत २२ टक्के तर नफ्यात २४ टक्के वाढ झाली. या तिमाहीत १७ नवी विक्री दालने सुरू करण्याचा विक्रम करून दालनांची एकूण संख्या २६३ झाली आहे. मागच्या शनिवारी निकाल जाहीर झाल्यावर सरल्या सप्ताहात कंपनीच्या समभागात नफावसुली झाली; पण या संधीचा फायदा घेऊन समभाग खरेदी करता येतील. किफायती किमतीत नित्योपयोगी वस्तू मिळण्यासाठी कंपनीची विक्री दालने टाळेबंदी असो वा नसो गर्दी खेचत असतात. कंपनीच्या समभागात नेहमीच उच्च स्तराच्या ‘पीई रेशो’वर व्यवहार होतात.
प्रताप स्नॅक्स : आजकालच्या पिढीला आवडणारे व परवडणारे सेवन-सिद्ध फराळ (‘रेडी टू इट स्नॅक्स’) बनविणाऱ्या या कंपनीचे मध्य, पूर्व व पश्चिम भारतात १५ उत्पादन कारखाने आहेत. तयार पदार्थाचे शंभरहून अधिक प्रकार कंपनी ‘यलो डायमंड’ व ‘अवध’ या नाममुद्रांनी विकते. खाद्यतेलाचा वापर कमी करणे, वितरण साखळीतील दुवे कमी करणे, पॅकेजिंगमधील सुधारणा अशा खर्चावर नियंत्रण करण्याच्या अनेक योजनांवर कंपनी काम करीत आहे. कंपनीच्या समभागांचे प्रवर्तकांकडील प्रमाण ७१ टक्के आहे. करोनाकाळाची झळ बसल्यामुळे कंपनीची घटलेली मिळकत सप्टेंबरपासून पुन्हा वाढू लागली आहे. दोन वर्षांच्या उद्देशाने सध्याच्या भावात घेतलेले समभाग चांगला नफा मिळवून देतील.
सरकारच्या पायाभूत सुविधांवरील खर्चामुळे सध्या अर्थव्यवस्थेची चाके गतिमान आहेत. येणाऱ्या अर्थसंकल्पात त्यावर अधिक भर दिला जाण्याची शक्यता आहे. सरकारच्या उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. इलेक्ट्रॉनिक उद्योगांसाठी सुरुवात झालेली ही योजना आता १३ उद्योग क्षेत्रांना लागू झाली आहे. विकास दराचे साडेआठ टक्क्यांचे अनुमान उद्योगांना व पर्यायाने बाजाराला उत्साही ठेवेल. ओमायक्रॉन व वाढती महागाई हे जरी चिंतेचे विषय असले तरी बाजार ते गृहीत धरूनच वाटचाल करत आहे. नजीकच्या काळात बाजाराची वाटचाल ठरविण्यात कंपन्यांच्या नऊ महिन्यांच्या निकालांची महत्त्वाची भूमिका असेल.
या सप्ताहातील या घडामोडींवर लक्ष ठेवा
एल अँड टी टेक्नॉलॉजी, परसिस्टन्स सिस्टीम्स, ओरिएन्ट इलेक्ट्रिक या कंपन्या डिसेंबरअखेर तिमाहीचे निकाल व अंतरिम लाभांश जाहीर करतील.
एशियन पेंट्स, बायोकॉन, हिंदूुस्थान युनिलिव्हर, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी लाइफ, रिलायन्स तसेच बजाज समूहातील कंपन्या डिसेंबरअखेर तिमाहीचे निकाल जाहीर करतील.
गेल्या महिन्यात प्राथमिक समभाग विक्री केलेल्या काही कंपन्यांमधील आरंभिक गुंतवणूकदारांच्या (अँकर इन्व्हेस्टर्स) विक्रीवरील बंधनाची एक महिन्याची मुदत या सप्ताहात संपत आहे. मॅप माय इंडिया, मेट्रो ब्रॅंड्स, मेड प्लस हेल्थकेअर, डेटा पॅटर्न्स या समभागांवर परिणामी विक्रीचा दबाव येऊ शकतो.
sudhirjoshi23@gmail.com