गेल्या आठवडय़ात निफ्टी निर्देशांक नाजूक वळणावर असल्याचे या स्तंभात भाकीत करण्यात आले होते. निर्देशांकाने आपल्या प्रवाह रेषेचा कडवा आधार स्तर गमावून बसण्याची शक्यता दिसते, तथापि ५४४७ ते ५५२७ हे निफ्टी निर्देशांकासाठी पोकळी क्षेत्र बनले असल्याचेही ध्यानात घेता; कोणत्याही अफरातफरीच्या स्थितीत ही पोकळीच निफ्टी निर्देशांकासाठी मोठा आधार बनू शकेल, असे सांगण्यात आले होते. सरलेल्या आठवडय़ात निफ्टी निर्देशांक याच पोकळी क्षेत्रात घुटमळताना दिसला आणि प्रसंगी त्याने ५५४८ असा या पोकळी क्षेत्राच्या सीमारेषेवर नीचांकी विराम घेतल्याचेही आढळून आले.
सरलेल्या आठवडय़ात निफ्टी निर्देशांकात अगदी मामुली हालचाल दिसून आली. ५५५५ ते ५६४३ या जेमतेम ९० अंशांच्या टप्प्यात तो आठवडाभर हालता राहिला. संसदेचे हिवाळी अधिवेशन अडखळत सुरू झाले आणि आर्थिक सुधारणांबाबत सरकारच्या नव्या ध्यासाचे या अधिवेशनातून ठरणारे भवितव्य बाजाराकडून डोळ्यात प्राण आणून पाहिले जात आहे. किराणा व्यापारातील विदेशी गुंतवणुकीच्या प्रश्नावर विरोधकांची एकजूट होऊन, हा प्रश्नच संसदेच्या विद्यमान सत्रावर अधिराज्य गाजविणार आहे. येत्या गुरुवारी विमा, पेन्शन आणि बँकिंग सुधारणांचे तितकीच महत्त्वाची विधेयके संसदेसमोर येतील. किराणा व्यापाराला विरोधात सुरू असलेल्या गदारोळात या महत्त्वपूर्ण विधेयकांचाही बळी गेला नाही म्हणजे मिळविले. ममता बॅनर्जीचा अविश्वास ठरावाचा वार आजमावला न जाताच विरला असला, तरी  संसदेचे दोन्ही सभागृह आजवर तरी कोणतेच कामकाज न होता गदारोळातच तहकूब झाले आहेत.
सरकारच्या आकस्मिक दिसलेल्या धोरणात्मक ध्यासावर वैधानिक शिक्कामोर्तब संसदेच्या विद्यमान हिवाळी अधिवेशनातच होणार असल्याने, संसदेचे कामकाज कसे चालते याचा शेअर बाजारावर बरा-वाईट परिणाम अपरिहार्यपणे दिसून येणार आहे.
तर तांत्रिकदृष्टय़ा पाहायचे झाल्यास गेल्या आठवडय़ाप्रमाणे निफ्टी निर्देशांक भाव प्रवाहाच्या खालच्या तटापाशीच घुटमळताना दिसत आहे. डेरिव्हेटिव्हज्चा तपशील सांगतो की, बाजारात तेजीवाले आणि मंदीवाले यांची सारख्याच बळाबळाने जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यातून चालू आठवडय़ातही निफ्टी ५६०० ते ५७०० या शंभर अंशांच्या फेऱ्यातच फसलेला दिसून येईल. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातून कोणता नकारात्मक संदेश आलाच तर पुन्हा ५४४७ ते ५५२७ हे पोकळी क्षेत्रच निफ्टी निर्देशांकासाठी जीवनमरणाचा आधार बनेल.
पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, निफ्टी निर्देशांकासाठी वरची पातळी ही नोव्हेंबरच्या फ्युचर्स व ऑप्शन्स मालिकेच्या सौदापूर्तीपर्यंत ५७५०पर्यंत बंदिस्त असेल. येत्या गुरुवारी २९ नोव्हेंबरला सौदापूर्ती आहे. सरकार आणि विरोधकांमध्ये महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांबाबत काहीसे आश्चर्यकारक मतैक्य दिसले तरच हा निफ्टीचा उच्चांक स्तर पाहायला मिळेल, हेही सांगणे  न लगे.     

सप्ताहासाठी शिफारस
*    भेल : (सद्य दर २२४.७० रु.)     
    खरेदी: रु. २२६ वर; लक्ष्य- रु. २३३-२३७
*  एचसीएल टेक :  (सद्य दर ६३६.४५ रु.)     
    खरेदी: रु. ६४० वर; लक्ष्य- रु. ६५५
*    रिलायन्स इन्फ्रा : (सद्य दर ४५५.६० रु.) विक्री : रु. ४४८ खाली;  लक्ष्य: रु. ४३६

गेल्या आठवडय़ात विक्री शिफारशीप्रमाणे हिंडाल्कोने १०४.८० या खालचे लक्ष्य गाठले, आयटीसीने मात्र विक्रीसाठी दिलेल्या भावापर्यंत घसरण दाखविली नाही. खरेदी सुचविण्यात आलेल्या भारती एअरटेलने ३१२.५० हा उच्चांक दाखविला.

Story img Loader